विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत बहाई फेथ - सर्वात तरुण संप्रदाय : चिह्न आणि प्रतीके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2019   
Total Views |




प्राचीन भारतीय चिह्नसंस्कृतीतील हिंदू धर्म आणि इस्लाम धर्मातील प्रतीके यांच्याकडे वळण्याआधी जगभरातील अन्य धर्मप्रणालींच्या आणि पंथ-संप्रयादायांच्या चिह्न-प्रतीकांचा परिचय करून घेऊया. मूळ इस्लामिक तत्वज्ञानापासून फारकत घेऊन निर्माण झालेले 'बहाई फेथ' या संबोधनाने परिचित असणार्‍या 'बहाई संप्रदाय' या सर्वात तरुण धर्मप्रणालींच्या प्रतीक आणि चिह्नांचा अभ्यास आणि त्याचे संकेत समजून घेणे हा फार रंजक अनुभव आहे




 

 

'असोसिएशन ऑफ रिजनल डाटा अकाईव्ह' यांच्या गणनेनुसार २०१० मध्ये भारतात १८ लाख, ९८ हजार 'बहाई श्रद्धा संप्रदाय' स्वीकारलेले नागरिक होते. याच २०१५च्या जनगणनेनुसार ही संख्या २० लाख इतकी आहे. मात्र, २०११च्या भारतीय जनगणनेनुसार, 'बहाई श्रद्धा संप्रदाय' स्वीकारलेले अंदाजे साडेचार हजार अनुयायी भारताचे नागरिक होते. 'बहाई फेथ' म्हणजेच साधारण दीडशे वर्षांपूर्वी बहाउल्लाह यांनी पर्शियात स्थापन केलेला हा एकेश्वरवादी 'बहाई श्रद्धा संप्रदाय.' याचे अनुयायी काही विशेषतत्वाचे एका श्रद्धेने पालन करतात म्हणून याला 'फेथ' असे इंग्रजी संबोधन वापरले गेले आहे. या संप्रदायात 'धर्मगुरू' ही संकल्पना नाही. संप्रदायाचे सर्व व्यवहार संप्रदायाच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या मंडळाकडून नियंत्रित होतात. या संप्रदायाचे कुठलेही चिह्न, धर्मचिह्न म्हणून वापरले जात नाही. या श्रद्धाप्रणालीची ही निव्वळ मार्गदर्शक रूपके आणि प्रतीके आहेत.

 

जगातील सर्व धर्म-पंथ-संप्रदाय यांची सर्व आराध्य श्रद्धास्थाने समान-एकरूप-एकात्म आहेत, त्यात कुठलाही भेद नाही, हे 'बहाई' श्रद्धेचे पहिले तत्व. कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता संपूर्ण मानवजात एकसंघ होणे आवश्यक आहे आणि तसे येत्या काळात निश्चितपणे होणार आहे, असा विश्वास धारण करून या तत्त्वाचा प्रचार-प्रसार करणे हे या संप्रदायाने स्वीकारलेले दुसरे तत्व. प्रत्येकाला शिक्षण आवश्यक आहे म्हणून ते अनिवार्य आहे हे बहाई प्रणालीचे तिसरे तत्व. 'बहाई' प्रणालीच्या चौथ्या तत्वानुसार 'धर्मप्रणाली-संकल्पना' आणि 'विज्ञान' या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या संप्रदायाच्या स्थापनेआधी अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मप्रणालींच्या अपेक्षांची पूर्तता म्हणजेच 'बहाई संप्रदाय' अशी या प्रणालीच्या अनुयायांची निश्चित धारणा आणि श्रद्धा आहे. म्हणूनच अशा सर्व धर्मप्रणाली सत्य आणि वैध प्रणाली आहेत, या धारणेने हे अनुयायी आनंदाने आणि आदराने या प्रणालींचे अस्तित्व मान्य करतात. कुराण शरीफसह सर्व धर्माचे धर्मग्रंथ म्हणजे देवाचा शब्द आहे.




 

 

अब्राहम-मोझेस-झोरास्टर-बुद्ध-येशू ख्रिस्त या देवाच्या सर्व प्रेषित आराध्य महापुरुषांनी देवाचा शब्द त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचवला, अशी 'बहाई' अनुयायांची श्रद्धा आहे. 'नऊ' हा अंक एककमधील सर्वात मोठी संख्या आहे. 'बहाई' श्रद्धेनुसार 'नऊ' हा अंक पूर्णत्वाचा आहे. असे नऊ कोन असलेला म्हणजे 'नाईन पॉईण्टेड स्टार' हे या परिपूर्णता अथवा संपूर्णता या संकल्पनेचे रूपक आहे. (चित्र क्र १). 'नऊ' या अंकाला वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक जीवनात आवश्यक अशा नऊ गुणवत्तांनी अलंकृत केले आहे. संघभावना, प्रामाणिकपणा, पावित्र्य, औदार्य, विश्वास, सात्विक हेतू, मानवता, कर्तव्यनिष्ठा, कामावरील श्रद्धा अशा या नऊ गुणवत्ता 'बहाई श्रद्धा संप्रदाया'मध्ये प्रमाण मानल्या गेल्या. प्रत्येक श्रद्धावान 'बहाई'ने या गुणवत्ता जोपासणे आवश्यक असते.

 

उत्क्रांती काळापासून झालेल्या चिह्नांच्या निर्मितीच्या इतिहासाचा संदर्भ असे सांगतो की, 'टिंब' ही भूमितीय चिह्नाची पहिली निर्मिती होती. टिंबापासून रेषा आणि रेषेपासून कालांतराने तीन प्राथमिक द्विमिती चिह्न निर्माण झाली. ही तीनही प्राथमिक चिह्ने म्हणजे वर्तुळ- चौकोन-त्रिकोण. वर्तुळाला सूर्याचे आणि संपूर्ण विश्वाचे रूपक मानले गेले. आपण स्वतः आणि विश्वाचा अफाट पसारा याची जाणीव झाल्यावर या वर्तुळातील विश्वाच्या मध्यावरचे टिंब म्हणजे 'मी' असे रूपक त्या हुशार मानवाने रेखांकित केले. भीमबेटकामधील गुहांमध्ये या वर्तुळातील टिंबाची अनुभूती मिळते. याच रेषांचा वापर करून पुढे चौकोन हे पृथ्वीचे रूपक आरेखित झाले. या मागोमाग समभुज त्रिकोण आरेखित झाला. मात्र, नेमक्या या त्रिकोणाचे अनेक अर्थसंकेत काही हजार वर्षात सांगितले गेले.

 

सजीवसृष्टी-वनस्पती-खनिज असा या समभुज त्रिकोणाचा पहिला अर्थसंकेत सांगितला गेला. भारतीय संस्कृतीमध्ये या चिह्नाला, 'तामस-राजस-सत्व' या त्रिगुणाचे रूपक मानले गेले. स्वर्गलोक-पृथ्वीलोक-पातळलोक असा संकेत काहींनी दिला. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीच्या निर्मिती-स्थिती-लय या तत्वांचे प्रतीक याच त्रिकोणाला तयार केले. 'शीर्ष'खाली असलेला त्रिकोण शक्तितत्वाचे म्हणजेच स्त्रीतत्वाचे रूपक झाले, तर 'शीर्ष'वर असलेला त्रिकोण शिवतत्वाचे म्हणजेच पुरुषतत्वाचे रूपक मानले गेले. असे दोन उलट-सुलट त्रिकोण एकावर एक ठेवल्यावर हे सहा कोनांचे शिव अधिक शक्तीचे चिह्न, प्राचीन भारतीय संस्कृतीत युगुलधर्माचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले. याच त्रिकोणाचा प्रवास जगातील चारही दिशांमध्ये झाला होता. यातूनच असे तीन समभुज त्रिकोण एकत्र करून, पर्शियामध्ये 'बहाई' संप्रदायाचे नऊ कोनांचे चिह्न आरेखित झाले आहे. चित्र क्र. १ मध्ये (चित्र क्र १) अशा नऊ कोनांच्या तीन आकृती समाविष्ट केल्या आहेत. यातील उजव्या बाजूची आकृती, एकात एक विणलेल्या अथवा गुंफलेल्या तीन समभुज त्रिकोणांची बनलेली आहे.

