‘कलम ३७० हा राजकीय नाही तर राष्ट्रीय मुद्दा – उपराष्ट्रपती

    27-Aug-2019
Total Views |


 


विजयवाडा : कलम ३७० रद्द होणे हा राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारुन दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावर एकमुखाने बोलण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. या मुद्यावरील आपल्यातील मतभिन्नतेचा दुरुपयोग शेजारी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर करु शकतो, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

१९६४ मध्ये खासगी विधेयकावर झालेल्या चर्चेत सदस्यांनी पक्षभेद विसरुन ते रद्द करण्याची मागणी केली होती, असे सांगून त्याबाबत छापून आलेला वृत्तांत उपराष्ट्रपतींनी दाखवला. कलम ३७० रद्द झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये औद्योगिकीकरण, रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांनी आपल्या लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता तयार करावी, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय नेत्यांविरुद्धचे फौजदारी खटले लवकर निकाली निघावेत, यासाठी विशेष न्यायिक लवाद स्थापन करण्याला त्यांनी समर्थन दिले.