इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच ‘एफ-२२’ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
नाविकांची तेलवाहू जहाजांवर तैनाती
देशाच्या जहाज भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक मागच्या आठवड्यात पार पडली. तिथे डायरेक्टर जनरल शिपिंग, इंडियन शिप ओनर्स असोसिएशन आणि भारतीय नौदल यांनी एकत्र येऊन पर्शियन आखातामध्ये जी परिस्थिती आहे, त्याचे अवलोकन केले. पर्शियन आखातात सौदी अरेबियाच्या दोन मोठ्या तेलवाहू जहाजांवर माईन्सने हल्ला झाला, त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्याव्यतिरिक्त अमेरिकेचे एक ड्रोन विमान जे त्या भागात टेहळणी करत होते, त्यावरही हल्ला करून ते इराणने पाडले. या बिघडत्या युद्धजन्य परिस्थतीमुळे निर्णय घेण्यात आला की, भारतीय तेलवाहू जहाजे जी या भागातून प्रवास करतात, त्यांच्यावरती भारतीय नौदलाचा एक अधिकारी आणि दोन नाविक तैनात केले जातील. ते आपला युद्धाचा अनुभव वापरून या जहाजांना या धोकादायक समुद्रमार्गिकेवरून सुखरूपपणे जाण्याकरिता मदत करतील. भारताचे ८० टक्के तेल हे बाहेरच्या देशातून आयात केले जाते, जे समुद्रमार्गे भारतामध्ये पोहोचते. त्यापैकी ६० ते ६५ टक्के तेल हे ‘पर्शियन आखात’ किंवा ‘गल्फ ऑफ होमरूझ’मधून भारतात येते. भारत तेल इराण, सौदी अरेबिया आणि इतर आखाती राष्ट्रांकडून आयात करतो. मात्र, हे तेल येण्याचा मार्ग एकच आहे.
सध्या अमेरिका आणि इराणमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सौदी अरेबिया हा अमेरिकेच्या बाजूचा म्हणजेच त्याला मदत करणारा देश असल्याने इराणने सौदी अरेबियालाही त्रास द्यायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती भारतीय जहाजांकरिताही धोकादायक आहे. देशामध्ये काही कारणाने बाहेरून येणार्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला, तर केवळ ८० दिवस पुरेल इतकेच तेल साठवलेले असते. आपली सर्वच वाहने डिझेल आणि पेट्रोल यावरच चालत असल्याने देशात मोठे संकट निर्माण होईल. म्हणून परदेशातून तेल आयात करण्याशिवाय काहीच पर्याय आपल्या देशासमोर नाही.
नुकसानापासून जहाज कसे वाचवायचे?
आपल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षित ठेवण्याकरिता नौदलाच्या नाविकांकडे शस्त्रे नसतील. परंतु, त्यांचे काम असेल ते नुकसानापासून आपले जहाज कसे वाचवायचे, हा सल्ला देण्याचे व त्या उपाय योजनांवर अंमलबजावणी करण्याचे. हा अधिकारी जहाजांकरिता धोकादायक समुद्रमार्गावरून जाताना घेणार्या उपायाचे नियोजन करेल. त्याशिवाय हा अधिकारी आणि नाविक जहाजाच्या आसपास कोणताही धोकादायक हालचाली होत असल्या तर त्यावर लक्ष ठेवतील.
जहाजामध्ये जे २५-३० कर्मचारी असतात. त्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांना समुद्राच्या पाण्यावरती तरंगणार्या स्फोटक पदार्थांवर त्यांना लक्ष ठेवता येईल. समुद्रामार्गे ड्रोनद्वारे हल्ला झाला तर त्यावरही लक्ष ठेवता येईल. एवढेच नव्हे, तर जहाजांवर हल्ला होऊन काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नेमके काय करायचे, हेसुद्धा सांगितले जाईल. ज्यावेळेला सौदी अरेबियाच्या जहाजाच्या एका भागात स्फोट झाला, तेव्हा जहाजावरील कर्मचार्यांनी ते जहाज ताबडतोब सोडून दिले. ते जहाज लगेच सोडण्याची काहीच गरज नव्हती. त्या जहाजाला वाचवता आले असते.
भारताच्या जहाजांना असलेला धोका कमी करता येईल
धोकादायक, आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जायचे, त्यावर लक्ष ठेवले जाईल. त्याचा सरावही केला जाईल. या जहाजांवर नौदल कर्मचारी असल्याने जहाजांवरील इतर कर्मचार्यांना प्रेरणा मिळेल, काही अपघात झाल्यास लगेच जहाज सोडण्याची परिस्थिती येणार नाही. त्यामुळे नौदल कर्मचारी तैनातीचे उचललेले हे पाऊल नक्कीच महत्त्वाचे आहे. यामुळे भारताच्या जहाजांना असलेला काही टक्के धोका कमी करता येईल. जहाजांना असलेले धोके समुद्रावर तरंगणार्या स्फोटक पदार्थांमुळेच नाही, तर काही वेळा जहाजाचा जो भाग पाण्याखाली असतो, तिथे १० मीटर खाली फ्लोटिंग माईन्स किंवा तरंगणार्या सुरुंंगाचा धोका पोहोचवला जाऊ शकतो. म्हणून पाण्याच्या आत असलेली स्फोटके कशी ओळखायची त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही करावा लागेल.
मात्र, भारतामध्ये येणारे तेल केवळ १२ टक्के भारतीय जहाजांमधून येते. ८८ टक्के जहाजे जी भारतासाठी इतर बंदरावरून तेल घेऊन येतात, ती भारतीय नसतात. परदेशी जहाजांचा आपण फक्त व्यापाराकरिता वापरतो. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्नही आहे. त्यांनाही आपल्याला अशाच प्रकारचे संरक्षण पुरवावे लागेल. म्हणजे ही जहाजे नेमकी ज्यावेळेला ‘गल्फ ऑफ होमरूज’ किंवा ‘पर्शियन गल्फ’मधून येत असतील त्या ३००-४०० किलोमीटरच्या रस्त्यांकरिता सुरक्षा कर्मचारी पुरवले, तर त्या जहाजांचेही रक्षण आपल्याला करता येईल.
तेलसाठा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर
याशिवाय दूरदर्शीपणा दाखवून आपल्याला अधिक काही करणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाने भारताला सांगितले होते ते जगातील सर्वात मोठा तेल कारखाना भारतात रत्नागिरी येथे लावू इच्छितात. त्यामुळे तेलसाठा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर करता येईल. परंतु, राजकीय नेत्यांच्या परस्पर वादविवादातून हा कारखाना रत्नागिरीत झाला नाही. हा कारखाना आता रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर अशा प्रकारचा निर्णय घेऊन कारखाना सुरू करावा. कारण, यामुळे ‘पर्शियन आखात’ या अत्यंत चिंचोळ्या सामुद्रधुनीतून येणार्या जहाजांना असलेला धोका आपल्याला टाळता येईल.
आपल्याला होणारा तेलपुरवठा हा पर्शियन आखाताशिवाय इतर देशांकडून वेगळ्या मार्गाने तेल आयात करणे आणि अशा प्रकारच्या धोक्यांमध्ये आपले नुकसान कमी करू शकतो. म्हणूनच आपण तेलपुरवठादार इतर देशांचाही वापर केला पाहिजे. आता आपण अमेरिकेकडून कच्चे तेल विकत घेण्याचे प्रमाण वाढवतो आहोत. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती अशा प्रकारचे तेलप्रक्रिया कारखाने उघडले गेले पाहिजेत, जेणेकरून धोकादायक ‘पर्शियन आखाता’मार्गे होणारा तेलाचा प्रवास कमीत कमी करता येईल.
तेलपुरवठा
युद्ध/दहशतवादी हल्ला/नैसर्गिक आपत्ती अशा प्रकरणांत, कच्च्या तेलासारख्या निर्णायक वस्तूंची जलवाहतूक एका बंदरातून दुसर्या बंदरात, पश्चिम किनार्यावरून पूर्व किनार्यावर आणि याउलट करण्याची आवश्यकता भासू शकते. असे सामर्थ्य आपल्यापाशी असण्याची गरज आहे. कच्छच्या आखातात खोल पाणी असल्याने, आपली महत्त्वाची तेल आयात करणारी बंदरे कच्छच्या आखातात आहेत. त्या बंदरांना दररोज दोन ते अकरा अतिभव्य कच्चे तेलवाहक (व्हेरी लार्ज क्रुड कॅरिअर) नौका भेट देत असतात. त्यातील प्रत्येक नौका 2 लाख टनांहून अधिक कच्चे तेल वाहून नेत असते. याअतिभव्य कच्चे तेलवाहक नौका, सिंगल पॉईंट मूरींग्जपर्यंत येतात आणि माल रिकामा करतात. जर आपण या बंदरांतील सुरक्षा संरक्षण व्यवस्थापित केले नाही, तर आपल्याकडे कोणता पर्याय राहील? जर मोठा दहशतवादी हल्ला झाला (कच्छचे आखात पाकिस्तानपासून किती जवळ आहे, लक्षात घ्या) तर, आपण काय करावे? आपण कच्चे तेलवाहक हौदवाहनांची ही वाहतूक पूर्व किनार्यावर वळवली पाहिजे. जिथे इतर खोल पाण्याची ‘पारादीप’सारखी बंदरे आहेत. प्रश्न हा आहे की, तिथून हे तेल आपण उत्तर क्षेत्रात कसे पोहोचवावे हा? आपल्यापाशी जमिनीवरील वाहतुकीचे तीन मार्ग आहेत. रेल्वे, रस्ता किंवा तेलवाहिन्या. आपल्याला तेलजन्य (पेट्रोलियम) पदार्थांचे सामरिक साठे आणि वाहिन्या उभारल्या पाहिजेत, ज्या पश्चिम किनार्यावरून पूर्व किनार्यावर आणि याउलट तसेच एका मोठ्या बंदरातून दुसर्या मोठ्या बंदरात तेलाची वाहतूक करू शकतील. यामुळे ऊर्जासुरक्षा साध्य होईल.
आपल्या तेलवाहू जहाजाचे रक्षण करणे, हे या घडीला अतिशय महत्त्वाचे आहे. आशा करूया की, हे काम करण्याकरिता भारतीय नौदलाला नक्कीच यश मिळेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat