जाणिवांच्या कक्षा विस्तारणारे माझे गुरु

    16-Jul-2019
Total Views | 55




सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.

 

'गुरू', केवळ दोन अक्षरी शब्द, 'शिष्य', हाही तितकाच छोटासा शब्द. मग त्यात इतका फरक काय आणि का? खरं तर याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपदर्शनापूर्वी अतिशय सोप्या शब्दात दिलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात,"अर्जुना, आपल्यात फरक इतकाच आहे की, 'मला माहीत आहे' आणि 'तुला माहीत नाही' आणि हाच फरक गुरू आणि शिष्यामध्ये आहे."

 

आता माझ्या गुरूंविषयी म्हणाल तर सुरुवात अगदी माझ्या जन्मापासून होते. माझे आईवडील, आजोबा- आजी, शाळेतील, महाविद्यालयातील गुरुजन, माझे अनेक आप्तेष्ट, मित्र, सहकारी. पुढे नाट्य, चित्रपट, संगीतक्षेत्रात ज्यांच्याकडून, ज्यांच्यामुळे खूप काही शिकलो, समजून घेऊ शकलो, असे अनेक गुरू मला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लाभले. यादी खूप मोठी आहे. पण ज्यांचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा, असे म्हणजे विद्याताई पटवर्धन, रामनाथ थरवळ, गुरू पार्वतीकुमार, अरविंद आणि सुलभा देशपांडे, दामू केंकरे, राजीव नाईक, विनय धुमाळे, अमोल आणि चित्रा पालेकर, देबू आणि श्रावणी देवधर, विजय भोपे, जफर सुलतान आणि मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते सर्वच दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सहकलाकार.




 

आयुष्यात अशी खूप माणसं येतात, जी आपल्याला 'काय करू नये' हे शिकवत असतात. माझ्या दृष्टीने तेही माझे गुरूच! या सर्वांचा माझ्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि व्यावसायिक कर्तृत्वात (जर ते असेल तर) प्रचंड मोठा वाटा आहे. ज्ञानप्राप्तीनंतर शिष्याने 'गुरुदक्षिणा देणे' हे गुरू-शिष्य परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते. माझ्या कोणत्याही गुरूने आजवर माझ्याकडून 'गुरुदक्षिणा' मागितली नसली तरी माझ्या मते ' एक निर्णय...स्वतःचा, स्वतःसाठी' हा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून माझ्या हातून घडलेला चित्रपट, ही माझी, माझ्या सर्व गुरुजनांना अर्पण केलेली गुरुदक्षिणाच आहे.

 

आयुष्याच्या अशाच एका वळणावर माझी आणि 'त्यांची' भेट 'झाली की घडली?' 'आयुष्याच्या वळणावर' ही जरी म्हणायची पद्धत असली तरी तिथून पुढे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. अनेकदा वळणांवर पाटी लिहिलेली असते 'अपघाती वळण' किंवा 'धोकादायक वळण.' हो, माझ्याबाबतीत तसंच घडलं. कारण, माझ्या दृष्टीने तो अपघातही होता आणि धोकादायकही. पण, 'त्यांच्या' दृष्टीने ती एक पूर्वनियोजित, स्वाभाविक घटना होती.

 

त्या दिवशी म्हणजे २०१२ सालच्या नवरात्रीतल्या पंचमीला मला त्याचं दर्शन मिळालं. माझी विचारपूस करून झाल्यावर, निरोप घेण्यासाठी मी पुन्हा नमस्कार करीत असताना ते मला फक्त इतकंच म्हणाले, "या पुन्हा...!" झालं.... तिथे सगळं संपलं होतं की सुरू झालं? माहीत नाही, त्याचा विचार करत बसायची आता गरजही नाही. त्या दोन शब्दांतून माझ्या 'सद्गुरूंनी' माझा शिष्य म्हणून परिपूर्णपणे स्वीकार केला होता. हे तेव्हा नाही, पण आज जाणवतंय. आता तुम्ही म्हणाल की यात 'अपघात' आणि 'धोकादायक' म्हणण्यासारखं काय होतं? तर अपघात हे ठरवून केलेले नसतात किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे घडतात. इथे तसंच झालं. असं काही पुढे जाऊन घडणार आहे, याची मला सुतरामही कल्पना नव्हती आणि त्यामुळेच मी 'निष्काळजीपणानेच' त्या क्षणांना सामोरा गेलो होतो.

 

कदाचित मी जर काळजी घेतली असती, असं काही घडू नये म्हणून सतर्क असतो तर ही 'धोकादायक' परिस्थिती उद्भवलीच नसती. धोकादायक का? तर त्यानंतर मी माझा राहिलो नाही. लौकिक आणि शारीरिकदृष्ट्या जरी मी वेगळा असलो तरी त्या दिवशी, त्या क्षणी मी 'त्यांचा' झालो होतो. इथे,'समर्पित होणे', 'स्वत्व गमावून बसणे' हे शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक टाळले आहेत, कारण मी समर्पित आहे की नाही, हे मी नाही, तर त्यांनी ठरवायचे आहे आणि 'स्वत्व' विसरण्याला त्यांचीच परवानगी नाही.

 

तर त्या दिवशी दुपारी साधारण साडेतीन वाजता मी, 'समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आणि श्री शंकर महाराज' यांच्या गोरेगाव येथील मठापाशी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला म्हणून गेलो होतो. तिला पुण्यातून पोहोचायला उशीर होत होता म्हणून, आलोच आहे तर मठात जाऊन दर्शन घ्यावे, असा विचार करून आत गेलो. मैत्रिणीने सांगितलं होतं, "आत गेलास तर 'भाऊ आणि माँ'ना नक्की भेट." गाभार्‍यात दर्शन घेऊन झाल्यावर आतल्या दालनात जात असताना, मधल्या दरवाजातच एका बाईंची आणि माझी टक्कर होणार होती, पण त्यांच्याच समयसूचकतेमुळे ती नाही झाली. वर म्हटल्याप्रमाणे मी निष्काळजीपणे वावरत होतो ना... आत, एका आसनावर 'ते' बसले होते, वयाने तरुण, निळ्या रंगाची डेनिम्स आणि अंगात चेक्सचा शर्ट... कसलेही अवडंबर नाही की भपका नाही. का कुणास ठाऊक, डोकं टेकवून त्यांना नमस्कार करावा असं मला वाटलं आणि मी केलाही...

 

अत्यंत शांत, प्रसन्न आणि प्रेमळ आवाजात त्यांनी माझी चौकशी केली. शूटिंगला जायचं होतं म्हणून आणि मैत्रीण तोपर्यंत तिथे पोहोचली नसल्याने मी त्यांना पुन्हा नमस्कार करून निरोप घेताना ते म्हणाले, ''या पुन्हा." मी अष्टमीला परत मठात गेलो, खूप गर्दी होती, चालू असलेले कार्यक्रम आटोपल्यावर त्यांना भेटायला आतल्या हॉलच्याही पलीकडे असलेल्या त्यांच्या खोलीत, अर्थात परवानगी घेऊनच गेलो. 'ते', म्हणजे व्यवसायाने दंतवैद्य असलेले, डॉक्टर स्वरूप प्रामाणिक (भाऊ), आपल्या आसनावर बसले होते, यावेळी सोवळं नेसून आणि एक कॉटनचा कुर्ता अंगात घालून, कपाळाला गंध... बाहेर आरती नुकतीच झाली होती. त्यांच्या शेजारच्या आसनावर माँ, म्हणजे सौभाग्यवती भाग्यश्री प्रामाणिक बसल्या होत्या. माँना पाहिल्यावर लक्षात आलं, अरे, या तर त्याच बाई ज्यांच्यावर मी आपटणार होतो, दरवाजाच्या चौकटीत, परवा पंचमीला आणि मला मात्र वाटत होतं, परवा मला माँचं दर्शन नाही मिळालं. खरंतर त्याच मला दर्शन द्यायला दारात आल्या होत्या, पण माझंच लक्षं नव्हतं... निष्काळजीपणा दुसरा काय? आज मात्र, पुन्हा तसं घडू नये, म्हणून दोघंही आपापल्या आसनांवर बसून हसतमुखाने, अतिशय प्रेमाने माझं स्वागत करत होते.

 

हे सगळं सविस्तर सांगायचं कारण इतकंच की, सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे'अनुभव' कथन करता येतात, 'अनुभूती' मात्र ज्याची त्याने घ्यायची असते. त्यामुळेच, 'सद्गुरूंनी तुला काय दिलं?' या प्रश्नाचं मी इतकंच उत्तर देऊ शकेन की, त्यांनी मला 'जाणीव' दिली, 'जाणिवांच्या कक्षा' विस्तारित केल्या, घटनांकडे 'साक्षी भावनेने' पाहायला शिकवलं, गोष्टींना 'स्वीकृती' द्यायला शिकवलं. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याची 'दृष्टी' दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थ सदगुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने (चमत्कारांनी नव्हे) जगणं किती आनंददायी बनू शकतं, याची अनुभूती दिली. माझं आयुष्य खर्‍या अर्थाने 'समृद्ध' केलं.

 

'ओम नमो महासिद्धाय, श्री गजाननाय स्वाहा'

 

- श्रीरंग देशमुख

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121