नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना जिंकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तसेच, कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने विंडीजला ३१८ धावांच्या फरकाने हरवल्याने भारताला गुणतालिकेत मोठी आघाडी मिळाली. सध्या भारत ६० गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी श्रीलंका तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे, तर सर्वात शेवटी म्हणजे ९ नंबरवर पाकिस्तानचा संघ आहे. दरम्यान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघाने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. धडाकेबाज विजयासह भारतीय संघाने आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. भारताने या विजयासह गुणतालिकेत आपले खाते उघडलेच. मात्र, यासह गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले.
परदेशी भूमीवर सर्वात मोठा विजय
भारताने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सर्वात सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी भारताने श्रीलंकेवर ३०४ धावांनी मात केली होती. भारताचा हा कसोटीतील चौथा सर्वात मोठा विजय आहे. २०१५-१६ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या विजयाची नोंद परदेशी जमिनीवरील सर्वात मोठ्या विजयामध्येच केली जाईल.
बुमराहची जादू... 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
विंडीजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताच्या ४१९ धावांचा पाठलाग करताना बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर एकही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. जसप्रीत बुमराहने फक्त ७ धावांमध्ये ५ विकेट घेऊन इतिहास रचला. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या देशांविरुद्ध एकाच डावात ५ गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच, भारताच्या वतीने बुमराहने कमी कसोटी सामन्यांमध्ये ५० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.