धोका शोधण्याकरिता वा तपासण्याकरिता अधिक तंत्रज्ञान व गुप्तवार्ता यांची गरज आहे. आपल्याला धोक्याची पूर्वसूचना अथवा विश्वसनीय माहिती मिळालेली असेल, तर आपण आपली टेहळणी वाढवू शकतो, पाण्यातील गस्त वाढवू शकतो. नौदल आणि पोलीसही मदतीला येऊ शकतात.
मागील आठवड्यात कृष्णा स्वामी नटराजन यांनी भारतीय कोस्टगार्डचे २३वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी राजेंद्र सिंह यांची जागा घेतली, जे भारतीय कोस्टगार्डचे प्रथम 'कॅडर अधिकारी' होते. त्यांच्या आधी नौदलाचे अधिकारी कोस्टगार्डचे नेतृत्व करायचे. नटराजन भारतीय कोस्टगार्डचे पाचव्या बॅचचे अधिकारी आहेत. १८ जानेवारी, १९८४ रोजी ते कोस्टगार्डमध्ये सामील झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठातील संरक्षण व 'स्ट्रॅटेजिक स्टडीज'मध्ये पदवी घेतली आहे. आपल्या करिअरच्या ३५ वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी, ध्वज अधिकारी आणि महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफ अपॉईंट्समेंट धारण करण्याचा गौरव मिळवला आहे. त्यांनी भारतीय तटरक्षकदलाच्या सर्व प्रकारच्या जहाजांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत पश्चिम किनारपट्टीवर कुठलाही दहशतवादी हल्ला झाला नाही. आक्रमक कारवाई करून तटरक्षकदलाने दीड टनांहूनजास्त अमली पदार्थ म्हणजे 'नार्कोटिक्स' पकडले आहेत.
खाजगी बंदरांची सुरक्षा वाढवा
केंद्र सरकारने पश्चिम किनारपट्टीवरील खाजगी बंदरांना त्यांच्या हाताखाली असलेल्या बंदरांची सुरक्षा वाढवण्याकरिता सांगितले आहे. एका पाहणीत असे दिसले की, अनेक खासगी बंदरांची सुरक्षा कमकुवत आहे. यामुळे बंदरांवर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतीय नौदल, कोस्टगार्ड आणि महाराष्ट्र पोलीस यांनी केलेल्या पाहणीमध्ये हे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला सांगितले की, “महाराष्ट्रामध्ये असलेल्या बंदरांच्या सुरक्षेचे अवलोकन करण्यात आले. असे दिसले की, रायगड जिल्ह्यातील २० बंदरे ही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. यांची सुरक्षा एका ठराविक कालावधीमध्ये मजबूत करणे गरजेचे आहे. म्हणून या सगळ्या खाजगी कंपनींना आदेश देण्यात आला की, पुढच्या काही आठवड्याच्या आत ते आपल्या बंदरांचे सुरक्षाविषयक नियोजन बनवून ते कोस्टगार्डला दाखवून त्यावर अंमलबजावणी करावी.” २६/११ नंतर नियुक्त केलेल्या प्रधान कमिटीने सांगितले होते की, बंदरातून होणाऱ्या मच्छीमारी बोटींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय मच्छीमारांना 'बायोमेट्रिकआयडेंटिटी कार्ड'सुद्धा देणे गरजेचे आहे. असे दिसून आले की, अनेक ठिकाणी जिथे मच्छीमारी बोटी किनाऱ्यावरती येतात, तिथे अजूनसुद्धा होमगार्ड नियुक्त करण्यात आलेले नाही. म्हणजेच तिथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बोटींवर पुरेसे लक्ष नाही. एका पाहणीमध्ये असेही दिसून आले की, केरळ आणि तामिळनाडू या किनारपट्टीवर श्रीलंकेमधून अफू-गांजा-चरसची तस्करी केली जात आहे. या तस्करीमुळे या दोन राज्यांमध्ये हे अफू-गांजा-चरसचा दहशतवाद वाढतो आहे. म्हणजेच सध्या पाकिस्तानने आपले लक्ष दहशतवादी हल्ले कमी करून आता अफू-गांजा-चरसचा दहशतवाद वाढविण्याकडे ठेवलेले आहे.
