विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2019   
Total Views |
 

बौद्ध आणि जैन धर्मातील प्रतिके

चिह्न आणि चिह्नसंस्कृतीच्या संदर्भात मनोविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. कार्ल गुस्ताव यंग यांनी फार महत्त्वाची टिप्पणी केली आहे. पूर्वीच्या लेखात डॉ. यंग यांचा उल्लेख आपण वाचला आहे. विश्लेषणात्मक मनोविज्ञान आणि मानसशास्त्र याच्या अभ्यासाचा प्राथमिक पाया यांनीच रचला. मनोविज्ञान, मानसशास्त्र या बरोबरच मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान आणि सर्व धर्मप्रणालींचा अभ्यास आणि त्यातून जगातील धर्म-पंथ-संप्रदाय यांच्या चिह्नांचा आणि प्रतीकांचा मांडलेला अर्थसंकेत हे फार मोठे संशोधन डॉ. कार्ल गुस्ताव यंग यांचे कर्तृत्व आहे. धर्मप्रणालींच्या चिह्नाविषयी डॉ. यंग यांच्या मते, देवदेवता, दानव-पिशाच्च अथवा मनुष्यप्राणी यांच्या संदर्भात सर्जनशील-निर्मितीक्षम असा कल्पनाविलास ज्या संस्कृतीत मुक्तपणे व्यक्त झाला आहे, त्या प्रत्येक कल्पनेची नोंद इतिहासाने केली. म्हणूनच प्रत्येक पुराणकथा-दंतकथा-मिथके आणि त्यांची व्यक्त चिह्ने आणि रूपके यामध्ये आपल्याला तत्कालीन व्यक्ती आणि समाजाची मनोभूमिका, दैव, विधिलिखित, प्राक्तन या संबोधनाशी जोडल्या गेलेल्या धारणा, आनंद आणि दु:ख असे अनुभव आजही निरखून पाहता येतात. सिद्धार्थ गौतम अर्थात गौतम बुद्ध यांचे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात ४८३ मध्ये निर्वाण झाले. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीच्या आधारे त्यांच्या अनुयायांनी प्राचीन भारतीय संस्कृतीतील परंपरा-श्रद्धा-साधना यांच्या पायावर या धर्माची स्थापना केली होती. नीतिमूल्ये-ध्यान आणि चिंतन-प्रज्ञता म्हणजे बुद्धिमत्ता ही बौद्ध धर्माची अगदी प्राथमिक तत्त्वे आहेत. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या सम्राट अशोक यांनी आपल्या विशाल साम्राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करायला प्रजेला प्रोत्साहन दिले.
 



(चित्र क्र. १) ‘धम्मचक्र’ हे बौद्ध धर्माचे महत्त्वाचे प्रतीक आहे. सम्राट अशोकाचे ‘धम्मचक्र’ हे सत्य आणि सुशासन सिद्धांताचे प्रतीक म्हणून सिद्ध झाले होते. सारनाथ येथील ‘अशोक स्तंभ’ हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिह्न म्हणून स्वीकारले गेले. याच स्तंभावरील ‘अशोकचक्र’ या संबोधनाने सुपरिचित ‘धम्मचक्र’ अंकित झाले आहे.
 
 

