मुंबई : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली असून इमारतीत अंदाजे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत होते, त्यापैकी ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून बाजूची अंजुमन-ए-इस्लाम शाळाही रिकामी करण्यात आली आहे.
वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. दुपारी तीनच्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आठव्या मजल्यावर अडकलेले कर्मचारी गच्चीवर सुखरूप पोहोचल्याने अनर्थ टळला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat