नोकरी नाकारून उद्योजिका झालेली फॅशन डिझायनर...

    18-Jul-2019   
Total Views | 238


 

ती फॅशन डिझायनर म्हणजे ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ या ब्राईडल वेअर ब्रॅण्डची संस्थापिका आणि सर्वेसर्वा नेहा चव्हाण.


एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरचं मुंबईतील पॉश कार्यालय. त्याच्यासोबत काम करायला मिळणं हे कित्येक नवोदित फॅशन डिझायनरसाठी दिवास्वप्न असतं. त्या कार्यालयात नुकतीच फॅशन डिझायनर म्हणून शिकून तयार झालेली तरुणी नोकरीसाठी गेली. मुलाखतीचा पहिला टप्पा तिने पार केला होता. दुसर्‍या टप्प्यात त्या कार्यालयातील उच्चपदस्थ व्यक्ती तिची मुलाखत घेणार होती. त्या तरुणीच्या मनात चलबिचल सुरू होती. कारण, एकीकडे होती उद्योजिका म्हणून नुकतीच चालून आलेली संधी आणि दुसरीकडे होता भारतातल्या टॉप फॅशन डिझायनरसोबत काम करण्याचा अनुभव अन् गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी.

 

हाच क्षण ठरविणार होता की, आयुष्यात ती नोकरी करणारी असेल की नोकरी देणारी. तिने शांततेत पण अगदी विनम्रतेने नोकरीचा प्रस्ताव नाकारला. त्याच क्षणी एका उदयोन्मुख फॅशन डिझायनर उद्योजिकेचा जन्म झाला. ती फॅशन डिझायनर म्हणजे ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ या ब्राईडल वेअर ब्रॅण्डची संस्थापिका आणि सर्वेसर्वा नेहा चव्हाण.

 

लंडनहून फॅशन डिझायनरमधली पदव्युत्तर पदवी मिळवून नेहा नुकतीच आली होती. तिने त्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या कंपनीत मुलाखतीचा पहिला टप्पा पार केला होता. मात्र, त्यांनी पुढच्या टप्प्याची काहीच कल्पना दिली नव्हती. किमान एक महिना तरी त्यासाठी वाट पाहावी लागणार होती. मात्र, एक क्षणदेखील शांत न बसणार्‍या नेहाला एक महिना म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखीच वाटले. घरात निव्वळ बसून राहण्यापेक्षा तिने घरातल्या आईच्या साड्या डिझाईन केल्या. त्याचे फोटो काढून ते समाजमाध्यमांमध्ये पोस्ट केले. नेहाने केलेले डिझाईन व्हायरल झाले. ती राहत असलेल्या इमारतींमधील माणसं, नातेवाईक, मित्रमंडळींनी डिझाईन पाहून तिचं तोंडभरून कौतुक केलं. काहींनी तर त्या साड्या खरेदी केल्या. लंडनला राहणार्‍या एका अनिवासी भारतीय महिलेला नेहाने केलेल्या साडी डिझाईनचं फारच कौतुक वाटलं. तिने ७ साड्या तिच्याकडून खरेदी केल्या. याचदरम्यान ती भुलेश्वरला गेली होती.

 

भुलेश्वर म्हणजे दक्षिण मुंबईतील कपड्यांचं, नक्षीदार पेहरावांचं माहेरघर. तिथल्या एका व्यापार्‍याला नेहाने केलेले डिझाईन्स खूप आवडले. नेहाला त्याने चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. मात्र, "एका प्रसिद्ध डिझायनरकडून आपल्याला नोकरीची ऑफर आलेली आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे नोकरी नाही करू शकत," असे तिने स्पष्ट केले. त्या व्यापार्‍याने तिला भविष्यात काय करणार, हे विचारले. ती म्हणाली, "चार-पाच वर्षे अनुभव घेऊन स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. स्वत:चा ब्रॅण्ड बाजारपेठेत प्रस्थापित करायचा आहे."

