रमाकांत पन्हाळे विविध बिझनेस नेटवर्कमध्ये कार्यरत आहेत. दांडगा जनसंपर्क, कोणालाही विशेषत: होतकरू उद्योजकास कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता शक्य ती मदत करणे, या गुणांमुळेच ते यशस्वी ठरले, असं त्यांना वाटतं. यासाठी ते आपल्या कारखान्यात विविध क्षेत्रातील उद्योजकांना, विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करतात. मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांची ही मेहनत नक्कीच फळास येईल.
अगोदर त्याने लग्नासाठी २२ मुली पाहिल्या. तसा दिसायला हा चांगला रुबाबदार, उंचपुरा. अगदी खेळाडूसारखी शरीरयष्टी. तरीही बावीस मुलींनी त्याचं स्थळ नाकारलं. कारण एकच, तो नोकरी करणारा नव्हता, तर नोकरी देणारा होता. १९९३ सालातली ही मराठी उद्योजकांची एकप्रकारे व्यथाच होती. ‘उद्योजकापेक्षा नोकरदार बरा’ अशा विचारांचा तो काळ. त्या काळात त्याने प्रिंटिंगच्या व्यवसायात हात घातला. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक दिग्गज समूहांना त्याने प्रिंटिंगची सेवा दिली. २२ वर्षांनंतर पन्नाशीच्या उंबरठ्यावर नवीन उद्योगात प्रवेश केला. इंटिरिअर डिझाईनच्या. याही व्यवसायात जम बसवला. मुलाला अवघ्या विशीच्या आत ‘उद्योजक’ म्हणून घडविले. आज बापलेकांची जोडी उद्योग विस्तारत आहेत. आपल्या मुलासोबत त्याच्या मित्राला आणि इतर महाराष्ट्रीयन मुलांना उद्योजक बनविण्याचा त्यांचा ध्यास आहे. हा ध्यास घेणारे आणि ध्यासपूर्तीसाठी झटणारे हे उद्योजक म्हणजे ‘पन्हाळेज प्रिंट पाँईट’चे संचालक रमाकांत पन्हाळे होय.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातील हे पन्हाळे कुटुंब. कडक शिस्तीचे महादेव पन्हाळे आणि मृदू स्वभावाच्या छबूबाई म्हणजे एक आदर्शवत जोडपंच जणू. या जोडप्याला एकूण सहा अपत्ये. तीन मुले अन् तीन मुली. महादेव खर्या अर्थाने मिल कामगार. त्यांचा रमाकांत हा मुलगा. पाचवीपर्यंत रमाकांतचं शालेय शिक्षण अकोल्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर पाचवी ते नववीपर्यंतचं शिक्षण परळच्या सोशल सर्व्हिस लीगमध्ये झालं. रमाकांतने दहावी चाकणमधून दिली आणि सातव्या क्रमांकाने तो दहावी उत्तीर्ण झाला. कलेमध्ये विशेष रुची असलेल्या रमाकांतला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र, आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने त्याने पाषाणच्या अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम होता. रमाकांतने हा अभ्यासक्रम तीन वर्षांतच सोडून दिला.
यानंतर रमाकांतने आयटीआयमधून पेंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, तो प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्याकडे बॅनर रंगविणे, सुलेखन करण्याचं काम करू लागला. खरंतर विजय खातूंचे बंधू उदय खातू यांच्यामुळेच रमाकांत आयटीआयमध्ये गेला होता. काही वर्षानंतर तो एका जाहिरात कंपनीत ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ म्हणून काम करू लागला. पुढे शासकीय कला निकेतनमध्ये कलाशिक्षक म्हणून नोकरीची संधी आली. मात्र, रमाकांतला स्वत:चं उद्योगविश्व निर्माण करायचं होतं. याच जिद्दीतून सुरू झाली प्रिंट पॉईंट ही स्क्रीन प्रिंटिंगची सेवा देणारी कंपनी. वाहतूक, औषध क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांना प्रिंट पॉईंट सेवा देऊ लागली. यावेळी १७ कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, पथिक संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रमाकांत पन्हाळेंच्या अंगी व्यावसायिकता रुजली. खर्या अर्थाने ‘उद्योजक’ म्हणून ते काम करू लागले. याच दरम्यान तेविसावी मुलगी पाहण्यास ते नाशिकला गेले. खुर्चीवर टाकलेल्या रुमालावरचं कशिदा काम मुलीने केलं होतं. त्या एका गुणावर त्यांनी तत्काळ होकार कळविला आणि ज्योती या सुविद्य तरुणीसोबत रमाकांतचा विवाह झाला.
लालबागला त्यांच्या कारखान्यात एक मित्र त्याची काही यंत्रे ठेवून गेला. त्याला त्याचा व्यवसाय बंद करायचा होता. जागेचं भाडं फुकट जातंय म्हणून त्याने ती यंत्रे पन्हाळेंकडे ठेवली. काही महिने उलटून गेली. या यंत्रांचं काय करायचं, हा प्रश्नच होता. धुळीचं साम्राज्यच पसरलं होतं त्यांच्यावर. पन्हाळेंच्या ओळखीचा एक मुलगा त्यांना भेटायला त्यांच्या वर्कशॉपमध्ये आला. तो कामाच्या शोधात होता. तो मशीनवर ऑपरेटर होता, हे त्याच्या बोलण्यातून जाणवल्यावर पन्हाळेंनी त्याला मशीन दाखवून “मशीन चालवणार का?” असे विचारले. तो मुलगा जवळपास उडालाच. कारण याच मशीनचा तो ऑपरेटर होता. पन्हाळेंनी कसलाही अनुभव नसताना निव्वळ त्या मुलाच्या कौशल्यावर विश्वास ठेवून त्याला पगारावर कामाला ठेवले. ऑटोकॅडची ती मशीन सुरू झाली. इंटिरिअरची कामे त्या मशीनवर होऊ लागली.
पन्हाळेंना एकप्रकारे नवीन व्यवसाय गवसला. ते पूर्ण जोमाने या व्यवसायात उतरले. अनेक इंटिरिअर डिझाईनची कामे, आर्किटेक्ट्सची कामे, रेसिडेन्शियल आणि कॉर्पोरेट स्वरूपाची इंटिरिअर डिझाईन्स, कंपनीचे लोगो, ब्रॅण्डिंग, बोर्ड डिस्प्ले, नावाच्या पाट्या सारं काही ‘पन्हाळेज प्रिंट पॉईंट’ सेवा देते.
आपल्या कामावर किती प्रेम करावं, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रमाकांत पन्हाळे. रात्री 9 वाजता झोपून ते पहाटे चार वाजता तर कधी कधी तीन वाजताच उठून कारखान्यात जातात. सात वाजेपर्यंत काम करून मग व्यायाम करुरून, दैनंदिन विधी आटोपून परत कामाला लागतात ते रात्री आठपर्यंत. आपल्याला सामान्यांपेक्षा कामाचे तीन तास जास्त मिळतात आणि आपण जोमाने काम करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. कदाचित लहानपणी आई-वहिनीसोबत दुधाची विक्री करताना लवकर उठण्याच्या सवयीचा त्यांना लाभ झाला असावा. दररोज ४५० दुधाच्या बाटलांची विक्री त्या दोघी करत. आपल्या जडणघडणीत या दोघींचा विशेषत: वहिनीचा मोठा वाटा असल्याचं ते नमूद करतात. त्याचप्रमाणे पत्नी उज्वला (ज्योती) यांच्याशिवाय हा जीवनप्रवास शक्यच नव्हता, त्यांचं योगदान मूल्यातीत आहे, असे रमाकांत प्रांजळपणे कबूल करतात. त्यांचा चिरंजीव जतीन इंटिरिअर डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण करून रमाकांत पन्हाळेंना उद्योगवाढीसाठी मदत करत आहे. गजानन सकपाळ, लक्ष्मीकांत गाला यांचेदेखील मोलाचे सहकार्य रमाकांत पन्हाळेंना त्यांच्या उद्योजकीय वाटचालीत लाभले.
रमाकांत पन्हाळे विविध बिझनेस नेटवर्कमध्ये कार्यरत आहेत. दांडगा जनसंपर्क, कोणालाही विशेषत: होतकरू उद्योजकास कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता शक्य ती मदत करणे, या गुणांमुळेच ते यशस्वी ठरले, असं त्यांना वाटतं. यासाठी ते आपल्या कारखान्यात विविध क्षेत्रातील उद्योजकांना, विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करतात. मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांची ही मेहनत नक्कीच फळास येईल. खर्या अर्थाने रमाकांत पन्हाळेंची ‘प्रिंट पॉईंट’ इंटिरिअर डिझाईनची जादूगार आहे.