तटरक्षक दल : सागरी सुरक्षेकरिता सर्वात महत्त्वाचे दल
भारताची सागरी सुरक्षा त्रिस्तरीय असून किनारपट्टीपासून २० नॉटिकल मैलापर्यंत किनाऱ्याचे रक्षण करण्याचे काम हे सागरी पोलिसांचे असते. २० नॉटिकल मैल ते २०० नॉटिकल मैलापर्यंत रक्षण करण्याचे काम हे भारतीय कोस्टकार्डचे असते. २०० नॉटिकल मैलच्या पुढची सागरी सुरक्षा भारतीय नौदलाकडे दिलेली आहे. मात्र, सागरी सुरक्षेकरिता जहाजाच्या आणि सैनिकी ताकदीच्या दृष्टीने तटरक्षक दल हे सर्वात महत्त्वाचे सुरक्षा दल आहे. फेब्रुवारी २००९ पासून भारतीय तटरक्षक दलास, प्रादेशिक पाण्यातील किनारी सुरक्षेस जबाबदार असणारे 'अतिरिक्त अधिकरण' म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. यात किनारी पोलीस दलांकडून गस्त घातली जाणारी क्षेत्रेही समाविष्ट आहेत.
तटरक्षक दलाची सुरक्षात्मक कारवाई
तटरक्षक दल आर्थिक-क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, समुद्री सुरक्षितता, समुद्री पर्यावरण संरक्षण, शास्त्रीय साहाय्य, राष्ट्रीय संरक्षण अशी विविध कर्तव्ये पार पाडते. समुद्रातील गस्त ही महासागरी सुरक्षेबाबत कुठल्याही धोकादायक परिस्थितीस सुयोग्य प्रतिसादासाठी महत्त्वाची असते. पूर्वसूचित आणि पूर्ण शस्त्रास्त्र सज्ज राहण्याकरिता, सर्व उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रभावी गस्त करणे आवश्यक आहे. गस्ती जमिनीवरून, समुद्रातून आणि हवाई मार्गांवरूनही केल्या जातात. जहाज किंवा नौका थांबवून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार, अवैध मासेमारी, तस्करी, मादक पदार्थांचा व्यापार इ. रोखण्यासाठी त्यात प्रवेश करून आरोहण कार्यवाही, शोध करण्याची कार्यवाही केली जाते. प्राथमिकतः किनारपट्टीवरील गस्त ही उथळ पाण्यातील नौका व विमानांद्वारे केली जाते. उच्च गती हस्तक्षेपक नौका आणि हवाई आधारावर चालणाऱ्या वाहनांचाही (एअर कुशन व्हेईकल्स, हॉवरक्राफ्ट) आतील भागातील खाड्यांवरील, नदीमुखांतून गस्तीकरिता, उपयोग केला जातो.
बहुविधपैलू विशेष जहाजे
भूमिका साकारण्यासाठी अनेक प्रकारची जहाजे वापरली जात असतात. अॅडव्हान्स्ड ऑफ शोअर पॅट्रोल व्हेसल्स, ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्स, पोल्युशन कंट्रोल व्हेसल, फास्ट पॅट्रोल व्हेसल, इंटरसेप्टर बोट्स, जलदगती प्रतिसादांकरिता आणि जलद रोख कार्यवाहीकरिता ही जहाजे उपयुक्त ठरतात.
तटरक्षक दलाच्या नौका आणि हवाईसामर्थ्य
२००८ मध्ये तटरक्षक दलाकडे ६१ नौका आणि सर्व प्रकारची मिळून ४५ विमाने होती. डिसेंबर २०१७ मध्ये १०५ नौका आणि सर्व प्रकारची मिळून ६४ विमाने आहेत. तटरक्षक दलाचे लक्ष्य २०२० पर्यंत १५० नौका आणि सर्व प्रकारची मिळून १०० विमाने बाळगण्याचे आहे. ८५ नौका खासगी आणि सार्वजनिक नौका शिपयार्डमार्फत बांधल्या जात आहेत. तटरक्षक दलापाशी हेलिकॉप्टर्सचा आणि सागरी गस्त विमानांचा एक ताफा आहे. जो अल्पशा पूर्वसूचनेवर समुद्रातील कुठल्याही हाकेस सादर होऊ शकतो.
भारतीय तटरक्षक दलाची कामगिरी
तटरक्षक दलाच्या जहाजांनी आणि विमानांनी या वर्षात ६१८ कोटी रुपयांचा अवैध माल पकडला. १८ परदेशी नौका आणि १६० खलाशी, भारतीय प्रादेशिक पाण्यात शिरून अवैध मासेमारी करताना पकडले गेले. चार नौका आणि ४६ खलाशांना तस्करी करताना पकडले. १७९ 'शोध आणि सुटका' (सर्च अॅण्ड रेस्क्यू) मोहिमा हाती घेतलेल्या आहेत. महासागरात अडचणीत सापडलेल्या ४३८ माणसांची त्यात सुटका करण्यात आली. समुद्रातून ३५६ जणांचे जीव वाचविण्यात आलेले आहेत आणि २९ जणांचे वैद्यकीय स्थलांतरण केले. २०१८-१९ मधील कामगिरी संकेतस्थळावर उपलब्ध नाही. नौदल आणि सागरी पोलिसांची कामगिरीही त्यांच्या संकेतस्थळावर दिसून येत नाही.
अजून काय करता येऊ शकेल?
गुप्तवार्ता वितरण आणि समुद्री पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वयन आणखी सुधारले पाहिजे. मच्छीमार नौकांच्या हालचालीची देखरेख करण्यासाठी एकसारखी नोंद प्रणाली, नियंत्रण प्रणाली, मागकारक प्रणाली इ. प्रणाली नियमितपणे अद्ययावत केल्या पाहिजेत. नौकांची ओळख पटवणे, नौकांचा माग काढणे, मासेमार नौकांची नोंदणी ही आणखी काही आव्हाने आहेत, ज्यांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. लहान मच्छीमार नौका तसेच सर्वच निरनिराळ्या प्रकारच्या नौकांची नोंद झाली पाहिजे. प्रत्येक बंदराच्या मार्गिका पद्धती, उतरण्याच्या जागा, नौका संचालन जागा आणि प्रत्येक मच्छीमाराला ओळखपत्र देण्याच्या पद्धती विकसित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नौकेचा माग काढणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा, त्या ठराविक मार्गिकेतून येतील. ते काम अजून सुरू आहे. एकाच कार्डद्वारे संबंधित व्यक्तीची सर्व माहिती मिळण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
नौका तपासल्याविनाच आत येऊ शकतात का?
धोका शोधण्याकरिता वा तपासण्याकरिता अधिक तंत्रज्ञान व गुप्तवार्ता यांची गरज आहे. आपल्याला धोक्याची पूर्वसूचना अथवा विश्वसनीय माहिती मिळालेली असेल, तर आपण आपली गस्त वाढवू शकतो. नौदल आणि पोलीसही मदतीला येऊ शकतात. तटरक्षक दल, भारताचा समुद्र सुरक्षित आणि निर्भयित ठेवण्यास वचनबद्ध आहे. त्यांचे ब्रीदवाक्य आहे 'वयं रक्षामः।' म्हणजे आम्ही रक्षण करू. आशा करू या की, ते त्यांची जबाबदारी अजून जास्त सक्षमरीत्या पार पाडतील.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat