फंगल इन्फेक्शन्स (बुरशीजन्य जंतूसंसर्ग) यांना सर्वसाधारणपणे 'रिंगवर्म,' 'दाद,' 'दादर,' 'दराज' या नावांनी ओळखले जाते. अशाप्रकारचा जंतुसंसर्ग हा फोमाइट्सच्या माध्यमातून होतो. (जंतूंचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरणार्या वस्तू किंवा बाबी) उदा. सार्वजनिक स्वच्छतागृहे, एकच टॉवेल, भांडी वापरणे इत्यादी. या संसर्गाची लागण एकदा झाली की नखांद्वारे त्याचे जंतू शरीरभर पसरतात व रुग्णाला संसर्ग झालेल्या ठिकाणी खाज येऊ लागते.
(१) फंगल इन्फेक्शन हे बहुतेकदा पायाच्या बोटांच्या खाचांमध्ये होते. त्यामुळे याला 'अॅथलिट्स फूट' असेही म्हटले जाते व पापुद्य्रांसारख्या पांढर्या डागांच्या रूपात दिसून येते. पावसाच्या पाण्यातून चालताना पायांत बंद बूट आणि मोजे घातलेले असणे हे त्यामागचे कारण आहे. त्याऐवजी या दिवसांत आपण सर्व बाजूंनी उघड्या असलेल्या चपला किंवा सॅण्डल्स घालायला हव्यात. कार्यालयामध्ये किंवा घरी पोहोचल्यावर त्या सहज बदलता येतील.
(२) मान्सूनच्या दिवसांत जांघ, मांड्यांचा आतील भाग आणि काखांसारख्या शरीराचा दुमडणार्या भागांमध्ये अशाप्रकारचा जंतुसंसर्ग झाल्याचे सरसकट दिसून येते. अशा जंतुसंसर्गाच्या जागी भरपूर खाज सुटते आणि खाजवल्याने नखे बाधून दुसर्या प्रकारचा जंतुसंसर्ग होतो, ज्यामुळे संसर्गाच्या जागची त्वचा रंगहीन (पिवळसर-हिरवट) आणि हळवी बनते.
फंगल इन्फेक्शन कसे टाळावे?
- सर्व बाजूंनी खुली असतील अशी पादत्राणे घालावीत
- भिजलेले कपडे, मोजे आणि अंतर्वस्त्रे शक्य तितक्या लवकर बदलावीत.
- अंघोळीनंतर, मोजे घालण्यापूर्वी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी बुरशीरोधक म्हणजे अॅण्टिफंगल डस्टिंग पावडर लावावी.
- खाजवणे किंवा ओरखाडे काढणे टाळावे
- जंतूसंसर्गावर वेळच्या वेळी उपचार व्हावेत आणि त्याचा फैलाव रोखता यावा यासाठी डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अॅक्ने (मुरुम-पुटकुळ्या उठणे) ही या काळात सर्रास आढळून येणारी समस्या आहे. केवळ कोरडी त्वचा असलेल्यांनाच नव्हे तर तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनाही याचा त्रास जाणवतो. जेव्हा त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी सौंदर्यप्रसाधने वापरली जातात, तेव्हा मुरुम-पुटकुळ्या वर येतात. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी खूप जास्त प्रमाणात स्क्रबिंग केल्यानेही त्वचेला त्रास होतो व ती लाल, तापलेली दिसू लागते. तेलकट त्वचा असलेल्यांनी क्लिन्झर, सनस्क्रीन,अॅण्टि-पिंपल औषधे (उदा. रेटिनॉइड्स, बेनझॉइल, पेरॉक्साइड, अॅण्टिबायोटिक्स) आणि मॉइस्चरायझर्स घेण्याआधी डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घ्यायलाच हवा. मुरमे दिसू लागल्यावर वेळच्यावेळी उपचार करून घेतल्यास डाग किंवा व्रण यांना रोखता येतेल. ब्लॅकहेड्स होणे ही खरेतर मुरुमे येण्याची पहिली पायरी असते. स्क्रबिंगमुळे ती तात्पुरती जातात, पण पुन्हा दिसू लागतात. अॅक्नेवरील उपचारांसाठी दर पंधरावड्याला किंवा महिन्याभराने केमिकल पील्स वापरणे फायदेशीर ठरू शकते.
मुरमे फुटणे कसे थांबवता येईल?
