गर्भावस्थेत गर्भिणीला होणारे विविध त्रास, तक्रारी व आजार याबद्दल आपण आतापर्यंतच्या भागांमध्ये सविस्तर माहिती करुन घेतली. त्याचप्रमाणे गर्भवतींमधील व्यसने या लेखात तंबाखूचे व्यसन आणि त्याचे बाळावर व गर्भवतीवर होणारे दुष्परिणाम याचाही आढावा घेतला. आजच्या लेखात गर्भवतीला जर मद्यपानाचे व्यसन असेल, तर गर्भात वाढणार्या अर्भकावर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
‘व्यसन’ म्हणजे एखाद्या घटकाच्या अधीन जाणे. त्या गोष्टीची ‘तलफ’ येते. चहासारख्या पेयापासून, तंबाखू, मशेरी, मद्य व अमली पदार्थ (ड्रग्ज)यापैकी कशाचेही व्यसन जडू शकते. काही खूप घातक असतात. त्यांचा शरीरावर पटकन परिणाम होतो. काही व्यसनांच्या ‘स्लो पॉयझन’मुळे शरीरावर घातक परिणाम दिसू लागतात. उंदीर जसा हळूहळू जाळी कुरतडतो, तसेच व्यसनांचे आहे. व्यसन आयुष्य कुरतडून टाकते ते पुन्हा जोडता न येण्यासारखे.
हल्ली मुला-मुलींमध्ये ‘सोशल ड्रिंकिंग’चे प्रमाण खूप वाढले आहे आणि वाढत आहे. शाळकरी मुलांचे पिकनिकचे किस्से मद्यपानाशी संबंधित असलेले बरेचदा ऐकण्यात येतात. ‘पार्टी’ मग ती कार्यालयातील असो वा कौटुंबिक, मद्यपान सर्रास केले जाते. आजकाल ‘केळवणा’च्या वेळीही ‘पार्टी मूड’ येण्यासाठी मद्यपान केले जाते. मद्यपानाबद्दल, धुम्रपानाबद्दल जो Taboo होता तो कमी होत चालला आहे. त्यामुळे त्या अपायकारक गोष्टींचा सर्रास आस्वाद घेताना तरुणाई दिसते. पण, या गोष्टींचा शरीरावर, स्वास्थ्य, प्रकृतीवर अनिष्ट परिणामच होतो. ‘ऑकेजनली ड्रिंकिंग’मध्ये कधी ‘त्या’ची चटक लागते आणि या व्यसनांच्या आहारी ते जातात, याचा त्यांना स्वत:लाच पत्ता लागत नाही.
गर्भावस्थेत याचा अधिक दुष्परिणाम होतो. प्रथम मद्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून घेऊया. मद्यपान केल्याने एक ‘अमल’ चढतो, नशा येते. सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रिया तल्लख होतात आणि नंतर बोथट. बोलणे अस्पष्ट आणि असंबंध होते. शारीरिक हालचालींवर नियंत्रण राहत नाही. चालणे, उभे राहणे, मल-मूत्र वेगांवर नियंत्रण राखणे इ.गोष्टी सहज, सुलभतेने शक्य होत नाहीत. मद्यपान करताना आणि त्याचा परिणाम शरीरावर होत असेपर्यंतचे नंतर पुसटसे आठवते. मानसिक, बौद्धिक प्रतिक्रिया मंदावतात. हे झाले मद्याचे होणारे तात्काळ परिणाम. पण, जर वरचे वर मद्यपान करत राहिल्यास हे दुष्परिणाम कायमस्वरूपी होतात. मद्यपानाचा दुष्परिणाम शरीरातील सर्व महत्त्वाच्या अंग-अवयवांवर होतो.
यकृतावर सर्वात अधिक परिणाम होतो. त्याचबरोबर हृदय, फुप्फुसे, मेंदू, स्वादुपिंड, उदर, जननेंद्रिये इ. चे नुकसान होते. मेंदूतील 'Frontal Lobe' आक्रसतो. मद्यपानाच्या अधीन झाल्यावर कामाची आणि नात्याची क्रियाशीलता कमी होते. अतिमद्यपान करणार्यांमध्ये विशिष्ट अवयवांचे कर्करोग होतात. घसा, तोंड, अन्ननलिका इत्यादींचे कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते. हाडे ठिसूळ होणे, बारीक होणे, पोट फुगणे, अल्सर येणे, वारंवार जुलाब होणे, मधुमेहामध्ये गुंतागुंत वाढणे, स्नायू शिथील होणे, दुखणे व त्यांची क्रियाशीलता नष्ट होणे, नसांमध्ये शून्यता येणे, मुंग्या येणे आणि अन्नघटकांचे नीट पचन न झाल्याने कुपोषण यांसारखे परिणाम दिसतात.
गर्भवतीने जर मद्यपान केले, तर नाळेतून मद्यघटक गर्भाच्या शरीरात पोहोचतात आणि त्या लहान जीवावर याचे खूप घातक परिणाम होतात. गर्भधारणा होण्यापूर्वीच स्त्रीने मद्यप्राशन थांबवावे. किमान गर्भधारणेपूर्वी चार-सहा आठवडे मद्य पिणे थांबवावे. संपूर्णत: स्त्री व पुरुष यांच्या बीजातूनच गर्भाची निर्मिती होते आणि स्त्रीच्या आहार-आचार-विहारातून गर्भाची वाढ व पोषण होत असते. जसे शेतकरी शेतीसाठी शेतजमीन सुपीक करून घेतो, त्या शेतातील तृण काढतो आणि नंतर बियाणे (उत्कृष्टप्रतीचे) लावतो, त्याचप्रमाणे स्त्रीने व पुरुषाने शरीरशुद्धी करून घ्यावी. यासाठी पंचकर्माचा उत्तम फायदा होतो. शरीरातील दुष्ट घटक शरीरातून काढण्याची क्षमता पंचकर्मात आहे. पण, ते कसे करावे, कधी करावे इ. सर्व गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कराव्यात, अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात. 'Prevention is better than cure' हे ब्रीदवाक्य स्वास्थ्याबद्दल नेहमी लक्षात ठेवावे.
गर्भवतीने जर मद्यपान सुरूच ठेवले, तर गर्भाची वाढ खुंटते. त्याचे विविध अंग-अवयव नीट तयार होत नाहीत किंवा नीट क्रियाशील होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रसुतीही लवकर होते. (premature birth) प्रीमॅच्युअर बाळाची संपूर्ण वाढ झालेली नसते. त्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. वजनही कमी असते. अशा वेळेस त्यांच्या जीविताला धोका उद्भूव शकतो. गर्भामध्येच बाळाच्या प्रत्येक अंग-अवयवाची उत्पत्ती होते आणि वाढही होत असते. गर्भवतीच्या मद्यपानामुळे या गर्भवाढीच्या प्रक्रियेला बाधा उत्पन्न होते. मेंदूचा संपूर्ण विकास होत नाही. त्यामुळे क्रियाशीलतादेखील बाधित होते. अर्भकाच्या श्रवण प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. बधिरत्व येऊ शकते. हृदयाची निर्मिती (विशेषत: झडपे- 'septum) नीट होत नाही.म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या मातेचे मद्यपान अर्भकासाठी विषासमान काम करते.
बाळाची आकलन शक्ती, वार्तालाप शक्ती खंडित राहते. स्वत:ची काळजी घेण्यास ते बाळ असक्षम ठरते. जन्मानंतरही टप्प्या-टप्याने होणार्या वाढीत या बाळाची वाढ खुंटलेली राहते. बहुतांशी वेळेस ‘प्रीमॅच्युअर बर्थ’ होते. काही वेळेस गर्भपातही होतो किंवा मूल जन्माला येतानाच मृत जन्माला येते. हे इतके भयानक दुष्परिणाम होत असतानाही मद्यपान सुरू ठेवणारी दाम्पत्येही आहेतच. हल्ली लग्नाचे वय वाढले आहे. शिक्षण, नोकरी इ. मध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत तिशी उजाडते. त्यात कामाच्या वेळा, प्रवास, आर्थिक जमवाजमव करेपर्यंत मूल-बाळ नको म्हणून अजून दोन-पाच वर्षे जातात. या सगळ्या कारणांमुळे हल्ली एक अपत्य पुरे असे म्हणणारे खूप आहेत. मग ते एक अपत्य सशक्त, सुदृढ नसावे का? मद्यपानाचा जननक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे वंध्यत्व येऊ शकते. म्हणजे, आधीच उशीर आणि व्यसनाधीनतेमुळे त्यात अजून भर!
म्हणून लग्न झाल्यावर अपत्यप्राप्तीची स्वप्ने जी दाम्पत्य बघत असतील, त्यांनी व्यसन (तंबाखू, मद्य, अमली पदार्थ इ.) सोडावे. शरीरावर होणारे अत्याचार थांबवून उत्तम, सशक्त आणि निरोगी शरीर-मन-बुद्धी करण्यासाठी झटावे आणि सुदृढ शरीर व चिंतारहित मन:स्थिती निर्माण करण्याचा, टिकविण्याचा कायम प्रयत्न करावा. मूल जन्माला आल्यानंतरही व्यसनांपासून लांब राहणे गरजेचे आहे. कारण, मुले मोठ्यांच्या अनुकरणातूनच शिकत असतात. ज्यांच्या घरी धुम्रपान, मद्यपान ज्येष्ठ मंडळी करतात, त्या घरातील मुलेदेखील या व्यसनांकडे लवकर वळताना आढळतात. तेव्हा सशक्त आणि निरोगी अपत्यासाठी व्यसनमुक्त राहणे हा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. पुढील भागापासून प्रसवपश्चात बालकाचा विकास आणि संगोपन याबद्दल जाणून घेऊया.
(क्रमशः)
vaidyakirti.deo@gmail.com
9820286429
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..