(चित्र क्र. २) सम्राटाने पादाक्रांत केलेल्या भूभागाला ‘अखंड भारतवर्ष’ म्हटले गेले. या प्रदेशातील नागरिकांना शांतता, विश्वास आणि स्थैर्य देण्याचे संकेत या ‘अशोकस्तंभा’ची उभारणी करून ‘धम्मचक्रा’द्वारे प्रसारित केले गेले होते. आजही असे शीलालेख स्तंभ, सम्राट अशोक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तत्कालीन भूभागात अस्तित्वात आहेत. प्राचीन भारतीय चिह्नसंस्कृतीतील समृद्ध, मूल्याधारित आणि तर्कसंगत अशा बौद्धधर्मीय ‘धम्मचक्रा’ची गतिशीलता ही सृष्टीच्या निर्मिती-लय या अव्याहत आणि नियमित निसर्गचक्राचे प्रतीक आहे. या चक्रातून मुक्तीसाठी गौतम बुद्धांच्या ‘अष्टांगिक मार्गा’चे आचरण करणे आवश्यक आहे, असा संकेत हे प्रतीक देत असते. वर्तुळाचा मध्य - आठ आर्‍या, बाहेरील वर्तुळ हे चक्राचे तीन भाग म्हणजे या धर्मप्रणालीतील तीन साधना तत्त्वे आहेत. चक्राचा मध्य हे बुद्धांच्या शिकवणुकीने प्राप्त झालेल्या नीतिमूल्यांच्या शिस्तबद्ध पालनाचे, मनाच्या स्थैर्याचे रूपक आहे. आठ आर्‍या हे ‘अष्टांगिक’ मार्गाचे रूपक आहे. आर्‍यांभोवती असलेले वर्तुळ हे चित्त आणि वृत्तीच्या निरोधाचे म्हणजेच लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांचे रूपक आहे.          
 
१. सम्यक दृष्टी
२. सम्यक संकल्प
३. सम्यक वाचा
४. सम्यक कर्म
५. सम्यक जीविका,
६. सम्यक प्रयास
७. सम्यक स्मृति
८. सम्यक समाधी
 
या गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाच्या आठ तत्त्वांचे प्रतीक म्हणजे हे आठ आर्‍या असलेले ‘धम्मचक्र.’ समाधान, तृप्ती, सुख, आनंद याच्या म्हणजेच ‘निब्बाण’ प्राप्तीसाठी (निर्वाण) धर्माचरणाचे हे ‘अष्टांगिक मार्ग.’ बौद्ध धर्मप्रणालीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘निर्वाण’ या संकल्पनेचे ‘उपाधिशेष’ आणि ‘निरुपाधिशेष’ दोन प्रकार सांगितले आहेत. ‘उपाधिशेष’ म्हणजे मृत्युपश्चात प्राप्त होणारी अंतिम मुक्ती. ‘निरुपाधिशेष’ म्हणजे अज्ञान-वासना यांच्यापासून मुक्ती अर्थात जीवंतपणी प्राप्त होणारी निर्वाणावस्था. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानानुसार, अशी जीवंतपणी प्राप्त होणारी निर्वाणावस्था म्हणजे या सृष्टीशी एकरूप होण्याची भावना आहे. 

प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये (इथे हिंदू धर्म असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे.) तीन संप्रदाय प्रचलित होते. यज्ञविधी प्रमाण मानणारा यातील पहिला ‘वैदिक संप्रदाय.’ भक्तीमार्गी परंपरा स्वीकारलेला दुसरा ‘द्वैत संप्रदाय.’ ‘मुक्तीवादी’ म्हणजे श्रमण परंपरा स्वीकारलेला तिसरा संप्रदाय म्हणजेच आजची ‘जैन धर्मप्रणाली.’ या तीनही संप्रदायांमध्ये अनेक पंथ आणि उपपंथ प्रचलित होते आणि आजही आहेत. या तीनही संप्रदायांच्या जीवनविषयक तत्त्वांचा अगदी प्राथमिक परिचय आणि याच तत्त्वातील भेद प्रथम समजावून घेणे आवश्यक आहे. ‘नित्यवादी’ वेदान्ती संप्रदायींची धारणा अशी की, विश्वाच्या दैनंदिन निसर्गचक्रात नावीन्य आणि सातत्य या स्थिती नियमित आहेत. जे अढळ ते सत्य, जे बदलते ते भाससमान. याउलट बौद्ध तत्त्वज्ञानात ‘क्षणवादी’ जीवनधारणा स्वीकृत आहे. प्रत्येक क्षणी सर्व नष्ट होते आणि पुढच्या क्षणी नवीन निर्मिती होते. या नवनिर्मितीचे आधीच्या क्षणाशी साम्य असते म्हणून क्षणामागून क्षणामध्ये सातत्य असल्याचा भास होतो. जैन तत्त्वप्रणाली जीवनधारणेची थोडी वेगळी मांडणी करते. यातील ‘संग्रहनय’दृष्टीने जीवन व्यवहाराकडे पाहिले की, जे आहे ते ‘नित्य’ दिसते. या उलट आत्ता जे जसे वाटते आहे, तसे म्हणून ‘ऋजुसूत्रनय’ या दृष्टीने पाहिले तर जीवनव्यवहार ‘अनित्य’ वाटतो. जैनतत्त्वप्रणालीनुसार या दोन्ही धारणा आणि जाणीवा सत्य आहेत. या तत्वप्रणालीतिल ‘सास्यवाद’ या सूत्रानुसार ज्ञानाला मर्यादा आहे, कुठलेही जीवनविषयक विधान जपून केले पाहिजे, याचा आग्रह धरला जातो.