 

व्यापारी म्हणाला, "पाच वर्षांनंतरची संधी मी तुला आताच देतो. गुंतवणूक माझी, ब्रॅण्ड तुझा. ५०-५० टक्के भागीदारी. बोल आहे मंजूर?" नेहाने, ‘’काही दिवस विचार करून सांगते," असं म्हटलं. एक पूर्ण दिवस तिने सारासार विचार केला आणि व्यवसायाचा पर्याय निवडला. नेहा उद्योजिका होण्याचं कारण म्हणजे तिच्या रक्तात उद्योजकता आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहाचे आजोबा रामचंद्र चव्हाण उद्योजक होते. नेहाचे बाबा पेशाने अभियंता, मात्र ते एका यांत्रिकी उत्पादनाचे वितरक आहेत. नेहाची आई, प्रियांका त्यांना हातभार लावते. नेहाच्या आजी, म्हणजे प्रियांका चव्हाण यांची आई आज सत्तरीत असूनसुद्धा डोंबिवलीमध्ये ‘डोंबिवली ट्रेडर्स’ नावाचं स्टेशनरीमधलं जुनं अन् नावाजलेलं दुकान चालवतात. अशाप्रकारे उद्योजकता तिच्या अंगी भिनलेली आहे.

 

नेहाचं शालेय शिक्षण वांद्य्राच्या लर्नर्स अकॅडमी येथे झालं, तर बारावीपर्यंतचं शिक्षण एमएमके महाविद्यालयातून झालं. लहानपणापासूनच नेहाला कपड्यांची विशेषत: साड्यांची आवड होती. वाढदिवसाच्या दिवशी तर ती स्वत:च आईच्या साड्यांपासून ड्रेस तयार करून घालायची. आवडीचंच रूपांतर व्यवसायात करण्यासाठी तिने ‘फॅशन डिझायनिंग’ हे क्षेत्र निवडलं. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ या भारतातील नामांकित संस्थेतून तिने फॅशन डिझायनिंगची पदवी मिळवली. पुढे पदव्युत्तर पदवीसाठी तिला लंडनच्या महाविद्यालयात प्रवेश हवा होता.

 

पहिल्यांदा झालेल्या प्रवेश परीक्षेत लंडनच्या शिक्षकांनी नेहाला प्रवेश नाकारला. नेहा मुलाखतीच्या वेळीच रडली. प्रचंड मेहनत घेतली होती तिने. तिची तळमळ आणि फॅशनमधलं तिचं ज्ञान पाहून त्यांनी तिला २० दिवसांचा अवधी दिला. रात्रंदिवस एकत्र करून नेहाने पुन्हा एकदा प्रचंड मेहनत घेतली आणि तिला ‘लंडन कॉलेज ऑफ फॅशन’ या जगद्विख्यात महाविद्यालयात प्रवेश मिळाला. दिवसा कॉलेज, संध्याकाळी मॅकडोनल्डसारख्या ठिकाणी अर्धवेळ नोकरी, परत घरी जाऊन ड्रेस डिझाईन करणे अशी कसरत करत तिने फॅशन डिझायनिंगमधील मानाची पदव्युत्तर पदवी मिळवली.

 

एप्रिल २०१४ मध्ये नेहाने वरळी येथे स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. तिची मेहनत पाहून ती ज्या शिंप्याकडून ड्रेस शिवून घ्यायची, त्या शिंप्याने नेहाला शिलाई मशीन भेट दिली. वरळीला तीन वर्षांत ५०० हून अधिक ग्राहकांना उत्तम डिझाईन्सचे पेहेराव तिने तयार करून दिले. २०१७ मध्ये ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ प्रभादेवीला स्थलांतरित झाला. आज नेहाकडे कारागिरांसह मिळून १० कर्मचारी, तर ८०० हून अधिक ग्राहक आहेत. सणासुदीचे पेहराव आणि वधूचा पेहराव आदी ग्राहकांना हवे तसे तयार करून देणे, ही नेहा चव्हाण यांची खासियत. आतापर्यंत १०० हून अधिक नववधूंचे पेहराव नेहा यांनी डिझाईन केलेले आहेत. पेहरावामुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. जर ‘त्या’ गलेलठ्ठ पगार आणि फॅशन डिझायनरच्या वलयाला नेहा भुलली असती तर आज ‘नेहा चव्हाण’ हा ब्रॅण्ड दिसला नसता. आलेली संधी हेरून उद्योगजगत निर्माण करणारे नेहा चव्हाणसारखे उद्योजक खर्‍या अर्थाने मराठी उद्योगविश्वाचे आशास्थान आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121