नवी दिल्ली : प्रत्येक घराला इंटरनेटशी जोडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संकल्प केला जाणार असून सीम कार्ड घेण्याइतके ब्रॉडबॅण्ड सेवा घेणे सोपे होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत ही माहीती दिली आहे. ते म्हणाले, "भारतातून इलेक्ट्रोनिक उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. डिजिटल गावानंतर आता डिजिटल साक्षरता मोहीम सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत ब्रॉडबॅण्ड सेवाही प्रत्येक घरात पोहोचवण्यावर सरकारचा भर असेल."
ब्रॉडबॅण्ड सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार एका योजनेवर काम करत आहे. त्याद्वारे देशातील प्रत्येक कुटूंब, उद्यमी, विद्यार्थी आदींना जोडण्याचे काम याद्वारे केले जाईल. लवकरच '5-G' सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव लवकरच केला जाणार असून त्यानंतर इंटरनेटचा वेगही वाढेल. ज्या प्रमाणे आत्ता प्रत्येक दुकानातून मोबाईल रिचार्ज करणे शक्य आहे, तशाप्रकारे ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू केल्यावर त्याचे पैसे भरणेही शक्य होणार आहे. सिमकार्डप्रमाणेच ब्रॉडबॅण्ड सेवा खरेदी करणे सुलभ होणार असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. डिजिटल इंडियाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.
देशातील सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते, युवा वर्गाची लोकसंख्या या उपलब्धीद्वारे भारत एक डिजिटल राष्ट्र म्हणून उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर आर्टिफिशील इंटेलिजन्सद्वारे नव्या संकल्पनांचा विस्तार करणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat