नागरिकत्व कायदा योग्यच : प्रतिभा रानडे

    11-Jan-2020   
Total Views | 779


pratibha ranade_1 &n


उस्मानाबाद : पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमध्ये हिंदुंसह अल्पसंख्यकांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. भारत सरकारने त्या सर्व पीडितांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा योग्यच आहे, असे रोखठोक मत प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले.



९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथील संत गोरोबाकाका नगरीत आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. कवी डाॅ. दासू वैद्य आणि पत्रकार सारंग दर्शने यांनी यावेळी प्रतिभा रानडे यांना बोलते केले. प्रतिभा रानडे यांनीदेखील यावेळी आपला आजवरचा लेखन प्रवास
, ललित लेखन, वैचारिक लेखन, जगभरचा प्रवास, भारतभरचा प्रवास, आलेले अनुभव, भेटलेली माणसे आदी विविधविषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. देशात आजकाल गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दलही प्रतिभा कानडे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. फाळणी ते फाळणी हे भारत, पाकिस्तान व बांगलादेश निर्मितीवरील पुस्तक आणि अफगाण डायरी लिहिणाऱ्या प्रतिभा रानडे यांनी या प्रश्नाचे योग्य व संतुलित उत्तर दिले, तसेच कायद्याचे समर्थन केले.



प्रतिभा रानडे म्हणाल्या की
, मी पाकिस्तानसह, अफगाणिस्तान व बांगलादेशाला भेट दिलेली आहे. तिथल्या लोकांनी व तिथून भारतात परतलेल्या लोकांनीही आपले मन माझ्यापुढे मोकळे केले आहे. वरील तीनही देशांत हिंदुंवर आणि अल्पसंख्यकांवर अनन्वित अत्याचार केले जातात. जाळपोळ, हत्या वगैरे प्रकार घडतात, त्यांची संस्कृती मिटवण्याचे प्रकार तिथे होतात, त्यांचे हाल बघवत नाही. अशी सर्व पीडित माणसे भारतात येणार नाहीत तर कुठे जाणार? त्यामुळेच केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व चुकीचा नाही, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या गोंधळाबाबत त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने याबाबत सुरुवातीला जनजागृतीचे काम हाती घ्यायला हवे होते. जनतेला नागरिकत्व कायदा म्हणजे काय हे समजावून सांगायला हवे होते. म्हणजे सत्तेसाठी या कायद्याला विरोध करणाऱ्यांचे फावले नसते.



pratibha ranade_1 &n



अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही प्रतिभा रानडे यांनी आपले मनोगत सांगितले. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आलेली नाहीत किंवा कोणीही माझ्यावर दडपशाही केलेली नाही. केवळ एकच प्रसंग असा आला होता तो म्हणजे मी बुरख्याआडच्या स्त्रिया हे मुस्लिम महिलांच्या समस्यांवर पुस्तक लिहिले त्यावेळचा. मुस्लिम समाजातून धमक्या वगैरे येत होत्या पण मी त्यालाही घाबरले नाही व माझे लेखन पुढे सुरुच ठेवले. दरम्यान
, स्त्रीमुक्ती चळवळीबद्दलही प्रतिभा रानडे यांनी आपले मत मांडले. मी सुरुवातीला स्त्रीमुक्ती चळवळीत होते परंतु, त्यांच्या पराकोटीच्या टोकाच्या भूमिका पाहून मी त्यातून बाहेर पडले असेही रानडे म्हणाल्या. दरम्यान, प्रख्यात लेखिका दुर्गाबाई भागवत आणि आपली मैत्री कशी झाली त्याचा किस्साही यावेळी प्रतिभा रानडे यांनी सांगितला. दुर्गाबाई भागवत यांची घेतलेली मुलाखत व नंतर त्यांच्याबरोबरच्या गप्पांतून साकारलेले ऐसपैस गप्पा या पुस्तकाबद्दलही प्रतिभा रानडे बोलल्या.

 




हिंदू धर्म नव्हे संस्कृती

माझा देवावर विश्वास नाही, असे सांगतानाच प्रतिभा रामडे यांनी हिंदू धर्म व संस्कृती यावरही भाष्य केले. भारतीय संस्कृती सूर्य, वरुण, भूमी, वृक्षांची पूजा करणारी आहे. निसर्गाची पूजा आपल्या संस्कृतीने सांगितली आहे. माणसाने मात्र धर्माचा बडेजाव केला व संस्कृतीला मागे सारले गेले. संस्कृती ही धर्मापेक्षा अधिक वरचढ असते आणि हिंदू हा धर्म नव्हे तर संस्कृती आहे, हे इथल्या वारशातून व परंपरांतूनच समजते, असे रानडे म्हणाल्या.



सरहद्द गांधींची भेट


काबूलला असताना खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांच्याशी भेट झाल्याची आठवण यावेळी प्रतिभा रानडे यांनी सांगितली. आम्ही आधी हिंदू होतो नंतर बौद्ध झालो व आता आमच्यावर इस्लाम धर्म थोपला गेला. भारताच्या स्वातंत्र्यावेळी आम्हाला महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरु यांनी पख्तूनिस्तान व बलुचिस्तान पाकिस्तानशी जोडणार नाही असे सांगितले होते. परंतु
, नंतर मात्र ते आपल्या शब्दाला जागले नाहीत व त्यांनी आम्हाला कुत्र्या-लांडग्यांच्या हवाली केले, अशा शब्दांत सरहद्द गांधी यांनी आपला संताप माझ्याजवळ व्यक्त केला होता.



नेहरु सुभाषबाबूंना देशद्रोहाखाली अटक करणार होते

आणखी काही आठवणी सांगताना प्रतिभा रानडे यांनी पंडित नेहरुंनी माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला. एकदा एेतिहासिक प्रदर्शन पाहण्यासाठी एके ठिकाणी गेले असता तिथे पंडित नेहरु यांनी माउंट बॅटनला लिहिलेले पत्र पाहिले. त्या पत्रात असे लिहिले होते की, स्वातंत्र्यानंतर सुभाषचंद्र बोस व त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या लोकांनी आम्ही देशद्रोही ठरवणार आहोत व त्यांच्याविरोधात खटला चालवणार आहोत. परंतु, हे पत्र आम्ही पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र गायब झालेले होते. तर ते का व कोणाच्या दबावामुळे, असा प्रश्न मला पडतो।



राजीव गांधी न्याय देऊ शकले नाही

प्रतिभा रानडे यांनी यावेळी राजीव गांधींची घेतलेली भेट, तलाकपीडित मुस्लिम महिला याबद्दलचीही आठवण सांगितली. हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चन बाईचे प्रश्न सारखेच असतात. मुस्लिम स्त्रियांच्या बुरख्याआडची घुसमट आपण सहन करु शकत नाही. तसेच ख्रिश्चन महिला सामाजिक दबावामुळे सत्य लिहू शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठीही मी काही लिहिले, असे प्रतिभा रानडे म्हणाल्या. शहाबानो प्रकरणावेळी हमीद दलवाईंबरोबर मोर्चात मीदेखील सामील होते. तसेच राजीव गांधी यांचीदेखील आम्ही भेट घेतली. परंतु, तुम्ही ३०-४० जण आहात व बाहेर लाखोंचे मोर्चे निघत आहेत, मी काय करु, मी काय करु शकतो, असे उत्तर आम्हाला राजीव गांधी यांनी दिले. मुस्लिम महिलांची प्रश्न समजावून न घेऊन राजीव गांधी त्यांना न्याय देऊ शकले नाहीत, असे प्रतिभा रानडे यांनी सांगितले.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121