ज्यू-अरब भाई-भाई, पैशासाठी सगळी घाई !

Total Views | 74


 


मोझेस बेन मैमोंचं सिनेगॉग म्हणजे इजिप्तची ऐतिहासिक वास्तूच आहे. या सिनेगॉगप्रमाणेच इजिप्तमधील आणखी आठ पडीक सिनेगॉग्स दुरुस्त करण्याची सरकारी योजना आहे.

 

'जम्हूरिया मिस्र अल अरेबिया' हे इजिप्तचं अधिकृत इस्लामी नाव आहे. त्याचा शब्दश: अर्थ, मिस्र देशाचं अरबी प्रजासत्ताक, असा आहे. या नावात अनेक गर्भित सूचक अर्थ आहेत. आमचा देश राजेशाही नसून प्रजासत्ताक आहे, हे प्रजासत्ताक अरबांचं आहे; अन्य कुणाचं नाही. तसंच हे मिस्रमधल्या अरबांचं प्रजासत्ताक आहे; अरबस्तानातल्या अरबांचं नव्हे, असाही त्यातला सूचक अर्थ आहे. इजिप्तची राजधानी कैरो (किंवा कायरो) आणि भूमध्य समुद्रावरचं त्याचं बंदर अलेक्झांड्रिया ही दोन्ही ठिकाणं जगप्रसिद्ध आहेत. पण, इजिप्शियन लोक स्वतः मात्र त्यांचा उल्लेख अनुक्रमे 'काहीरा' आणि 'अल इस्कंदरिया' याच नावांनी करतात. कारण, पहिली दोन नावं युरोपीय आहेत आणि नंतरची दोन नावं अरबी इस्लामी आहेत.

 

इजिप्तचे जगप्रसिद्ध पिरॅमिड्स, व्हॅली ऑफ किंग्ज, अबू सिंबेलच्या गुंफा, तिथले रामसिस राजांचे प्रचंड पुतळे, हजारो वर्ष जतन करून ठेवलेले राजे-राण्यांचे मुडदे म्हणजे मम्या, तुतनखामेनचा संपूर्ण सोन्याचा मुखवटा वगैरे प्राचीन गोष्टी पाहण्यासाठी जगभरातूनच पर्यटक इजिप्तकडे लोटत असतात. जागतिक इतिहास क्षेत्रात, फक्त इजिप्तच्या अभ्यासाला वाहिलेली 'इजिप्टॉलॉजी' ही स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे. अक्षरश: हजारो अभ्यासक आपापल्या देशांमध्ये इजिप्तबद्दलच्या संशोधनामध्ये मग्न आहेतखुद्द इजिप्तमधले लोक या सगळ्यामुळे खुश आहेत. कारण, या प्राचीन वारशामुळे इजिप्तचा पर्यटन व्यवसाय खूप भरभराटीला आला आहे. सामान्य माणसांना त्यातून विविध प्रकारे रोजगार मिळतो. राज्यकर्ते खुश आहेत. कारण, त्यातून भरपूर परकीय चलन मिळतं.

परंतु, या पलीकडे त्या प्राचीन संस्कृतीबद्दल, अवशेषांबद्दल इजिप्शियन लोकांना कसलाही जिव्हाळा नाही. लिंकन मेमोरियलच्या आसमंतात उभं राहिल्यावर अमेरिकन माणसाच्या भावना उचंबळून येतात. स्ट्रॅटफर्ड-अपॉन-अ‍ॅव्हॉन या शेक्सपियरच्या जन्मगावी गेल्यावर इंग्लिश माणूस भारावतो. रायगडावर शिवछत्रपतींच्या राजसिंहासनासमोर उभा राहिल्यावर हिंदू माणूस गहिवरतो, नतमस्तक होतो. 'हे प्राचीन वैभव माझं आहे. माझ्या समाजाच्या, राष्ट्राच्या अस्मितेचं हे प्रतीक आहे,' अशी भावना त्यांच्या हृदयात उसळून उठते.

