मुंबई ( प्रतिनिधी) : बोरिवलीतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वन विभागाने एक समितीचे गठण केले आहे. या समितीतर्फे पुढील एका महिन्यात या विषयावर अभ्यास करुन अहवाल सादर केला जाईल. यामाध्यमातून नॅशनल पार्कमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल आणि त्याच्या भविष्यात योग्य उपयोग करण्यात येईल.
पावसाच्या पाण्याचा निचरा न होऊ देता भविष्याच्या दृष्टीने त्याच्या संचय करणे अत्यंत महत्वाचे आहे. उपनगरातील काही गृहनिर्माण संस्थांनी पावसाच्या पाण्याची साठवणूक करुन ते उपयोगात आणले आहे. दिंडोशी विभागाचे आमदार सुनील प्रभू यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईतील पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत त्यांनी बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचा संचय करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक असल्याची सूचना केली होती. याच सूचनेची दखल घेत वन विभागाने प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केेली आहे. या समितीतर्फे नॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याची साठवणूक करणारी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याबाबत अभ्यास करण्यात येईल.
या समितीच्या अध्यक्षस्थानी प्रभू यांची नेमणूक करून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम (वन्यजीव) सुनील लिमये, नॅशनल पार्कचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद, ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर, मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी, उपनगराचे जिल्हाधिकारी आणि विभागीय वन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने पुढील एका महिन्यात यासंदर्भात अभ्यास करुन अहवाल सादर करण्याची सूचना वन विभागाने दिली आहे. समितीपुढे नॅशनल पार्कमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे साठवण करण्याकरिता प्रभावी उपाययोजना निर्धारित करणे, योजना राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणे, कामांसाठी कार्यान्वयीन यंत्रणा निश्चित करणे आणि त्यासाठी निधीचे स्त्रोत व उपलब्धता यांची मांडणी करण्याचे काम आहे.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat