ज्युईश आस्था-श्रद्धा-निष्ठेनुसार एकूण १३ तत्त्वं आणि सूत्रांचा स्वीकार आणि त्याचे दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे ‘धर्म’ या विषयावर आपल्या देशात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या समाजात जशी मत-मतांतरे असतात, अगदी तसेच इस्रायल या देशांतील ज्यूधर्मीय समाजात होत असते. या धर्मप्रणालीत ‘देव’ म्हणजे या ‘जगाचा निर्माता’ ही प्राथमिक संकल्पना आहे. हा देव एकमेव आहे, जो निराकार आणि अमूर्त आहे. तो आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम वास्तव्य करतो ही प्राथमिक श्रद्धा आहे. देव संपूर्ण मानवजात आणि इस्रायल हा देश यांचे नाते म्हणजे ‘ज्युडाइझम’ असा हा विश्वास आहे.
चानका - नऊ दिव्यांची मांडणी हे ज्यू धर्मप्रणाली आणि हिब्रू संस्कृतीमध्ये दिव्यांच्या उत्सवाचे प्रतीक अथवा रूपक म्हणून प्रचलित आहे. (चित्र क्र. १). ‘रोष हशानः,’ ‘योम किप्पोर,’ ‘सुक्कोत’ हे ज्युईश सण महत्त्वाचे मानले जातात, तितका हा दिव्यांचा सण महत्त्वाचा मानला जात नाही. मात्र, ‘मिनार’ आणि ‘चानका’ यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. ‘चानका’ ही नऊ दिव्यांची मांडणी ही किंग सॉलोमन याने बांधलेल्या देवळाचे शुद्धीकरण आणि त्याची पुनर्निर्मिती याचे प्रतीक मानले जाते. याचा आठ दिवसांचा सण दरवर्षी साजरा केला जातो. या सणासंदर्भात ज्युईश लोकमानसात एक निश्चित श्रद्धा आहे. ग्रीक आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या या देवळाच्या शुद्धीकरणावेळी एक दिवस पुरेल इतकेच ऑलिव्ह तेल दिव्यात शिल्लक होते. लोकश्रद्धा अशी की, एक चमत्कार झाला आणि तो दिवा सतत आठ दिवस तेवत राहिला. याची आठवण म्हणून या ‘चानका’ नऊ दिव्यांच्या मांडणीत ऑलिव्ह तेल घालून वात लावून किंवा मेणबत्त्या वापरून दिव्याचा उत्सव साजरा केला जातो. मधला दिवा किंवा मेणबत्ती सतत तेवत राहते. पहिल्या दिवशी उजवीकडचा दिवा प्रथम उजळला जातो, त्यामागोमाग रोज पुढचा एक दिवा असे आठ दिवे प्रज्वलित होतात, ही या सणाची खासियत आहे.
ज्युईश धर्मीयांचे सर्वात जुने आणि सर्वपरिचित चिह्न आणि प्रतीक म्हणजे ‘मिनोरा’ म्हणजेच सात दिव्यांची मांडणी. (चित्र क्र. २) ज्यू धर्मीयांच्या ‘सिनेगॉग’ या प्रार्थनागृहातील कोहानिम म्हणजे पुरोहित-पुजारी रोज संध्याकाळी तेल-वात घालून हा दिवा लावतो आणि रोज सकाळी तो स्वच्छ करतो. ‘मिनोर’ हे इस्रायल या राष्ट्राचे प्रतीक आहे. प्रकाश म्हणजे पूर्ण अहिंसा. राष्ट्राची निर्मिती हिंसेचा वापर न करता आपल्या सौजन्यशील वागणुकीने करायची आहे, असा संकेत ज्यू धर्मीयांना हे ‘मिनोरा’चे प्रतीक देत असते. हे अनंतकाळाच्या शाश्वत-चिरंतन-अनादी प्रकाशाचे प्रतीक आहे. प्रत्येक ‘सिनेगॉग’मध्ये ‘मिनोरा’ असला तरी अनेक ठिकाणी तो फक्त सहा दिव्यांचा असतो. सात दिव्यांचा ‘मिनोरा’ बनवताना त्यात काही त्रुटी-वैगुण्य राहू नये म्हणून तो सहा दिव्यांचा बनवला जातो.
ज्यूधर्मीय पुरुष एक वैशिष्ट्यपूर्ण शिरोभूषण वापरतात. या टोपीला ‘यामुल्के’ असे संबोधन आहे. (चित्र क्र. ३) पौर्वात्य देशात परंपरेने देवाच्या प्रार्थनेच्यावेळी देव-देवतेप्रति आदर म्हणून डोके झाकले जाते. गांधी टोपी-फेटा-मुंडासे अशी शिरोभूषणे भारतात वापरली जातात. तेच महत्त्व ज्यूधर्मीयांच्या या ‘यामुल्के’ टोपीला आहे. वैविध्यपूर्ण रंग आणि डिझाईन, छोटासा आकार ही या टोपीची वैशिष्ट्ये आहेत. प्रार्थनेसाठी ‘सिनेगॉग’मध्ये जाताना ही टोपी घालणे अनिवार्य असते. काही ‘सिनेगॉग’मध्ये विवाहित स्त्रियांना ही टोपी वापरणे बंधनकारक असते. एखाद्याकडे ‘यामुल्के’ टोपी नसली तर ती प्रवेशद्वारावर उपलब्ध करून दिली जाते. अन्य धर्मीय, ‘सिनेगॉग’मध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, त्यावेळी योग्य परिधान असणे आवश्यक असते. ज्युईश परंपरेने, तुम्ही जिथे असाल तिथे दैनंदिन प्रार्थना करू शकता. मात्र, काही प्रार्थनांचे महत्त्व असे असते की, त्या किमान दहाजणांच्या उपस्थितीतच केल्या जातात. प्रत्येक ‘सिनेगॉग’मध्ये स्त्रिया आणि पुरुषांची बसण्याची वेगळी व्यवस्था असत. स्त्रियांच्या उपस्थितीत पुरुष कुठलीही प्रार्थना करू शकत नाहीत.
अलीकडच्या काळात ‘मागेन डेव्हिड’ अर्थात ‘स्टार ऑफ डेव्हिड’ हे षट्कोनी चिह्न ‘ज्युडाइझम’ अर्थात ज्यूधर्मीय बांधवांचे चिह्न म्हणून जगात सर्वात जास्त प्रमाणात परिचित झाले आहे. (चित्र क्र. ४) इतिहासाचा संदर्भ घेतला तर एकमेकात विणलेल्या दोन समभुज त्रिकोणांचे हे चिह्न अर्वाचीन आहे, हे लक्षात येते. ज्यूधर्मीयांच्या कुठल्याही लिखित साहित्यात, मध्ययुगापर्यंत या चिह्नाचा उल्लेख उपलब्ध नाही. मात्र, फ्रान्झ रोझेंझ्वीग या प्रतीकशास्त्राच्या विद्वान अभ्यासकाने याचे ज्युईश धर्मशास्त्रातील अनेक संकेत आणि अर्थ स्पष्ट करून सांगितले आहेत. आकाशाकडे टोक असलेला त्रिकोण देवापर्यंत पोहोचतो, तर खाली भूमीकडे टोक असलेला त्रिकोण लौकिक अथवा पार्थिव जगाकडे निर्देश करतो. अलौकिक आणि लौकिक अशा दोन्ही जगांना जोडणारा हा षट्कोनी ‘स्टार ऑफ डेव्हिड’ असा हा पहिला संकेत आहे. कोहानिम-लेव्हाईट-इस्रायल या तीन ज्यू संप्रदायांचे हे प्रतीक आहे, असा दुसरा संकेत आहे. काहींच्या मते, प्रत्येक त्रिकोणाला आत तीन आणि बाहेर तीन अशा एकूण सहा बाजू आहेत. दोन्ही त्रिकोण मिळून एकूण १२ बाजू या ज्युईश समाजातील पारंपरिक १२ ज्ञातींचे प्रतीक आहेत, असा हा तिसरा संकेत आहे.
‘झिओनिझम’ ही इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीची कट्टर चळवळ १८९७ या वर्षात सुरू झाली. या चळवळीने ‘स्टार ऑफ डेव्हिड’ हे प्रतीक आपले मानचिह्न म्हणून स्वीकारले. त्यानंतर या चिह्नाचे महत्त्व स्वीकारले गेले. मात्र, इस्रायल राष्ट्राच्या निर्मिती नंतर हे राजचिह्न म्हणून स्वीकारण्याबद्दल खूप चर्चा झाली होती. आज हे चिह्न इस्रायलच्या ध्वजावर अंकित झालेले आहे. ज्यू प्रार्थनागृह वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. रुढीप्रिय आणि परंपरावादी ज्यू याला ‘शूल’ असे संबोधित करतात. ‘शूल’ हा यिडईश भाषेतील शब्द, स्कूल या मूळ जर्मन शब्दावरून आलेला आहे. यांच्या मते,‘शूल’ हे देऊळ विद्याभ्यासाची जागा आहे.