 

इजिप्शियन माणसांना पिरॅमिडबद्दल अशी कोणतीही आत्मीयता वाटत नाही. कारण, इजिप्शियन माणूस स्वत:ला 'अरब-इस्लामी' समजतो. पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मूर्तिपूजक फारोह राजांची परंपरा ही आपली आहे, असं त्याला वाटतच नाही. 'रामसिस', 'सिसॉस्ट्रिस', 'सेती' अशी नावं असणार्या मूळ इजिप्शियन राजांचा निकाल लावून सन पूर्व ५२५ मध्ये 'कम्बायसिस' या बलाढ्य पर्शियन (म्हणजे इराणी) राजाने इजिप्त जिंकला. सनपूर्व ३३२ मध्ये अलेक्झांडरने पर्शियाच जिंकला. त्यामुळे इजिप्त आपोआपच त्याला मिळाला. अलेक्झांडरचे सुभेदार असलेल्या टॉलेमी घराण्याने, म्हणजेच ग्रीकांनी पुढे ३०० वर्षे इजिप्तवर राज्य केलं. शेवटचा टॉलेमी राजा आणि आंबटशौकीन लोकांनी पुन्हा पुन्हा घोळवून रंगवलेली त्याची बहीण क्लिओपात्रा यांचा निकाल लावून सनपूर्व ३० मध्ये रोमनांनी इजिप्त जिंकला.

 

यानंतर ६०० वर्षांनी अरबस्तानमध्ये इस्लामचा जन्म झाला. इजिप्त आणि अरबस्तान अगदी शेजारी शेजारीच. मध्ये फक्त लाल समुद्र. त्यामुळे इस्लामी अरब आक्रमकांच्या पहिल्यावहिल्या धर्मप्रसारक मोहिमा इजिप्तवरच आदळल्या. इ. स. ६४० मध्ये खलिफा उमरच्या नेतृत्वाखाली अरबांनी इजिप्त जिंकला आणि मूळचे इजिप्शियन, ग्रीक, रोमन, ज्यू, ख्रिश्चन अशा सगळ्यांनाच एक तर ठार मारलं किंवा बाटवलं. त्यामुळे आजचे इजिप्शियन नागरिक हे पूर्णपणे अरब आहेत. त्यांना फारोह राजवंश, पिरॅमिड्स, ममी याबद्दल काडीमात्र आपलेपणा वाटत नाही. आक्रमक इस्लामने जगभर सर्वत्र मूर्ती, प्रतिमा, मंदिरं, चर्चेस यांचा विध्वंस केला. परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार असल्यामुळे त्याची प्रतिमा, मूर्ती बनवणं इस्लामी धर्मतत्त्वाला मंजूर नाही. अगदी आता-आता, वर्तमान २१व्या अत्याधुनिक वगैरे शतकात इस्लामी कट्टरवाद्यांनी अफगाणिस्तानातल्या बामियां इथल्या विशाल बुद्धप्रतिमा सुरुंग लावून उडवून दिल्या. त्या हिशेबात खलिफा उमरच्या अरबांनी आणि नंतरच्या मामलूक तुर्कांनी पिरॅमिड्स गीझाची स्फिंक्स मूर्ती किंवा रामसिसच्या मूर्ती उडवून टाकल्या नाहीत, हेच विशेष म्हणायचं.

 

आता इजिप्शियन अरबांना या प्राचीन अवशेषांबद्दल जो किंचित जिव्हाळा वाटतो आहे, तो भावनिक नसून आर्थिक आहे. म्हणजे पिरॅमिड्स बघायला येणार्‍या पर्यटकांकडून पैसे मिळतात, म्हणून प्रेम... गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात इजिप्तमध्ये ज्यू आणि ख्रिश्चनही खूप प्रमाणात होते. म्हणजे पाहा, येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळवून ठार केल्यावर, जेरुसलेमच्या रोमन राज्यकर्त्यांनी येशूच्या अनुयायांना हद्दपार केलं. हे लोक मुख्यतः इजिप्तमध्ये पळाले. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून त्यांना 'ख्रिश्चन' असं संबोधलं जाऊ लागलं, ते इजिप्तमध्येच. येशूनंतर काही काळाने रोमनांनी संपूर्ण ज्यू जमातीलाच पॅलेस्टाईनमधून हद्दपार केलं. ते जगभर गेले, पण मुख्यतः इजिप्तमध्ये गेले. फारोह राजवंशाच्या काळात ज्यू लोक इजिप्तमध्ये गुलाम म्हणून राहत होते. तिथे त्यांच्यावर अतोनात जुलूम झाल्यामुळे मोझेस या त्यांच्या नेत्याने त्यांना लाल समुद्र ओलांडून पॅलेस्टाईनमध्ये नेलं होतं. ही घटना सनपूर्व १२६६ या वर्षी घडली असं मानलं जातं. म्हणजे १३-१४ शे वर्षांनंतर न्यू पुन्हा इजिप्तमध्ये आले.

