दिब्रिटोंकडून ‘जेएनयु’ हिंसाचाराचे समर्थन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020   
Total Views |

DE_1  H x W: 0


धाराशिव :सरस्वतीचे पूजक असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणे ही कुठली संस्कृती? ज्यांना शिष्यवृत्ती, पदवी प्रदान करायची त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारणे ही कुठली संस्कृती?,” असे प्रश्न विचारत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी नाव न घेता जेएनयु व जामिया मिलिया इस्लामियातील हिंसाचाराचे समर्थन केले.


९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद येथे करण्यात आले. उद्घाटन समारंभाची सुरुवात देवीच्या पारंपरिक गोंधळाने तसेच दीपप्रज्वलनाने झाली. संमेलनाच्या उद्घाटनावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, उद्घाटक ‘पद्मश्री’ रानकवी ना. धों. महानोर, ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणाताई ढेरे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे, फ. मु. शिंदे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री अनुराधा पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच साहित्य परिषद व साहित्य महामंडळाचे सदस्य-पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयसिंगराव देशमुख यांनी केले तर स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी उस्मानाबादला साहित्य संमेलन घेतल्याबद्दल आभारदर्शक मनोगत व्यक्त केले.


दरम्यान, प्रत्येक साहित्य संमेलनाची सुरुवात जशी ग्रंथदिंडीने होते, तशीच ती यंदाही झाली. मात्र, यंदाचे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो या ग्रंथदिंडीत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन सहभागी झाले नाहीत.


आपल्या अध्यक्षीय भाषणात फादर दिब्रिटो म्हणाले की, “अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होत असून नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या त्याचेच निदर्शक आहे. विचारवंतांची, लेखकांची हत्या करणारी ही कुठली संस्कृती? अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करून आपले म्हणणे मांडणार्‍यांना तुरुंगात टाकणे, ही कुठली संस्कृती?” असे प्रश्न दिब्रिटो यांनी यावेळी विचारले.


पुढे मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून फादर दिब्रिटो यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसाचार व पोलीस कारवाईवर मत मांडले. विद्यार्थ्यांच्या हिंसाचाराचे समर्थन, पोलिसी कारवाईचा विरोध करणारे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले. “विद्यार्थी म्हणजे सरस्वतीचे पूजक, शिष्यवृत्त्या, पदव्या मिळवणारे व आपण त्यांना ते प्रदान करणारे! मात्र, याच विद्यार्थ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली जाते, ही कुठली संस्कृती?,” असा सवाल त्यांनी केला. “नुकताच झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. परंतु, विद्यार्थी खवळून उठले तर, सत्तेची धुंदी हळूहळू उतरेल. दुसर्‍यांच्या द्वेषावर जगणार्‍यांच्या विरोधात आपण शांत बसायला नको,” असेही ते म्हणाले.


दरम्यान, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अन्य अनेक विषयांवरही मत मांडले. “माझ्या अध्यक्षपदावरील निवडीनंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले. तसेच काहींनी विरोधही केला. परंतु, मी येशूचा उपासक आहे. येशूने मला इतरांना क्षमा करण्याचीच शिकवण दिली आहे. महामानव येशू आकाशाला भिडलेले व्यक्तिमत्त्व होते व त्यांच्या मार्गदर्शनानुसारच माझी वाटचाल सुरू आहे.”


“मी मराठी भूमीत जन्मलो,” असे म्हणत,“संतांच्या सहवासात मी मोठा झालो. जो मराठी त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. संत साहित्य माझ्यासाठी दिशादर्शक आहे. एकाचवेळी स्पष्टवक्तेपणा व करुणेचे काळीज असलेले तुकोबा माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्त्व आहे,” असेही ते म्हणाले.


इंग्रजी माध्यमाच्या शाळा, वाचनसंस्कृती व पर्यावरण यावरही फादर दिब्रिटो यांनी आपले विचार व्यक्त केले. “मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा,” अशी मागणीही त्यांना केली. सोबतच, “वाचनसंस्कृतीचा विकास झाला पाहिजे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, “मूलतत्त्ववादाची चर्चा सध्या जगभर होताना दिसते. परंतु, आपल्याला परस्परांत भिंती बांधून चालणार नाही तर पूल बांधायला हवेत,” असे दिब्रिटो यांनी सांगितले.



‘लेखक, कलावंतांना जात-धर्म नसतो’

मावळत्या संमेलनाध्यक्षा अरुणाताई ढेरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “साहित्य संमेलनाच्या एका वर्षाच्या काळात मी अनेक ठिकाणी फिरले. परंतु, आठवी ते बारावीपर्यंत शिकवणार्‍या अध्यापकांना मी प्रामुख्याने भेटले. कारण, अध्यापक केवळ पाठ्यक्रम शिकवत नसतात तर भाषा व साहित्याविषयीचे प्रेम जागृत करण्याचे कामही ते करत असतात व त्याच उद्देशासाठी मी हा उपक्रम केला. तसेच ग्रंथालयांसाठी अनुदानात वाढ केली पाहिजे व महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील मराठी साहित्य संस्थांना कायमस्वरूपी अर्थपुरवठा व्हायला हवा,” अशी मागणी लावून धरल्याचेही त्या म्हणाल्या.


दरम्यान, फादर दिब्रिटो यांना झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अरुणाताई ढेरे म्हणाल्या की, “फादर दिब्रिटो व माझा १५-२० वर्षांचा स्नेह आहे. विचारसरणीमध्ये मतमतांतरे असतातच. परंतु, लेखक, कलावंत वा साहित्यिकांना जाती-धर्मांत बंदिस्त करू नये,” असे सांगून त्यांनी शेख महंमदांपासून ते अनेक अमराठी लेखक व कवींची उदाहरणे दिली. “कोणत्याही संघटनांनी संभ्रम पसरवू नये, कोणतीही संस्कृती धमकी देणार्‍यांच्या आरोळ्यांवर तरत नाही,” असेही त्या म्हणाल्या.



 लक्ष्मीबाई टिळकांचे काय करणार?

संमेलनाचे उद्घाटक रानकवी ना. धों. महानोर यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उदाहरणे देत, “साहित्यिक राजकारण्यांत द्वैत नाही,” असे सांगितले. तसेच, “मराठवाडा मागासलेला नाही, इथे अनेक लेखक, कलावंत, साहित्यिक घडले आहेत. अजूनही घडत आहेत, तरीही तुम्ही मराठवाड्याला मागास कसे म्हणू शकता?,” असा सवाल त्यांनी केला. तसेच,‘’इथे केवळ पाण्याचा प्रश्न आहे, पाणी आले तर मराठवाड्याचा नक्कीच विकास होईल,” असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, फादर दिब्रिटो यांच्या निवडीला झालेल्या विरोधावरही महानोर यांनी आपले मत व्यक्त केले. “साहित्यिकाची जात व धर्म केवळ उच्च साहित्य हीच असते. त्यात जात वा धर्माचा विषयच येत नाही. इथे विषय केवळ माणुसकीच्या धर्माचा असतो.” हे सांगतानाच त्यांनी लक्ष्मीबाई टिळकांचे उदाहरण दिले.

लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेले स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र आजही मराठीत प्रमाण मानले जाते. परंतु, त्या स्वत: ख्रिश्चन होत्या. आज त्यांच्या नावाने कितीतरी पुरस्कार साहित्य क्षेत्रात दिले जातात. जर एखाद्याच्या धर्मावरून विरोध करायचाच असेल तर तुम्ही लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांनी आत्मचरित्रांच्या जगात घालून दिलेला मानदंड आणि त्यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे काय करणार आहात?,” असा सवाल त्यांनी विचारला.

@@AUTHORINFO_V1@@