 

जैनांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २५०० व्या पुण्यतिथी निमित्ताने चित्र क्र. ३ मधील चिह्न अथवा काही चिह्नांचे मिळून बनलेले हे प्रतीक खास बनवले गेले. हे संपूर्ण विश्वाचे प्रतीक, जैन प्रणालीतील सर्व पंथ आणि संप्रदायांनी स्वीकारले आहे. काही चिह्नांच्या मिळून बनलेल्या या प्रतिमेला ‘संयुक्त प्रतीक’ किंवा ‘संयुक्त चिह्न’ असे संबोधित केले जाते. या प्रतीकाची बाह्यरेषा संपूर्ण विश्वाचे रूपक आहे. ‘चंद्रकोर’ आणि तीन टिंब असलेला लाल रंगाचा भाग विश्वातील स्वर्गाचे म्हणजे देवलोकाचे रूपक आहे. या देवलोकात, सिद्धशील आराध्य अशा सिद्धांचे वास्तव्य असते, अशी श्रद्धा आहे. ‘स्वस्तिक’ आणि अभयमुद्रेतील हाताचा तळवा यासह पिवळ्या-पांढर्‍या-हिरव्या रंगाचा भाग विश्वातील पृथ्वी आणि अन्य ग्रहांसह, मनुष्यलोक आहे. यातील सर्वात खालचा काळ्या रंगाचा भाग सात नरकांचे रूपक आहे. या काळ्या भागावर ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ असे शब्द अंकित केले आहेत. वर्गीकरणविज्ञान या ज्ञानशाखेच्या माध्यमातून, या संयुक्त प्रतीकातील वेगवेगळ्या चिह्नांचे अर्थसंकेत पुढे स्पष्ट केले आहेत.
 

 

चित्र क्र. ४ मधील हाताच्या तळव्यावर चोवीस आर्‍या असलेले ‘धम्मचक्र’ आणि त्याच्या मध्यावर ‘अहिंसा’ हा शब्द अंकित झालेला दिसतो. व्यक्ती आणि समाजातील प्रत्येकाने पालन करावे, अशा ‘संयम’ या सजीवांच्या गुणवत्तेचे आणि ‘अहिंसा’ या भावनेचे हे प्रतीक आहे. कुठलाही विचार करताना, शब्द बोलण्याआधी, कृती करण्याआधी दोन क्षण थांबा. योग्य-अयोग्य या विवेकाने विचार करा आणि मग निर्णय घ्या. अशामुळे आपली वागणूक विवेकपूर्ण राहील. यामुळे आपल्या विचार-शब्द-क्रिया यातून कोणालाही शारीरिक अथवा मानसिक इजा होणार नाही, असा व्यापक संकेत या चिह्नातून प्रसारित होत असतो. हातावर असलेले ‘धम्मचक्र’ गतिशील आहे. सृष्टी आणि निसर्गाच्या निरंतर आणि अव्याहत लय आणि पुनर्निर्मिती आणि पुनर्जन्माचे याचे रूपक आहे. या अव्याहत निसर्गचक्रातून अंतिम मुक्ती हवी असेल, तर या प्रणालीच्या तत्त्वांचे आचरण करावे, असा संकेत हे ‘धम्मचक्र’ दर्शकाला देत असते.
 
 
या प्रतीकातील सर्वात वर पिवळ्या रंगात एक चंद्रकोरीसारखी दिसणारी एक उलटी कमान आहे आणि त्यावर एक छोटेसे वर्तुळ आहे. ही कमान अंतिम मुक्ती प्राप्त झालेल्या सिद्धांचे स्वर्गासारखे वसतिस्थान आहे. म्हणून तिला ‘सिद्धशीला’ असे संबोधित केले जाते. त्यावरील वर्तुळ हे अंतिम मुक्ती प्राप्त झालेल्या सिद्धाचे प्रतीक आहे. भोगजीवनाचा त्याग करून पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी जैन जीवनशैलीचे आचरण करूनच अशा मुक्तीचा मार्ग दिसतो. या पिवळ्या कमानी खाली हिरव्या रंगाची तीन छोटी वर्तुळे आहेत. जैन सांप्रदायिक जीवनशैलीतील तीन महत्त्वाची दैनंदिन आचरणातील तत्त्वे सम्यक दर्शन म्हणजे प्रणालीवर योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान- सम्यक चरित्र यांचे संकेत ही तीन वर्तुळे प्रसारित करतात. या तीनही तत्त्वांचे योग्य पालन आपल्याला अंतिम मुक्तीचा मार्ग दाखवते.
 

 
 

या तीन हिरव्या वर्तुळाच्याखाली लाल रंगाचे ‘वासंतिक स्वस्तिक’ आहे आणि त्यातील प्रत्येक कोनात एक निळे वर्तुळ आहे. निसर्गाच्या निरंतर आणि अव्याहत जीवन-मृत्यू-पुनर्जन्म या चक्रात सजीवांना पुनर्जन्म चारपैकी एका योनीत प्राप्त होतो. त्या चार योनींची ही चार वर्तुळे आहेत. डावीकडचा वरचा कोन म्हणजे, सिद्धलोकातील देवतेच्या योनीतील जन्म असेल. उजवीकडचा वरचा कोन मानव योनीतील जन्म असेल. उजवीकडचा खालचा कोन प्राणी-पक्षी-वृक्ष योनीतील जन्माचे संकेत देतो. डावीकडचा खालचा कोन पाताळलोकातील दुर्जनांच्या योनीतील जन्माचे संकेत देतो. या जैन जीवनप्रणालीत ‘स्वस्तिक’ चार स्तंभांचे रूपक आहे. जैन संघ म्हणजे संपूर्ण समाज. या समाजाने एकत्रितपणे ही तत्त्वे आचरणे महत्त्वाचे आहे. ‘स्वस्तिका’तील हे चार स्तंभ म्हणजे साधू-साध्वी-श्रावक-श्राविका यांची रूपके आहेत. उत्तम आचरण-उत्तम ज्ञान-उत्तम श्रद्धाभावना या मार्गानेच समाजातील प्रत्येकाने या चार स्तंभांसारखे बनायचे असते, अशी ही मूळ धारणा आहे.
 
 
प्राचीन भारतातील समृद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध धर्मप्रणाली आणि जैन धर्मप्रणाली वृद्धिंगत झाल्या. अहिंसा या तत्त्वाचा प्रामुख्याने प्रचार आणि प्रसार करणार्‍या या दोन जीवन प्रणालींचा स्वीकार अखंड भारतवर्षाच्या दूरवरच्या प्रदेशातील नागरिकांनी काही सहस्र वर्षांपासून आनंदाने केला आहे. या दोन धर्मप्रणालींची ही दोन प्रतीके, त्यांच्या तत्त्वांचा परिचय, विलक्षण तर्कसंगत चिह्नाच्या माध्यमातून काही सहस्र वर्षांपासून समाजाला करून देत आली आहेत.
 
७४००१७३६३७
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@