डर्मिटोलॉजिस्टने दिलेल्या मेडिकेटेड स्कीन क्लिन्जरने दिवसातून दोन-तीन वेळा आपला चेहरा हळुवारपणे स्वच्छ करा. उर्वरित वेळात आपला चेहरा साध्या पाण्याने दोन-तीन वेळा धुवा.
- चेहरा स्वच्छ केल्यानंतर अल्कोहोल बेस्ड टोनर वापरायला हवे. यानंतर दिवसाची वेळ असेल तर सनस्क्रीन आणि रात्रीची वेळ असेल तर मॉइस्चरायझर लावावे.
- सौम्य युनिफॉर्म बीड स्क्रबही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरता येईल. 'एक्झेमा' किंवा 'डर्मिटायटिस' याला आपण साध्या भाषेत 'खाज' म्हणतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांत ती वाढते. हवेतील दमटपणा आणि सतत बदलते हवामान यामुळे एक्झेमाच्या रुग्णांच्या त्वचेची एक्झेमाला रोखण्याची यंत्रणा कमकुवत झालेली असते. खूप खाजवल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते, रक्तही येऊ शकते, खाज आणखी वाढू शकते आणि दुय्यम स्वरूपाचे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. डर्मिटोलॉजिस्ट्स स्टिरॉइड्स, टॉपिकल इम्युनो मॉड्युलेटर्स (टॅक्रोलिमस/ पिमेक्रोलिमस) यांसारखी औषधे आणि मेडिकेटेड नॉन-कॉस्मॅटिक मॉइश्चरायझर्स देऊन 'एक्झेमा' बरा करू शकतात. मुलांनाही 'एक्झेमा'ची लागण होऊ शकते. जगभरातील १८-२१ टक्के मुलांना बालवयातील 'एक्झेमा'ची लागण होते. या मोसमामध्ये अटॉपिक डर्मिटायटिस आणि नॅप्पी/डायपर रॅशची शक्यताही वाढते.
'एक्झेमा' वाढण्यापासून कसे रोखता येईल?
उत्तम आर्द्रता टिकवून असलेली त्वचा म्हणजे निरोगी त्वचा. या मोसमामध्ये त्वचेसाठी क्रीम बेस्ड मॉस्चरायझर्सपेक्षा लोशन बेस्ड मॉइस्चरायझर्स वापरणे चांगले. दुकानात विकत मिळणारी कॉस्मेटिक मॉइस्चरायझर्स वापरणे टाळायला हवे. कारण, अशा क्रीम्सना सुगंधी बनविणारे, रंग देणारे घटक अॅलर्जी वाढण्याचे सर्वात मोठे कारण असते. आपल्या त्वचेसाठी कोणते मॉइस्चरायझर चांगले आहे याविषयी आपल्या डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा.
-धूळ, घाण, परागकण व प्राण्यांच्या अंगावरील लव यांच्यासारख्या अॅलर्जीला कारणीभूत ठरणार्या गोष्टींपासून दूर राहा.
- 'एक्झेमा' असलेल्या रुग्णांना घाम आल्यास अधिक खाज सुटते तेव्हा त्वचा कोरडी ठेवणे, दिवसातून दोनदा अंघोळ करणे, सैल सुती कपडे घालणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत कीटकदंश, कीटकांचे चावे ही समस्याही सर्रास आढळून येते. कीटकांनी दंश केल्यामुळे अॅलर्जीच्या रुग्णांना एखादी लाल खाजरी पुळी येणे इथपासून ते अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अर्टिकॅरिया-अॅन्जिओडेमासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच अशा परिस्थितीत ताबडतोब डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा. अॅलर्जीची समस्या असलेल्या रुग्णांना अॅण्टि-हिस्टामाइन्स आणि स्टिरॉइड्सची गरज लागू शकते, तर मधुमेह तसेच रोगप्रतिकारशक्तीचे दीर्घकाळासाठी दमन करणार्या आर्थ्रायटिस सारख्या आजारांच्या रुग्णांना अधिक गंभीर स्वरूपाचा जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. मधुमेह आटोक्यात नसेल तर अशा संसर्गांवर उपचार करणे कठीण जाते. विविध वैद्यकीय समस्या असलेल्या अशा रुग्णांनी त्वचेच्या अॅलर्जिज, चावे/दंश, बुरशी, विषाणू वा बॅक्टेरियाजन्य जंतुसंसर्गाकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट आहेत.)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat