कितीही मोठे तंत्रज्ञान आले, तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले, तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
दि. २६ जुलै, २०१९ रोजी कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाली. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जीवंत आहे. २६ जुलै, १९९९ हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान म्हणून सर्व भारतीयांच्या कायम लक्षात राहील. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर, फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक १९९९ मध्ये तैनात केलेले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमिनीवर बर्फ साचलेला असतो. २६ जुलै, १९९९ रोजी भारतीय लष्कराने घुसखोरी झालेल्या या भागाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. १३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता. १९९९ मध्ये पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची दोन कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सीमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद तोडण्याकरिता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता. दुसरे म्हणजे, सैन्याने जम्मू-काश्मीरमध्येचांगले काम केल्यामुळे तेथील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे या दहशतवादाला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष एकवटण्यास भाग पाडायचे होते.
'ऑपरेशन विजय'
पाकिस्तानी सैन्याच्या 'स्पेशल सर्व्हिसेस'च्या सर्वोत्कृष्टतुकड्या, तसेच 'नॉर्दन लाईट इन्फ्रटी'च्या ११ बटालियन तुकड्या या युद्धात वापरल्या गेल्या. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल व बटालियनपुरतीच कारवाई शक्य होती. फौजेची संख्या केवळ २० हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. पाकिस्तान सैन्याची संख्या साधारणपणे पाच हजारांच्या आसपास होती. यात पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यातील सैनिकसुद्धा सामील होते. 'टायगर हिल' व 'तोलोलिंग' येथील संग्राम भारतीय जवानांच्या साहसाचा पराक्रमाचा कळस होता. 'टायगर हिल'ची लढाई सर्वात महत्त्वाची होती. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात चार 'परवीर चक्र,' चार 'महावीर चक्र,' २९ वीरचक्र आणि ५२ सेनापदके प्रदान करण्यात आली.
ले. सौरभ कालियांमुळे मिळाली घुसखोरीची माहिती
कारगिल युद्धात अतिशय क्रूरपणे ठार मारलेल्यालेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जिभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकार्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली. पाकिस्तानी लष्कराने कालिया यांनी पकडून अतिशय क्रूरपणे ठार मारले.
कॅफ्टन विक्रम बत्रा : विजयी ध्वज रोवून किंवा त्यात लपेटून येईन
कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना 'शेरशाह' असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते की,"मी भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईन किंवा त्यात लपेटून येईन." त्यांच्या कंपनीला 'पॉईंट ५१४०' पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून, १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते की, 'ये दिल मांगे मोर!' त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची वीरता दडलेली आहे. ८ जुलै, १९९९ रोजी भारतीय लष्कराने ऐतिहासिक यश मिळवत १६ हजार फूट उंचीवर असलेले ४ हजार, ८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. ४ हजार, ८७५ शिखर सर करताना बत्रा यांनी आपल्या सहकार्यांना सोबत येण्यास मनाई केली. "तुमच्या मागे मुलंबाळं आहेत," असे म्हणत ते पुढे गेले होते. बत्रा यांना मरणोत्तर 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले.
१५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढत होते,
विजयंत थापर
राजपुताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात 'डर्टी डझन' या १२ सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे 'टोलोलिंग' शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून, १९९९च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. 'टोलोलिंग' सर केल्यानंतर त्यांना 'पिंपल्स' आणि 'नॉल' सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. 'बॅटल ऑफ थ्री पिंपल्स'मध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य हुतात्मा झाले, तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खात्मा केला. यात त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले. पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की "जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले." विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे हुतात्मा झाला होता, तेथे मुलाला व सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी जातात.
मनोज पांडे यांचे अंतिम शब्द,
"त्यांना सोडू नका!"
'खालूबर रिजलाइन'ला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅप्टन मनोज पांडे हुतात्मा झाले. कारगिल सेक्टरमधील 'खालूबर रिजलाइन' अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन मिळविले. तिसर्या पोझिशनवर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रुपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी चौथी पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते हुतात्मा झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, 'ना छोडनू!' (नेपाळी भाषेचा मराठी अर्थ 'त्यांना सोडू नका.') २४ वर्षांचे पांडे यांना मरणोत्तर 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले.
शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्त्वाचा
द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या हुतात्मांपुढे आपण नतमस्तक होतो. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat