सुप्रजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



स्तन्य निर्मित होण्यासाठी मातेचा 'विशिष्ट' आहार असणे महत्त्वाचा आहे. आहाराचा काही अंश मातेच्या पोषणासाठी वापरला जातो आणि काही अंश स्तन्यासाठी गर्भिणी अवस्थेत आहाराची मात्रा अधिक असते. तसेच प्रसुतीपश्चातही अधिक पौष्टिक आहाराची मातेला गरज असते.


बाळाचा जन्म झाल्यावर किमान पहिले सहा महिने स्तन्यपान करणे अत्यंत गरजेचे आहे. स्तन्यपान करतेवेळी मातेने आपल्या आहाराचा आणि दिनक्रमाचा काटेकोररित्या विचार करून पालन केले पाहिजे. स्तन्य हे बाळासाठी पूर्णान्न असते. त्याची शारीरिक, मानसिक वाढ, प्रतिकार क्षमतेची वाढ, झोप आणि आरोग्य हे सगळं स्तन्यावर अवलंबून आहे. मातेने घेतलेला आहार, औषधे व अन्य काही घटक यांचे सार स्तन्यामार्फत बाळाला मिळतो. तसेच भूक लागल्यावर स्तन्यपान केल्याने ते शिळे होणे, खराब होणे, जंतुसंसर्गयुक्त होणे इ. काहीच घडू शकत नाही. म्हणजेच Contaminationचे प्रमाण आटोक्यात ठेवता येते. तसेच स्तन्य हे बाळासाठी सहज सात्म्य असते, म्हणजेच त्याचा अपाय होत नाही. स्तन्यपानाचा अजून एक महत्त्वाचा फायदा होतो. मातेचे बाळाशी दृढ संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते. प्रेमाने, मायेने, वात्सल्याने स्तन्यपान केल्याने बाळाला सुरक्षित वाटते आणि आई-बाळाचे भावनिक नाते लहानपणीच तयार होते. जन्मानंतर पहिले दोन दिवस बाळाला खूप भूक लागत नाही. प्रसव होते वेळीचे कष्ट, बाह्य वातावरणाशी आलेला संपर्क आणि प्रसव होण्यापूर्वी नाळेमधून मिळालेला पोषकांश शरीरात थोडा शिल्लक राहिल्याने पहिले दोन दिवस थोडीच भूक लागते. मातेला सर्वप्रथम जो स्तनातून स्राव येतो, तो थोडा अधिक दाट व चिकट असतो. हा पचायलाही थोडा जड असतो. म्हणूनदेखील बाळाला पहिले दोन दिवस थोडेच स्तन्यपान पुरते. त्यानंतर हळूहळू स्तन्यांची निर्मितीही अधिक मात्रेत होण्यास सुरू होते आणि बाळाची भूकही वाढते. प्रसुतेने आपला आहार, विहार, आचरण आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ठेवले, तर स्तन्यनिर्मिती उत्तम तर होतेच, पण ते स्तन्य उत्तम प्रतीचे आणि बाळाच्या वाढीस पूरक असे तयार होते.

 

शुद्ध (दोषविरहीत) स्तन्य कसे ओळखावे याबद्दलही आयुर्वेदशास्त्रात खालील गोष्टी नमूद केल्या आहेत. स्तन्य हे शंखाच्या रंगाप्रमाणे पांढरे शुभ्र असावे व थोडे स्निग्ध (स्नेहांशयुक्त) असावे. ते दिसायला स्वच्छ व पातळ असते. स्पर्शाला थंड वा अनुष्ण शांत (न थंड न गरम) असे असावे. स्तन्य चवीला गोड असावे. तसेच एका काचेच्या बाटलीत स्वच्छ पाणी घ्यावे. या पाण्यात स्तन्याचे तीन-चार थेंब घालावेत. जर हे थेंब पाण्यात सहजपणे एकजीव झाले, तर हे स्तन्य शुद्ध समजावे. हे शुद्ध स्तन्य मातेच्या तसेच बालकाच्या आरोग्यासाठी हितकर व पोषक आहे. असे स्तन्य निर्मित होण्यासाठी मातेचा 'विशिष्ट' आहार असणे महत्त्वाचा आहे. आहाराचा काही अंश मातेच्या पोषणासाठी वापरला जातो आणि काही अंश स्तन्यासाठी गर्भिणी अवस्थेत आहाराची मात्रा अधिक असते. तसेच प्रसुतीपश्चातही अधिक पौष्टिक आहाराची मातेला गरज असते. पण, एक काळजी अवश्य घेतली पाहिजे. अजीर्ण होता नये. मातेचा दिनक्रम थोडा बदललेला असतो. तिची शारीरिक हालचाल, कष्ट, व्यायाम याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पौष्टिक व पचायला जड आणि उशिरा पचणारे अन्न जर खाल्ले, तर मातेला व बाळाला दोघांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खूप जड खाणे टाळावे. तांदूळ आणि मुगाचा वापर अधिक करावा. जुने तांदूळ भाजून त्याच्या पिठाचे घावन, पानगी इ. करण्यासाठी करावा. मऊ भात, भाताची पेज, लाप्शी, खीर इ. प्रकार करून खावेत. हे ताजे बनवून खावे आणि खाताना त्यात लोणकढे तूप घालावे. (लोणकढे तूप म्हणजे लोण्यापासून तयार केलेले साजूक तूप) हे तूप घरी तयार केल्यास उत्तम घावन करताना थोडी लसूण घातल्यास पोटाच्या तक्रारीही कमी होतात. पानगी करताना केळ्याच्या पानाचा स्वाद त्याला येतो आणि ते लोण्याबरोबर खावे. (लोणीसुद्धा घरी तयार केलेले असल्यास त्याला चांगला वास व चव असते. बाजारातील आणल्यास ते खूप शिळे असल्याने एक वेगळाच वासयुक्त असते.)

 

बाळंतिणीने मिरची, मसालेदार, चमचमीत जेवण टाळावे. अन्नामध्ये काळीमिरी, आलं, लसूण या पदार्थांनी चव आणावी. (पण, यांचाही अतिरेकी वापर टाळावा.) खूप तिखट आणि 'स्पायसी' आहार जर स्तन्यपान सुरू असलेल्या काळात बाळंतिणीने केला, तर सदोष स्तन्य उत्पन्न होते. तसेच बाळाला हे अन्न त्रासदायक ठरू शकते. त्याची आतडी आणि पचनशक्ती नाजूक असते. अशा आहाराने जुलाब, अंगावर चट्टे उठणे इ. त्रास बाळाला होऊ शकतो. मातेने अधिक खाल्ल्याने जर अजीर्ण झाले, तर त्याचा परिणाम स्तन्यामार्फत बाळावरही होतो. बाळालाही अपचन होऊन पोटदुखी, पातळ दुर्गंधित शौच, फेसाळ शौच या तक्रारी होऊ शकतात. पण, वारंवार जर असे होत राहिले, तर त्वक्विकार, श्वसनाचा त्रास, पोटाच्या तक्रारी इ. दीर्घकालीन उत्पन्न होऊ शकतात. तेव्हा सात्त्विक आणि पौष्टिक आहार घ्यावा. पचायला हलका आणि समाधान देणारा असावा. तूप आणि लोणी आवर्जून बाळंतिणीने स्तन्यपान सुरू असेपर्यंत खावे. लोण्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध इ. तक्रारी उद्भवत नाहीत. समानाने समानाची वृद्धी होते, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. स्तन्यनिर्मितीसाठी रोज बाळंतिणीने दूध प्यावे. शिरा (तूप आणि दूध घालून) खावा. वेगवेगळ्या खिरी (तांदूळ, रवा, अळीव इ.) घ्याव्यात. बाळंतिणीचा आहार हा झीज भरून काढून धातुवर्धक करणारा तर असावाच, पण त्याचबरोबर पथ्यकरही असावा. सांध्यांना बळकटी मिळावी. कंबर-पाठदुखी होऊ नये (व होत असल्यास थांबावी) यासाठी डिंकाचा वापर करावा. खारीक-खसखस-डिंक (तुपात तळलेला डिंक वापरावा) यांचा लाडू रोज (फक्त १ लाडू) खावा. सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात, पण मोड आलेली कडधान्ये व पालेभाज्या यांचे प्रमाण कमी ठेवावे. (आठवड्यातून एकदा) असे सर्व सांगितले असले, तरी बाळंतिणीच्या प्रकृतीनुसार, ऋतुमानानुसार आणि इतर तक्रारींनुसार या पथ्यात बदल करावा. हा बदल मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. बाळंतिणीने गरम पाणी प्यावे. याने पचनास मदत होते. तसेच जेवल्या-जेवल्या आडवे राहू नये. चहा-कॉफीचा अतिरेक टाळावा. फळांचाही अतिरेक नसावा. ऋतुमानानुसार फळे अधूनमधून थोड्या प्रमाणात खाल्ल्यास चालेल. (क्रमश:)

@@AUTHORINFO_V1@@