बस नाम रहेगा अल्लाह का।

    02-Jan-2020   
Total Views | 160

japa_1  H x W:



लाजिम है कि हम भी देखेंगे,

जब अर्ज-ए-खुदा के काबे से,

सब बुत उठाए जाएँगे,

हम अहल-ए-वफा मरदूद-ए-हरम,

मसनद पे बिठाए जाएँगे।

सब ताज उछाले जाएँगे,

सब तख्त गिराए जाएँगे।

बस नाम रहेगा अल्लाह का।


सारांश : सर्व मूर्ती नष्ट केल्या जातील आणि केवळ अल्लाहची पूजा होईल.


पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांनी १९७९ साली तत्कालीन लष्करशहा झिया उल-हक यांच्या हुकूमशाही सत्तेविरोधात लिहिलेली ही नज्म. त्यानंतर सरकारविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन झिया उल-हक यांच्या शासनाने फैज अहमद फैज यांना कोठडीतही डांबून ठेवले. ही या नज्मची थोडक्यात कहाणी. परंतु, ही नज्म आता इथे देण्याचे कारण म्हणजे तिचा नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील निदर्शनांत केला गेलेला वापर. कुठे? तर आयआयटी कानपूरमध्ये!


पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाहंच्या केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात निर्णय घेतला आणि देशातील उपद्रवी तत्त्वांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व इतरांनी हिंसक निदर्शने केली व आपला असहिष्णू, असंवेदनशील, अराजकी चेहरा सर्वांसमोर आणला. पोलिसांनी मात्र, विद्यार्थ्यांच्या या हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीविरोधात कठोर भूमिका घेत आक्रमक कारवाई केली. ती अर्थातच संविधानिक अधिकार व कर्तव्याच्या परिघात राहूनच. मात्र, त्यानंतर पोलीस कारवाईला विरोध म्हणूनही नागरिकत्व कायद्याच्या विरोधकांनी मोर्चा, धरणे वगैरे आरंभले. त्यातलेच एक नाव आयआयटी कानपूरमधील विद्यार्थ्यांचे. त्यांनी १७ डिसेंबर रोजी परिसरात कलम १४४ लागू असूनही जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या विरोधासाठी मोर्चाचे आयोजन केले. मात्र, या मोर्चाच्या आडून तिथे राष्ट्रविरोधी व हिंदूविरोधी भाषणबाजी करण्यात आली. त्याचवेळी फैज अहमद फैज यांची वरील नज्मही मोठमोठ्याने वाचली गेली. विद्यार्थ्यांकडून ही नज्म वाचली जात असतानाच काही विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला व हे इथे चालणार नाही, असेही म्हटले, पण कोणीही ते म्हणणे ऐकले नाही.


डॉ. वाशी शर्मा आणि त्यांच्या अन्य प्राध्यापक सहकार्‍यांनी याविरोधातच तक्रार दाखल केली. कारण, संबंधित नज्म जरी झिया उल-हक यांच्या लष्करी शासनाविरोधात लिहिलेली असली तरी तिचा वापर व त्यामागचा हेतू गेल्या ४० वर्षांत पूर्णपणे बदलला आहे. काश्मिरातील फुटीरतावादी, दहशतवादी संघटनांकडून भारताविरोधात वातावरण निर्मितीसाठी ही नज्म वापरली जाऊ लागली. अनेकदा मुस्लिमांना हिंदूंविरोधात चिथवण्यासाठी त्या नज्मचा वापर होऊ लागला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानातही धार्मिक दंगली भडकविण्यासाठी फैज यांच्या या नज्मचा वापर होत आला. पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान व त्यांच्या पीटीआय पक्षाने कट्टरतेच्या व भारतविषयक विखाराच्या प्रसारासाठी या नज्मचा वापर करून तिला आणखी लोकप्रिय केले. तसेच इमरान खान यांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ही नज्म प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच ज्या झिया उल-हक यांच्या सत्तेविरोधात ती लिहिली गेली, तो उद्देश कधीचाच मागे पडला, विसरला गेला. तर आता तिचा उद्देश केवळ मूर्तिपूजक-हिंदूंविरोधात-भारताविरोधात विषारी प्रचारापुरता राहिला. म्हणूनच ही नज्म आयआयटी कानपूरमध्ये म्हटली गेली, त्यामागे निराळा अर्थ असल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.


सरकारविरोधी आंदोलनातील एक साधन म्हणून ‘बस नाम रहेगा अल्लाह का ही’ नज्म म्हटलेली नाही, तर ज्याप्रमाणे जामिया मिलिया इस्लामिया व अलीगढ मुस्लीम विद्यापीठात,‘हिंदुत्व की कब्र खोदेंगे’, हा नारा दिला गेला, त्याच अर्थाने ही नज्मही म्हटली गेली. त्याचा संबंध आता फैज अहमद फैजची नज्म लिहितेवेळची मानसिकता, पाकिस्तान व तत्कालीन हुकूमशहा झिया उल-हक यांच्याशी राहिलेला नाही. म्हणूनच या नज्मच्या घोषणाबाजीविरोधात आयआयटी कानपूरच्याच प्राध्यापकांनी तक्रार केली आणि आता त्याची चौकशी करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले आहे. तसेच ही समिती येत्या १५ दिवसांत त्यासंबंधीचा अहवाल देऊन ही नज्म राष्ट्रविरोधी आहे अथवा नाही, यावर निर्णय घेणार आहे.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121