शीख बांधवांचे प्रार्थनास्थळ असणार्या गुरुद्वाराच्या शिखरावर फडकणारा ध्वज हा पवित्र 'निशाणसाहिब' या संबोधनाने सर्वपरिचित आहे. (चित्र क्र १). याच्या मध्यभागी आपल्याला तसेच सुपरिचित चिह्न दिसते. हे चिह्न-प्रतीक आणि त्याचे अर्थसंकेत शीख संप्रदायाची धर्मप्रणाली आणि शीख समाजाच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्ताराने परिचय करून देतात.
आपल्या नित्य मांडणीनुसार धर्मचिह्न-प्रतीकांचा अभ्यास करताना आपण प्रथम या धर्मप्रणालीचा आणि जीवनशैलीचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. 'शीख' या शब्दाची व्युत्पत्ती 'शिष्य' या मूळ संस्कृत शब्दपासून झाली आहे. या धर्मप्रणालीने एकेश्वरवाद श्रद्धेचा पुरस्कार आणि स्वीकार केला आहे. 'एक ओंकारा' ही शब्दरचना, हा उद्गार, हे बोल या प्रणालीच्या एकेश्वर श्रद्धेचे व्यक्त होणारे श्राव्य प्रतीक आहे. प्राचीन भारतीय समाजातील वर्णव्यवस्थेला पर्यायी व्यवस्था म्हणून गुरूनानक देव यांनी पंधराव्या शतकाच्या अखेरीला या संप्रदायाची स्थापना केली होती. 'गुरू ग्रंथसाहेब' हा शीख संप्रदाय प्रणाली आणि बांधवांचा धर्मग्रंथ आहे. शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंद सिंग यांच्यानंतर याच धर्मग्रंथाला जीवंत गुरूंचे स्थान देऊन सन्मानित केले गेले.
गुरूनानक यांनी 'सिखिझम'ची उभारणी हिंदू धर्मप्रणाली आणि इस्लाम धर्मप्रणाली या दोन्हीतील काही सूत्र एकत्र करून केली आहे. एकेश्वरवादी शीख संप्रदाय प्रणाली, इस्लामच्या शिकवणीनुसार एक अदृश्य देवाची संकल्पना स्वीकारते. त्याचवेळी हिंदू धर्मप्रणालीमधील कर्मसिद्धांत आणि कर्मानुसार व्यक्तीचा पुनर्जन्म ही दोन सूत्रेसुद्धा स्वीकारली गेली आहेत. शीख प्रार्थनास्थळ 'गुरूद्वारा' या संबोधनाने आपल्या सर्वांना परिचित आहे. 'आराध्य देवाकडे जाण्याचा मार्ग' असा या संबोधनाचा सर्वसाधारण अर्थ स्वीकृत आहे. सामान्यतः 'गुरूद्वारा'मध्ये पुरोहित नेमले जात नाहीत. आपल्या धर्मप्रणालीच्या रितीरिवाजांचा परिचय, संप्रदायातील बांधवांना योग्य प्रकारे व्हावा म्हणून अलीकडच्या काळात मात्र अनेक गुरूद्वारांमध्ये पुरोहित नियुक्त केले जातात. शीख संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'फाईव्ह के' म्हणजेच 'क' या आद्याक्षराने सुरू होणारे पाच शब्द आणि त्या शब्दातून व्यक्त होणारी पाच तत्त्वे. यालाच 'पाच ककार' असेही संबोधित केले जाते. केश, कंगवा, कचेरा, कडे, कृपाण असे हे पाच शब्द.
पहिला 'क' - केश
लांब वाढवलेले 'केस' ही शीख पुरुष आणि स्त्रियांनी स्वीकारलेली पारंपरिक प्रथा आहे. असे वाढवलेले केस शक्यतो कापले जात नाहीत. सर्व शीख पुरुष आणि अपवादाने काही स्त्रिया असे लांब केस 'दस्तर' या लांब वस्त्राने झाकून घेतात. हे 'दस्तर' 'शीख फेटा' या संबोधनाने आपल्याला परिचित आहे. काही अपवाद वगळता सर्व शीख स्त्रिया आपले केस मोकळेच ठेवतात. गुरुद्वारात आणि देवळात जाताना मात्र केस झाकणे अनिवार्य असते.
दुसरा 'क' - कंगवा
असे लांब वाढवलेले आणि झाकून घेतलेले 'केश' विंचरण्यासाठी वापरला जाणारा एक लाकडी 'कंगवा.'
तिसरा 'क' - कचेरा
'कचेरा' हे शीख पुरुष आणि स्त्रियांनी वापरण्यासाठीचे हे एक प्रकारचे पारंपरिक अंतरवस्त्र आहे. गुरु गोविंदसिंग यांनी १६९९ मध्ये 'बैशाखी अमृत संस्कार' या शीख दीक्षा समारंभाची रचना केली. दुर्बल आणि गरिबांच्या संरक्षणासाठी त्यांनी 'खालसा पंथ' या नावाने शूर शीख योद्ध्यांचा संघटित गट निर्माण केला. 'खालसा' पंथाच्या दीक्षा स्वीकारल्यानंतर त्यांना 'दस्तर,' 'फेटा' आणि 'कचेरा' वापरणे बंधनकारक असते. दीक्षा स्वीकारलेल्या पुरुषांना त्यांच्या नावापुढे 'सिंग' असे बिरूद, तर महिलांना 'कौर' असे बिरूद लावले जाते. 'कचेरा' हे अंतरवस्त्र आपल्या कामवासनेवर योग्य नियंत्रण ठेवावे याचा संकेत देते.
चौथा 'क' - कडे
हे 'कडे' मिश्रधातूचे अथवा लोहापासून बनवले जाते. आपण शीख संप्रदाय प्रणाली स्वीकारली आहे, याचे दृश्य, व्यक्त संकेत देणारे हे कडे प्रत्येक शीख बांधवाने वापरणे अनिवार्य आहे. वर्तुळाकार कड्याला सुरुवात आणि शेवट नाही. या जगाचा निर्माता सर्वश्रेष्ठ देव आहे, या संकल्पनेची ही दृश्य स्वरूपातील ही स्वीकृती आहे. या कड्याच्या संकेतानुसार 'देव' या संकल्पनेला 'आदि' आणि 'अंत' नाही. आपले नित्यकर्म करताना देवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा आणि आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा, असे संकेत या कड्याच्या माध्यमातून प्रत्येक शीख बांधवाला मिळत असतात.
पाचवा 'क' - कृपाण
दयाशील वृत्ती, आत्मसन्मान, आत्मगौरव असे संकेत देणारे हे 'कृपाण' एक छोटेसे शस्त्र आहे. लढवय्या वृत्तीच्या शीख बांधवांनी, योद्धा म्हणून अन्यायाचा प्रतिकार करतानाच दुर्बल आणि गरीब प्रजेप्रति दयाशील असावे, असे संकेत देणारे हे कृपाण गुरू गोविंदसिंग यांच्या शिकवणीनुसार 'संत सिपाही' वृत्तीचे असावे असा संकेत देते.
गुरू गोविंदसिंग यांच्या शिकवणीनुसार, या 'पाच ककारा'मधून शीख संप्रदाय समाजाच्या जीवनशैलीचा परिचय निश्चितपणे होतो. या 'ककारां'बरोबरच वैयक्तिक आणि समाजजीवनात काही बंधने पाळणे आवश्यक असते. तंबाखूचे सेवन आणि इस्लामी पद्धतीने कापलेले मांस खाणे शीख बांधवांना निषिद्ध आहे. विवाहित जोडप्याने युगुलधर्माचे पालन करणे आवश्यक असते. यात स्वैराचार निषिद्ध आहे.
खंड
'खंड' हे शीख संप्रदायाचे सुपरिचित चिह्न आणि प्रतीक. 'खंड' म्हणजे दुधारी तलवार. आपल्याला सुपरिचित, मल्हारी मार्तंड खंडेराय अर्थात महादेवाच्या या विग्रहातील 'खंड' त्यांच्या हातातील दुधारी तलवार या विश्वावरील त्याच्या सार्वभौम सत्तेचे प्रतीक आहे. चित्र क्र. ३ मधील प्रतीकात, मध्यभागी असलेले शीख संप्रदाय धर्मप्रणालीचे 'खंड' साधारण असेच संकेत देते. 'निशाणसाहिब' या शीख संप्रदाय प्रणालीच्या ध्वजावर, 'गुरू ग्रंथसाहेब' या पवित्र ग्रंथाचे कापडी वेष्टण यावर हे 'खंड' नेहमी अंकित केले जाते. या प्रतीकाचे तीन भाग आहेत.
या प्रतीकाच्या मध्यभागी दुधारी तलवार आहे. कुठल्याही प्रकारच्या भ्रमाचा छेद घेणार्या चिरंतन सत्याचे सूचक असलेले हे चिह्न, लढवय्या आणि शूर योद्धा अशा शीख समाजाची ओळख आहे. शिखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव यांच्या हौतात्म्यानंतर त्यांचे सुपुत्र सहावे गुरू हरगोविंद यांनी ही दुधारी तलवार धारण केली. गुरू हरगोविंद यांनी शीख सैन्याची प्राथमिक उभारणी केली आणि 'अकाल तख्त' स्थापन केले. 'बैशाखी अमृत संस्कार' या दीक्षा समारंभातील अमृत या दुधारी तलवारीने ढवळले जाते, अशी शीख बांधवांची श्रद्धा आहे.
या प्रतिमेतील चक्र हे लढाईत शत्रूवर लांबून फेकून मारण्याचे एक मूळ भारतीय पारंपरिक शस्त्र आहे. (चित्र क्र. ४) बाहेरच्या बाजूला तीक्ष्ण धार असलेले हे 'चक्र,' 'चक्रम' अथवा 'सलीकार' (सर्कल) या संबोधनाने ओळखले जाते. रामायण आणि महाभारतातील श्री विष्णूचे 'सुदर्शन' याचे पूर्वज आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे चक्र शीख बांधव आपल्या पगडीवर शीर्षस्थानी धारण करतात. चित्र क्र. ५ मध्ये कडवे शूर लढवय्ये निहंग शीख सैनिक आपल्या पगडीवरही चक्र धारण करत असत.
चित्र क्र. ३ मधील प्रतीकात बाहेरच्या बाजूला दोन बाकदार 'कृपाण' आहेत. वर वर्णन केलेल्या शिखांच्या गुरूआसनाचे सार्वभौमत्व आणि आध्यात्मिक वृत्ती म्हणजेच 'पिरी' आणि गुरूची धर्मनिरपेक्ष वृत्ती म्हणजे 'मिरी' अशी ही दोन धारदार कृपाणे आहेत. 'पिरी' आणि 'मिरी' ही त्या त्या अर्थाने वापरलेली गुरूमुखी संबोधने आहेत.
शीख बांधव आपल्या देशाचे सौरक्षक शूर वीर आहेत. भारतीय सैन्यातील आणि पोलीस दलातील शीख बांधवांचा इतिहास गौरवशाली आहे. अनेक शीख बांधव आपल्या तीनही सेनादलांच्या सेनापतिपदावर विराजमान झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील शीखांचे योगदानसुद्धा फार मोठे आहेत. जगातील पाचवा मोठा धर्म असलेला शीख संप्रदाय स्वीकारलेले साधारण सव्वातीन कोटी नागरिक आज जगातील सर्व देशात वास्तव्य करतात. भारताच्या लोकसंख्येच्या साधारण २.५० टक्के असलेले आपले शीख बांधव अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. शूर लढवय्या शीख संप्रदायाच्या रूपक-प्रतीकांचा आणि आचरण सूत्रांचा परिचय असा फार रंजक आहे.
- (७४००१७३६३७)