 

यानंतर रोमन राजवट, ख्रिश्चन वर्चस्व, अरब-इस्लामी वर्चस्व, तुर्क-इस्लामी राजवट असं कालचक्र फिरत राहिलं. १९व्या शतकाच्या प्रारंभी फ्रेंचांनी तुर्कांकडून इजिप्त हिसकावला. लवकरच फ्रेंचांना हाकलून ब्रिटिशांनी तो बळकावला. २०व्या शतकाच्या प्रारंभी तर मध्यपूर्वेतला बराच मोठा भूभाग ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. यातल्या पॅलेस्टाईन भूभागात १९४८ साली इस्रायल हे ज्यू लोकांचं राष्ट्र निर्माण झालं. अरब राष्ट्रांच्या अगदी पोटातच इस्रायल हे बिगर अरब, बिगर इस्लामी राष्ट्र निर्माण होण्याला सगळ्या अरबांचा प्रचंड विरोध होता, पण ज्यू लोकांनी सर्व अरब राष्ट्रांशी निकराचा लढा देऊन आपलं राष्ट्र निर्माण केलंच. ही गोष्ट सर्वात जास्त मनाला लावून घेतली, ती इजिप्तने. इस्रायल हा इजिप्तचा शत्रू क्र.१ बनला. याचा अपरिहार्य सामाजिक परिणाम म्हणजे शतकानुशतकं इजिप्तमध्ये वसलेल्या हजारो ज्यू लोकांनी इस्रायलमध्ये स्थलांतर केलं.

 

इजिप्तचा अध्यक्ष अब्दल गमाल नासेर याने इस्रायलविरुद्ध पुन्हा एकदा युद्ध लढण्याची जोरदार तयारी सुरू केली. १९५६ साली त्याने, तोपर्यंत अँग्लो-फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या सुवेझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण केलं. हे निमित्त करून अँग्लोफ्रेंचांनी आपल्या फौजा सुवेझच्या कासावर उतरवल्या आणि इस्रायली फौजांनी सिनाई वाळवंटातून सुवेझकडे धडक मारली. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष आयसनबहार यांनी जबरदस्त राजनैतिक दडपण आणून ब्रिटिश, फ्रेंच आणि इस्रायल तिघांनाही माघार घ्यायला लावली. अरबांची अशी समजूत झाली की, हे नासेर यांच्या मुत्सद्देगिरीमुळे घडून आलं. त्यामुळे नासेर हे संपूर्ण अरब जगाचे हिरो बनले. मात्र, यातून अरबांचा ज्यू द्वेष आणखीनच भडकला. इजिप्तमधल्या उरल्या-सुरल्या ज्यूंना इस्रायलकडे पळून जाणं भागच पडलं.

 

तरीही काही ना काही कारणामुळे इजिप्तमध्ये अगदी आजही १०० ते ८० ज्यू लोक टिकून आहेत. इजिप्तच्या सुमारे सात कोटी लोकसंख्येत फक्त १०० ते ८० ज्यू लोक आहेत आणि इजिप्शियन अरब त्यांचा मन:पूर्वक द्वेष करतात. ती पाहा, जुन्या कैरो शहरातली एक जुनी, गजबजलेली वस्ती. वेडेवाकडे बोळ, गल्ल्या आणि माळ्यांनी सजलेली. नाक्यानाक्यावर खाद्यपदार्थ, चहा-कॉफीच्या टपर्‍या आहेत, कुठे अरबी संगीताचे सूर उमटतात, कुठे कुराण पठणाची सीडी वाजतेय, तर कुठे पाश्चिमात्त्य संगीताचा ढणढणाट कानठळ्या बसवतोय. या इकडच्या नाक्यावर खालिद बद्र नावाच्या मध्यमवयीन अरबाची खाद्यपदार्थांची टपरी सुरू आहे. तुम्ही त्याला विचारा की, ज्यू लोकांबद्दल तुझं काय मत आहे? तो स्पष्टपणे सांगतो की, "आम्ही त्यांचा तिरस्कार करतो. ते आमचे शत्रू आहेत."

 

खालिद बद्रच्या पलीकडच्या नाक्यावर ती जी नागमोडी गल्ली दिसतेय ना, तिचं नावच मुळी ज्यू आळी. तिथे आता एकही ज्यू घर नाही. पण, गल्लीच्या तोंडाशी त्या टोलेजंग नव्या मशिदीच्या बाजूला एक घर दिसतंय पाहा. त्याची जोरदार दुरुस्ती चालू आहे. ती दुरुस्ती खुद्द इजिप्त सरकार करतंय. तो पाहा इजिप्शियन पुरातत्त्व खात्याचा प्रमुख झाही हव्वास. हा बुवा मोठा विद्वान आहे. कुठचे कुठचे जुने कागद वाचत असतो, कुठेकुठे खणत असतो नि नवीन नवीन काहीतरी शोधून काढत असतो. पिरॅमिड्स, अबू सिंबेल वगैरे विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदा वगैरे भरवित असतो. तो आज जुन्या कैरोतल्या या बकाल वस्तीत त्या मोडक्या घरासमोर ठाण मांडून बसलाय. नुसता बसला नाहीये, तर त्याने तिथे दोन आंतरराष्ट्रीय परिषदा घेऊन, आपण ते जुनाट मोडकं घर का दुरुस्त करतोय, त्याची माहिती दिली. ते ऐकून टपरीवाला खालिद बद्र तर अगदी चाटच पडला. कारण, ते पडकं घर म्हणजे एक प्राचीन सिनेगॉग आहे. किती प्राचीन; तर चक्क १२व्या शतकातलं, सिनेगॉग म्हणजे ज्यू मंदिर. सन ११३५ मध्ये स्पेन देशात कार्डोबा शहरात जन्मलेला रावी माझेस बेन मैमोन हा महान ज्यू धर्मवेत्ता इथे राहात असे. तो कार्डोबाहून प्रथम अलेक्झांड्रिया आणि मग कैरोला आला. तो डॉक्टरही होता आणि तत्त्ववेत्ताही होता. या सिनेगॉगमध्ये तो सतत वैद्यकशास्त्रातले प्रयोग आणि धर्मचिंतन यात मग्न असे. त्याचा मृत्यूही इथेच झाला.

 

पुरातत्त्व प्रमुख झाही हव्वासच्या मते, मोझेस बेन मैमोंचं सिनेगॉग म्हणजे इजिप्तची ऐतिहासिक वास्तूच आहे. या सिनेगॉगप्रमाणेच इजिप्तमधील आणखी आठ पडीक सिनेगॉग्स दुरुस्त करण्याची सरकारी योजना आहे. झाही हव्वासने आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद घेऊन ही बातमी न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस नि जेरुसलेमपर्यंत पोहोचवली आहे. पण, खुद्द आपल्या देशातल्या लोकांपर्यंत ती फारशी पोहोचणार नाही, याची काळजी त्याने घेतली आहे. कारण, त्यांना ते आवडणार नाही, हे त्याला माहीत आहे. पण, मग एवढा आटापिटा कशासाठी चाललाय? त्यापाठी राजकारण आहे. झाही हव्वासचे बॉस म्हणजे इजिप्तचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री फारुख हुस्नी यांना 'युनेस्को'चं अध्यक्षपद हवं आहे. 'युनेस्को' म्हणजे 'युनायटेड नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन', संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना. तिच्याकडे मुबलक पैसा आहे. तेव्हा ज्यू आमचे शत्रू असले, तरी त्यांची प्राचीन मंदिरं हा आमच्या देशाचाही सांस्कृतिक ठेवा आहे, असं दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121