 

मूजान मोमेन या 'बहाई श्रद्धा संप्रदाया'च्या अनुयायी अभ्यासकाने विसाव्या शतकाच्या अखेरीला अनेक पुस्तके लिहिली आहेत. 'हिंदुइझम आणि बहाई फेथ,' 'बुद्धिझम आणि बहाई फेथ,' 'अ‍ॅन इंट्रोडक्शन टू शियाईट इस्लाम' ही त्यातील काही लक्षणीय पुस्तके. 'बहाई श्रद्धा संप्रदाया'चा परिचय करून देतानाच प्राचीन भारतीय धर्मसंकल्पनांशी सांगड घालण्याचे काम या पुस्तकातून केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत 'बहाई' श्रद्धेचा स्वीकार करणार्‍या हिंदू धर्म बांधव-भगिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 'बहाई संप्रदाया'ने जगभरात अनेक शाळा स्थापन केल्या आहेत. भारतात महाराष्ट्रातील पाचगणीमध्ये एक आणि सिक्कीममध्ये गंगटोक आणि रानिपूल इथे दोन शाळा आहेत.

 

या नऊ कोनांच्या रूपकाचा फार छान आविष्कार म्हणजे दिल्लीतील 'बहाई लोटस टेम्पल.' या श्रद्धास्थानाच्या इमारतीत नऊ कोनांत प्रत्येकी नऊप्रमाणे एकूण २७ कमळाच्या पाकळ्या फुललेल्या दिसतात. याला नऊ प्रवेशद्वारे आहेत. भारतीय संस्कृती आणि बहाई श्रद्धेतील प्राथमिक तत्त्वे यांचा विलक्षण मिलाफ असलेला आधुनिक कमानकलेचा-स्थापत्यकलेचा हा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. चित्र क्र. २ मधील सर्वात वरचे चिह्न हे 'बहाई फेथ' या संप्रदायाचे 'रिंगस्टोन' या संबोधनाने परिचित नऊ कोनांच्या चिह्नापेक्षा वेगळे चिह्न आहे. याचा अर्थ हे अंगठी-गळ्यातील माळेचे पदक अशा आपल्या वैयक्तिक अलंकारात या चिह्नाचा वापर प्रामुख्याने केला जातो.

 

ही संयुक्त प्रतीक असल्याने यातील चिह्नाचे सर्व भाग वेगळे करून त्यातील प्रत्येक चिह्नाचा अर्थ सांगायचा माझा हा प्रयोग आहे. हे 'बहाई' तत्वज्ञानाचा आणि अनुयायांचा परिचय करून देणारे चिह्न आहे. या चिह्नाचा वापर प्रामुख्याने, 'बहाई' प्रणालीचा प्रचार आणि प्रसार करताना केला जातो. (चित्र क्र. २) या चित्रातील दुसरे चिह्न हे देवाचे म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याचे रूपक आहे. त्याच्या खाली तिसर्‍या क्रमांकावर देवाच्या प्रेषिताचे किंवा साक्षात्कारी पुरुषाचे चिह्न आहे. त्याखाली चौथ्या क्रमांकावर असलेले चिह्न मानवलोकाचे आणि त्यातील मानवाचे रूपक आहे. आता पाचव्या क्रमांकावरील चिह्न तिसर्‍या क्रमांकाच्या प्रेषिताचे अथवा साक्षात्कारी पुरुषाचे रूपक आहे. फक्त हे चिह्न उभे आहे इतकाच फरक आहे. याचा अर्थसंकेत असा की, हे प्रेषित आणि साक्षात्कारी पुरुष देवाकडून त्यांना प्राप्त झालेले संदेश मानवलोकात लोककल्याणासाठी प्रसारित करत असतात, सामान्य मानवाला देवाशी जोडण्याचे काम करतात. सर्वात खाली असलेल्या पाच कोनी चांदण्या या 'बाब' आणि 'बहाउल्ला' या 'बहाई' पंथाची स्थापना करणार्‍या दोन प्रेषितांची रूपके आहेत.

 

१९ व्या शतकाच्या मध्यावर अशा काही घटना घडल्या ज्या 'बहाई फेथ' या संप्रदायाच्या स्थापनेस कारणीभूत झाल्या. पर्शियामधील सर्व नागरिक, इस्लामचा पायिक असलेल्या मिर्झा अली मोहमद म्हणजेच 'बाब'नामक विद्वानाच्या एका घोषणेनंतर, सन १८४४ ते १८५३ या नऊ वर्षांच्या काळात, खूपच उत्सुकतेने एका घटनेची वाट पाहत होते. इस्लामच्या धर्मग्रंथातील वचनाप्रमाणे, आता प्रतीक्षेचा काळ संपला असून देवाच्या वचनाप्रमाणे त्याने पाठवलेला 'बाब' हा स्वतःच एक प्रेषित आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आपल्या सर्व समाजाचा जीवनाकडे पाहण्याचा नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आता पूर्ण बदलणार आहे. नव्या शिक्षण व्यवस्था आणि ज्ञानशाखा उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे शाळेत शिकणारी छोटी छोटी मुलेसुद्धा विद्वान आणि वैज्ञानिकांना त्यांच्या बुद्धिसामर्थ्याने चकित करून टाकणार आहेत.

 

इस्लामच्या तत्कालीन मुल्ला-मौलवींना हे पटण्यासारखे नव्हते. त्यांच्या मते, अल्लाने पाठवलेला मोहम्मद पैगंबर हा शेवटचा प्रेषित होता. “अल्लाने पाठवलेला मी एक प्रेषित आहे,” असे विधान, धर्मविरोधी केलेला गुन्हाच आहे, स्वतःच्या धर्माचा त्याग करण्याच्या बरोबरीचे हे कृत्य आहे आणि यासाठी देहान्त हीच शिक्षा दिली जाईल. ९ जुलै, १८५० रोजी शिराझ या शहरातील मुख्य चौकात, सार्वजनिकरीत्या 'बाब'ला फाशी देण्यात आली आणि 'बाब'च्या हजारो अनुयायांचा शिरच्छेद केला गेला. पौर्वात्य देशांतील अशा घटनांचा परिचय आणि परिणाम, त्या काळात युरोपमधील विचारवंतांवर होण्यास सुरुवात झाली होती. 'बाब' आणि त्याच्या असंख्य निष्पाप अनुयायांच्या अमानुष हत्यांच्या बातमीने लिओ टॅालस्टॅाय, सारा बर्नहार्ट, अर्नेस्ट रेनान अशा विचारवंतांना काळजीत टाकले आणि 'बाब'च्या नव्या जीवन प्रणालीबद्दल समाजाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.

 

'बाब'च्या हत्येला कडाडून विरोध करणार्‍या आणि त्याच्या प्रणालीचे समर्थन करणार्‍या मिर्झा हुसेन अली अर्थात बहाउल्ला यांना आता समाजातून मोठे समर्थन मिळत गेले. 'बहाउल्ला' याचा अर्थ 'देवाचा गौरव.' त्यामुळे इस्लामिक मुल्ला-मौलवींनी त्याला अटक करून साखळदंडात जखडून तेहरानमध्ये आणले. कुठलेही आरोप न ठेवता, काही वर्षांच्या अनन्वित छळानंतर, जनमताच्या रेट्याने बहाउल्लाची तुरुंगातून सुटका करण्यात आली. ओटोमान साम्राज्याच्या अंमलाखाली असलेल्या इराकमध्ये त्यांनी आश्रय घेतला. 'बहाई श्रद्धा संप्रदाया'ची स्थापना करण्यासाठी बहाउल्ला कुर्दीस्थानमधील जंगलात अज्ञातवासात राहिले. तिथे यांना पुन्हा अटक होऊन १८९२ या वर्षी त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते बंदी म्हणून राहिले. इथेच त्यांनी 'बहाई' श्रद्धेची मूळ तत्व आणि सूत्र लिहिली. त्यांचा मुलगा अब्दुल बाहा यांनी वडिलांच्या मृत्युपश्चात संप्रदायाचा विस्तार केला. १९२१ मध्ये अब्दुल बाहा यांचे निधन झाले. आज जगभर विस्तारलेल्या 'बहाई श्रद्धा संप्रदाया'चा स्थापनेपासूनच सुरुवातीचा ५० वर्षांचा इतिहास, भीषण अत्याचाराने रक्तरंजित झालेला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@