खरेच आहे, संतोष यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अंबरनाथ येथे संतोष आदक यांना गुरुस्थानी मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा...
संतोष एनआरसीच्या शाळेत शिक्षक होते. त्यावेळी अंबरनाथमध्ये 'द एज्युकेशन सोसायटी'ची एक शाळा होती. शाळेला स्वत:ची इमारत नव्हती. मात्र, संतोष यांनी शाळेच्या कामाची जबाबदारी घेतली आणि शाळेचे रूपच पालटले. दोन दशकांमध्ये स्वत:ची इमारत असलेल्या शाळेच्या ११ शाखा सुरू झाल्या. पाच माध्यमिक, चार प्राथमिक, एक महाविद्यालय, एक गुरुकुल आणि एक मुक्तांगण अशा स्वरूपात 'द एज्युकेशन सोसायटी'चा विस्तार आणि कायापालट झाला. अंबरनाथ, शहाड आणि मोखाडा या परिसरामध्ये गरजू-गरीब मुलांना शिक्षणासोबतच संस्कार आणि भवितव्य देणारी शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आज आहे. अर्थात, हे सहजासहजी झालेले नाही. या कार्यामागे संतोष आदक यांची चिकाटी आणि कष्ट आहेत. शाळेचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी संतोष २४ तास प्रयत्नशील असता आणि आजही करतात. 'मुठभर धान्य' ही त्यांची संकल्पना परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. ते परिसरामधून परिचितांकडून मुठभर धान्य गोळा करतात आणि गरजू वंचितांना देतात. हे मुठभर धान्य किती गोळा झाले असेल? जवळ जवळ १५ क्विंटल धान्य. यावरूनच संतोष आदक यांच्यावर लोकांचा किती विश्वास आहे दिसून येते. 'क्रीडाभारती'ची जबाबदारी पार पाडतानाही संतोष यांचे कितीतरी विद्यार्थी प्रशासकीय आणि खाजगी क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, हे सारे विद्यार्थी आज समाजभान बाळगून आहेत. संतोष आदक यांचे हे यश पाहिले की वाटते, त्यांना चांगले पाठबळ असेल. त्याशिवाय का हे सारे घडले, असे विचारल्यावर संतोष म्हणतात, "हो आहे ना, मला खूप मोठे पाठबळ आहे. कधीही न संपणारी ताकद माझ्याकडे आहे. ती ताकद आहे रा. स्व. संघातून मिळालेली सत्य आणि राष्ट्रनिष्ठेची शिकवण. समाजप्रेमाची शिकवण."
संतोष आदक यांचे म्हणणेही खरे होते. कारण, आदक कुटुंब लोणी, आंबेगाव पुण्याचे. संयुक्त कुटुंब. संतोष यांचे वडील बाळाजी आणि आई चंद्रभागाबाई चारचौघातल्या शेतकरी कुटुंबासारखेच कष्टकरी. आदक कुटुंबाची स्वत:ची शेतजमीन. मात्र, बाळाजी सातत्याने आजारी असल्यामुळे चंद्रभागाबाई आणि संतोष यांचे काका-काकू शेती कसत असत. त्यातही १९६५ ते १९७२ साली मोठा दुष्काळ पडला. शेतकर्यांची परिस्थिती बिकट झाली. आदक कुटुंबालाही त्याचे चटके सोसावे लागले. चंद्रभागाबाई त्यावेळी धरण बांधण्याच्या कामावर जात आणि शेतीकामही करत. लहान संतोषही आईच्या मदतीला जायचे. कित्येक वर्षे संतोष यांना केवळ एकच कपडा होता. तोच शाळेत घालायचा, तोच घरीही घालायचा. अंघोळ करून शेतीला पाणी देताना तो कपडा धुवून सुकवायचा. असे जगणे. पण, पर्याय नव्हता. संतोष पहाटे लवकर उठत. रानात जात, शेण गोळा करत. घरातल्या उकिरड्यात टाकत. नंतर लाकूडफाटा गोळा करायला जात. तो आईला देऊन, शेतात जात. तिथे शेताला पाणी देऊन अंघोळ करत, मग घरी येऊन चहा आणि रात्रीची भाकरी खात. त्यानंतर पुढे शाळा. नंतर पुन्हा शेतीकाम आहेच. मात्र, आठवीला असताना यामध्ये थोडा बदल झाला. शाळेत एकनाथ कुलकर्णी गुरुजी आले. ते संघाची शाखा चालवायचे. संतोषही शाखेत जाऊ लागले. घर, शेत आणि कष्ट याबाहेर दुसरेही जग आहे. आपला समाज, आपला देश आहे. त्यासाठी आपण काहीतरी करायचलाच हवे, ही जाणीव इथेच निर्माण झाली. अकरावीला एनआरसीमध्ये कामाला लागल्यानंतरही सलग रात्रीपाळी करून त्यांनी बी.ए, बी.एड शिक्षण पूर्ण केले. त्याच महाविद्यालयात त्यांना शिकवण्याचीही संधी मिळाली. पुढे एनआरसीच्या शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षकीपेशामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क आला. विद्यार्थी घडवताना त्यांच्यामध्ये समाजनिष्ठा, राष्ट्रप्रेम निर्माण करणे हे त्यांनी ध्येय ठरवले. पुढे अंबरनाथमध्ये रा. स्व. संघाच्या अनेक जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. हे सगळे करत असतानाच त्यांचे सामाजिक क्षेत्रही विस्तारत होते.
या सगळ्या परिवर्तनाचा बिंदू काय? संतोष म्हणतात की,"मला गावी पोलीस पाटलाची नोकरी मिळत होती. माझ्या घरच्यांची इच्छा होती की, मी ती नोकरी करावी. पण, कुलकर्णी हे गावातील एक मातब्बर व्यक्ती होते. त्यांना सगळे गाव मानायचे. ते माझ्या भावाला म्हणाले, "अरे, याला कुठे या नोकरीच्या फंदात पाडतोस." पुढे ते जे म्हणाले, ते माझ्या आयुष्याचे संचित आहे. ते म्हणाले, "अरे हा संघाचा स्वयंसेवक. धर्मसमाज देशाचे काम करणारा. संघाने याच्यात निर्माण केलेला नि:स्वार्थी, साधेपणा, समाजाचे प्रेम याला समाजामध्ये पेरावे लागेल. त्यासाठी त्याने त्याला साजेशी नोकरी करावी." त्यांचे ऐकून भावाचे मतही बदलले आणि मीही पुन्हा मुंबईला आलो आणि पुढे शिक्षक झालो. संघ स्वयंसेवक म्हणून गावच्या प्रमुखाने माझ्यावर किती मोठा विश्वास दाखवला होता. तो विश्वास मला माझ्या पुढच्या आयुष्यात खूप आत्मविश्वास देऊन गेला." सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना आदक म्हणतात की, "पारंपरिक मराठा कुटुंबात जन्मलेला मी. आम्हाला आमच्या घरून हाच संदेश मिळाला की, जातपात नव्हे, तर माणूसच माणसाच्या कामाला येतो. माझा जन्म १९४७ सालचा. त्यावेळची आजी आजही आठवते. संध्याकाळी गावातील 'येसकर' म्हणजे साफसफाई करणारे घरात यायचे. आजीला म्हणायचे, "आम्ही आलो, भाकरी द्या." आजी म्हणायची," थांब बाबा. गरम गरम भाकरी बनवते" आणि ती दररोज गरम गरम भाकरी बनवून त्या मंडळींना द्यायची. गावकुसाबाहेर राहणारी मंडळी ही घरी आजी-आजोबांचा आणि वडिलांचा सल्ला घ्यायला यायची. ते संस्कार आज मला मार्ग दाखवतात की, आपण सगळे एक आहोत. समाज 'आपला' आहे.