बाळ जन्मल्यावर त्याच्या शारीरिक विकासामध्ये काही विशिष्ट टप्पे आहेत. जसे मान सावरणे, पालथे पडणे, पोटावर सरकण्याचा प्रयत्न करणे, रांगणे, बसणे इत्यादी. या सगळ्या हालचालींसाठी स्नायूंची वाढ होणे महत्त्वाचे आहे. मांसपेशी जशा बलवान होतील, त्यांची क्षमता वाढेल, बाळ तशा वरील हालचाली करू शकते.
प्राकृत प्रसुती (Normal Delivery) ही ३६ ते ४० आठवड्यात कधीही होऊ शकते. गर्भाची वाढ, गर्भवतीचे स्वास्थ्य, गर्भोदक (Amniotic fluid) इ. गोष्टींवर प्रसुतीची वेळ ठरते. एकापेशीपासून प्रवास सुरू होऊन संपूर्ण अंग-अवयवांनी युक्त विकसित गर्भ हा प्रवास गर्भवतीच्या शरीरात होत असतो. या प्रवासानंतर बाळाचे बाह्य जगतात आगमन होते, म्हणजेच बाळाचा जन्म होतो. गर्भस्वरूपात जरी सर्व अंग-अवयव तयार झाले असले, तरी सर्व अंग-अवयव स्वतः कार्यरत नसतात. मातेच्या शरीरातील पोषक वातावरण व आहार यावर ते संपूर्णतः अवलंबून असते. जन्मल्या जन्मल्या बाळ रडले की, त्याची फुप्फुसे कार्यरत होतात. अशाच पद्धतीने प्रत्येक अवयव मातेपासून वेगळा झाल्यावर काम करू लागतो. साधारणत: भारतीय बालकाचे जन्माच्या वेळी वजन अडीच ते साडेतीन किलो इतके असते. गर्भात असते वेळी मातेच्या आहारातूनच पोषक अंश मिळत असतात. जन्मानंतर ते अन्न स्तन्याच्या स्वरूपात बालकाला उपलब्ध होऊ लागते.
मनुष्य शरीर हे अत्यंत विकसित पद्धतीने रचलेली रचना आहे. अन्य पशु-प्राण्यांची पिल्लं जन्मताच स्वतंत्रपणे हिंडू-फिरू लागतात. पण, मानवी बाळाचे तसे होत नाही. प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक , वाचिक आणि वैचारिक वाढीला विशिष्ट काळ उलटावा लागतो. भूक, तहान आणि झोप हे मूलभूत असल्याने ते शिकवावे लागत नाही. बाळाची झोप जन्माला आल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते २२ तास इतकी असते. भूक लागल्यावर शौचकर्म केल्यावर ते जागे होते व पुन्हा झोपते. जन्मल्यानंतर बाळाचे जे वजन असते, ते पुढील आठवड्यांमध्ये थोडे कमी होते, हे स्वाभाविक आहे. नंतर हळूहळू वजन वाढू लागते. बाळाला पुरेशी झोप आणि दूध मिळत असेल, पचनक्रिया नीट होत असेल, तर जन्मावेळचे वजन एका महिन्याच्या आत पूर्ववत होते. साधारणपणे सहा महिन्याचे बाळ झाले की, त्याचे जन्मावेळच्या वजनापेक्षा दुप्पट वजन होते. पहिल्या वाढदिवसापर्यंत साधारणपणे ते तिप्पट वजन झालेले असते, ही एक सरासरी आहे. प्रत्येक बाळातील खाण्यापिण्याच्या, झोपेच्या सवयीनुसार वजन वाढण्याच्या गतीत थोडा फार फरक पडू शकतो. बरेचदा घरातील माणसांना 'गुटगुटीत' बाळ दिसले की ते स्वास्थ्यपूर्ण (Health) आहे असे वाटते. पण, हा चुकीचा समज आहे. महिन्यानुरुप वाढ, झोप, शौचकर्माचे तंत्र आणि भूक आदी व्यवस्थित असेल, तर वजन कमी असले तरी त्याची काळजी करू नये. बरेचदा अंगावर पिणारे बाळ खूप 'गुटगुटीत' नसते, पण त्याची वाढ आणि प्रतिकारशक्ती उत्तम असते. या उलट पावडरचे दूध पिणारी बालके ही 'गुटगुटीत' असतात, पण त्यांना बरेचदा शौचाची तक्रार असते. म्हणून फक्त वजनावर वाढीचा निकष ठरवू नये.
जन्मल्यानंतर बाळाची पाचही ज्ञानेंद्रिये हळूहळू काम करू लागतात. सगळ्यात आधी स्पर्शज्ञान विकसित होते. बाळ रडू लागले की, थोपटल्यास शांत होते. झोपवतानाही अंगावरून थोपटल्यास लवकर झोपते. मांडीची ऊब, हाताची माया हे आधी कळू लागते. ओळखीचा स्पर्श (आईचा, आजीचा वडिलांचा इ.) बाळाला लवकर शांत करतो. यानंतर श्रवणेंद्रिये विकसित होतात. बाळाला ओळखीचा आवाज ऐकू आला की, ते लवकर शांत होते. गर्भात असताना जर आईने बाळाशी गप्पा मारल्या असतील, गाणी म्हटली असतील, स्तोत्र म्हटली असतील, तर तो आवाज आणि ते शब्द ओळखीचे असल्याने ते आपलेसे वाटतात. झोपताना, आजारी असल्यावर बाळ त्या आवाजाने लवकर शांत होते. तसेच, एखादे गाणे, संगीत जर मातेने गर्भावस्थेत ऐकले असेल, तर त्या संगीताचाही सकारात्मक परिणाम बाळावर होताना दिसतो. त्यानंतर नजर स्थिरावते. लहान बाळाला भडक रंग आधी समजू लागतात. म्हणून झाडं, फुलं, पानं हे बघायला त्याला आवडते. नजर स्थिर होण्यास अडीच ते तीन महिने लागतात. (बाळ अडीच ते तीन महिन्याचे झाले की ओळखू लागते.) रोजच्या वावरामधील व्यक्तींना बाळ ओळखू लागते. मालिश करणारी आजी, घरातील मंडळी यांचे चेहरे बाळ ओळखू लागते. हळूहळू वास आणि चव समजते. पण, ही दोन इंद्रिये नंतर विकसित होतात. बाळ जेवढे ऐकेल, तेवढे त्याचे भाषाज्ञान विकसित होते. घरातील सतत बाळाशी बोबडं-बोबडं बोलत असतील, तर त्याची वाचाही तशीच होते. कारण, जे कानावर पडते, तेच ते नंतर बोलते. याचबरोबर भाषा शुद्ध हवी असल्यास मोठ्या माणसांनी एकाच भाषेचा वापर करावा. मराठी-इंग्रजी मिश्रित बोलू नये. पहिल्या पाच वर्षांमध्ये बाळ जेवढे एकते, तेवढे ते आत्मसात करते. अधिकाधिक भाषा याव्यात, पण शुद्ध याव्यात, मिश्रित नव्हे.
जन्मल्यावर शारीरिक विकासामध्ये काही विशिष्ट टप्पे आहेत. जसे मान सावरणे, पालथे पडणे, पोटावर सरकण्याचा प्रयत्न करणे, रांगणे, बसणे इत्यादी. या सगळ्या हालचालींसाठी स्नायूंची वाढ होणे महत्त्वाचे आहे. मांसपेशी जशा बलवान होतील, त्यांची क्षमता वाढेल, बाळ तशा वरील हालचाली करू शकते. मान धरणे, उचलताना मान सावरणे हा टप्पा साधारण अडीच-तीन महिन्यांपर्यंत येतो. नजरही स्थिर होते, चेहरे-रंग ओळखता येतात. आवाज ओळखता येतात. या काळात आवाजाच्या दिशेने बघणे किंवा बघण्याचा प्रयत्न सुरू होतो. चौथ्या महिन्यापर्यंत आवाजाच्या दिशेने मान वळवून बघणे सुरू होते. बोलल्यावर चेहऱ्यावरचे भाव बदलणे, हसणे, हुंकारणे, आनंद झाला की काहीतरी आवाज तोंडाने करणे आदी प्रतिक्रिया बाळ चौथ्या महिन्यात देऊ लागते. जसे बाह्य वातावरणाशी बाळ एकरूप होऊ लागते, त्याची झोप कमी होऊ लागते. तसेच हालचालीमुळे भूकही वाढते. तिसऱ्या महिन्यात मान सावरायला लागलेली असते. तसेच, कुशीवरही वळण्यास सुरुवात होते. चौथ्या महिन्यापर्यंत पालथे पडण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू पाचव्या महिन्यात पोटावर सरकरण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचदा आधी मागच्या दिशेने सरकले जाते. तसेच, आधाराने बाळ बसण्याचाही प्रयत्न करू लागते. या सगळ्या हालचालींमध्ये हाता-पायाचे स्नायू व पाठीचे स्नायू समाविष्ट असतात. पाठीचा मणका सशक्त असल्यास पाचव्या ते सहाव्या महिन्यात बाळ रांगू लागते. ही एक जटिल प्रक्रिया आहे, ज्यात Central Nervous System ही असते. हाता-पायांचा एकमेकांशी समन्वय, आवाजाच्या-उजेडाच्या दिशेने रांगणे इ. गोष्टी सहाव्या महिन्यापासून सुरू होतात. याच कालावधीत दातही येण्यास सुरुवात होते. हिरड्या शिवशिवतात. रांगत रांगत मिळेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न केला जातो. दात येताना लाळ खूप सुटते आणि पोटाच्या तक्रारी सुरू होऊ शकतात. साधारणत: या कालवधीपर्यंत केवळ मातेचे स्तन्य हाच आहार असावा. यामुळे विविध वाढीचे टप्पे उत्तम गाठले जातात, तसेच प्रतिकारशक्तीदेखील उत्तम निर्माण होते. या कालावधीत (० ते ६ महिने) बाळाची काय-काय काळजी घ्यायची याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊयात.
(क्रमशः)