उस्मानाबाद : गेल्या शतकाची शेवटची २० वर्षे आणि या शतकाची पहिली १९ वर्षे या काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन झाले. दोन्ही शतकांच्या ३९ वर्षांनी माणसाच्या जगण्याचा, आयुष्याचा पोत बदलला. मात्र, आपल्या साहित्यात त्याचे प्रतिबिंब पडते का? नसेल पडत तर आपल्याला उद्याची तयारी करावी लागेल कारण भविष्यकाळ याहूनही भिन्न असणार आहे, असे प्रतिपादन श्रीराम शिधये यांनी केले.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात डाॅ. दत्ता घोलप-कादंबरी, डाॅ. पी. विठ्ठल-कविता, डाॅ. केशव तुपे-कथा, डाॅ. कैलास इंगळे-चरित्रपर साहित्य व प्रा. संतोष गोनबरे-चिंतनपर व ज्ञानवर्धक साहित्य यांनी संबंधित विषय मांडले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्रीराम शिधये होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात शिधये यांनी विविध उदाहरणे देत वरील प्रतिपादन केले.
श्रीराम शिधये म्हणाले की, १९८१ ते २००० या काळात झालेल्या अनेक बंदल व संशोधनापैकी प्रमुख म्हणजे उसने मातृत्व किंवा सरोगेट मदर. सरोगसीचा शोध पाश्चात्य देशात लागला व त्याचा वापर आपल्या भारतातही सुरु झाला. परंतु, सरोगसीमुळे गुजरातसह अन्यत्रच्या भारतीय स्त्रियांचे शोषण होऊ लागले. दरम्यानच्य् काळात अवकाश संशोधनातही प्रचंड उलथापालथ झाली. मानवाने ५० कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचा शोध लावला, त्याचे छायाचित्र काढले. तसेच बिघडलेल्या उपग्रहाची दुरुस्ती अवकाशातच केली. एकविसाव्या शतकातही विज्ञान व तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली. आपल्या पेशींनी प्राणवायू न मिळाल्यास त्या मरुन जातात. पण यंदाचे नोबेल पेशींवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिले गेले.
माणूस वेगाने चालतो, धावतो, त्याला धाप लागते, कारण त्यावेळी पेशींना प्राणवायू कमी प्रमाणात मिळतो. परंतु, त्या पेशी मरत नाहीत, असे का होते? यावरच शास्त्रज्ञांनी संशोधन केले. आपल्या सर्वांनाच जन्माला येणाऱ्या कोणत्याही अर्भकाचे पालकत्व आई व वडील या दोघांकडेच असते, हे माहिती आहे. परंतु, इंग्लंडमध्ये दुहेरी नव्हे तर तिहेरी पालकत्वाचा विषय निघाला. अशाप्रकारे जागतिक घडामोडी घडत असताना भारतीय समाजही त्यापासून अस्पर्श राहिला नाही. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यामुळे या सर्वच गोष्टी भारतातही आल्या. परंतु, त्यामुळे माणसाचा माणसापासूनचा संवाद तुटला. तो अधिकाधीक आत्मकेंद्री होऊ लागला. म्हणूनच जागतिक घडामोडी, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, अवकाशझेप वगैरे वगैरेंचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात पडते का? असा प्रश्न उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर होय, असे प्रयत्न सुरु आहेत, असेच मी देईन, असे शिधये म्हणाले.
डाॅ. बाळ फोंडके यांचे तीन पायांची शर्यत तसेच मेंदूतला माणूस, उत्क्रांती आणि निरंजन घाटे यांचे लेखन त्यानुसार सुरु आहे. अर्थात त्याचे प्रमाण अल्प आहे. परंतु, ज्ञानाधिष्छित समाजाला या जागतिक घडामोडींचे ज्ञान साहित्याच्या माध्यमातूनही व्हायला हवे. कारण यापुढचे भविष्य आणखी निराळे असणार आहे. म्हणूनच साहित्यिकांना उद्याची तयारी करावी लागेल, असे मत श्रीराम शिधये यांनी यावेळी मांडले.