विविध धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत ख्रिश्चन क्रॉस ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019   
Total Views |


 


'स्वस्तिक' चिह्न प्रत्येकाला माहीत आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. मात्र, प्रत्येकाला आकलन झालेला या चिह्नाचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. हा आहे 'कलेक्टिव अनकॉन्शस' म्हणजेच 'सामूहिक अबोध' सिद्धांताचा अनुभव.

 


या लेखमालेच्या निमित्ताने 'ख्रिश्चन क्रॉस' आणि 'स्वस्तिक' या चिह्नांच्या संदर्भात अलीकडे नियमित नव्याने वाचन होतं आहे. याच वाचनात दोन वर्षांपूर्वीची एक आठवण पुन्हा ताजी झाली. एका मान्यवर जागतिक संघटनेच्या जाणकार सभासदांसमोर, 'स्वस्तिक' चिह्न या विषयावर दृक्श्राव्य व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली होती. प्रथम व्याख्यान, मग प्रश्नोत्तरी, लक्षपूर्वक ऐकणारे सर्वधर्मीय पन्नास उच्चशिक्षित आणि मला परिचित श्रोते, असा हा कार्यक्रम खूप रंगतदार झाला होता. यातल्या श्रोत्यांबरोबर झालेल्या संवादातील दोन गोष्टी स्मरणात राहिल्या. धर्म-पंथ-संप्रदाय याच्या कक्षा ओलांडून जाणारे स्वस्तिक चिह्न, काही सहस्त्र वर्षांपासून जगभरातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये प्रचलित आहे, याची जाणीव प्रत्येक श्रोत्याला होतीच. मात्र, या चिह्नाचा निश्चित अर्थ काय, याच्या प्रत्येकाच्या जाणिवेतील जुजबी संकल्पना मात्र वेगवेगळ्या होत्या. जागतिक कीर्तिचा मनोविज्ञानतज्ज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड, त्याचा मान्यवर शिष्य डॉ. कार्ल गुस्ताव यंग आणि त्यांचा वारसदार डॉ. जॅक लॅाका यांनी विकसित केलेल्या 'कलेक्टिव अनकॉन्शस' म्हणजेच 'सामूहिक अबोध' या सिद्धांताचे, हा अनुभव म्हणजे अगदी समर्पक उदाहरण म्हणायला हवे. 'स्वस्तिक' चिह्न प्रत्येकाला माहीत आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. मात्र, प्रत्येकाला आकलन झालेला या चिह्नाचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. हा आहे 'कलेक्टिव अनकॉन्शस' म्हणजेच 'सामूहिक अबोध' सिद्धांताचा अनुभव. वर उल्लेख केलेला अनुभव, फक्त 'स्वस्तिक' चिह्नापुरताच मर्यादित नाही. 'ख्रिश्चन क्रॉस'च्या संदर्भात अगदी असाच अनुभव, माझ्या अभ्यासाच्या दरम्यान मी स्वतः घेतलेला आहे. “हे आमचे धर्मचिह्न आहे, हे निश्चित, मात्र तुम्ही विचारताय तसे त्याला काही संकेत असतात, याची आम्हाला काहीच माहिती नाही.” दहा ख्रिस्ती बंधू आणि भगिनींशी संवाद केल्यानंतर, नऊ जणांचे हे उत्तर होते. मात्र, एक जवळच्या परिचित ख्रिस्ती बांधवाने मात्र 'क्रॉस' या विषयात सखोल अभ्यास केल्याचे लक्षात आले. रेने गुनोन आणि डॉ. कार्ल गुस्ताव यंग या दोघांच्या, 'स्वस्तिक' चिह्नसंकेतांबद्दल आणि 'ख्रिश्चन क्रॉस'च्या संकेतांबद्दल मांडलेल्या विश्लेषणाने, या 'कलेक्टिव अनकॉन्शस' म्हणजेच 'सामूहिक अबोध' सिद्धांताचा अनुभव किती योग्य होता, यावर शिक्कामोर्तब झाले. थोडक्यात इतकेच की, शंभर वर्षांपूर्वी आनंद के.कुमारस्वामी यांनी त्यांच्या 'द डान्स ऑफ शिवा' या बारा निबंधांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या सर्वांना या चिह्न भाषेचा आणि त्यांच्या संकेतांचा आता विसर पडला आहे.

 

 
 

ब्रिगेडिअर जनरल अल्बर्ट पाइक (१८०९ - १८९१) हे चिह्नसंकेतांच्या अभ्यासात मला वंदनीय असलेले अजून एक विद्वान अमेरिकन तत्त्वज्ञ. अल्बर्ट पाइक संस्कृत, हिब्रू, पर्शियन, चाल्डी, जुनी सुमारीयान भाषा या सर्व भाषांमध्ये पारंगत होते. संस्कृत 'ऋग्वेद' आणि पर्शियन 'झेंड अवेस्ता' या दोन प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासातून, इंग्रजी भाषेत लिहिलेले आणि आजही जपून ठेवलेले १५ खंड अजूनही अभ्यासकाच्या प्रतीक्षेत आहेत. अल्बर्ट पाइक यांनी त्यांच्या ग्रंथात नोंदलेल्या सखोल अभ्यासात, प्राचीन इजिप्तमधील नागरिकांच्या, उत्क्रांती काळातील भूमिकेचे विश्लेषण मांडले. या अभ्यासानुसार, अगदी आदिम काळापासून आपले पूर्वज, एका अज्ञात आणि अमूर्त शक्तीच्या अधीन राहिले आहेत. चिह्न, चिह्नसंस्कृती, चिह्नसंकेत, प्रतीकशास्त्र, रूपके या सर्व संकल्पनांची गरज, प्रगतीच्या वाटेवर मानवाला प्रथम जाणवली असेल, ती याच अज्ञात आणि अमूर्त शक्तीच्या श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेपोटी. याच भावनेने आराधना-उपासना करताना त्याच्या लक्षात आले की, रोज सकाळ उगवते आहे-पुन्हा अंधार-पुन्हा सकाळ आणि प्रकाश निर्माण होतो आहे. या नियमित चक्राची आपल्या मर्यादित साधनांनी नोंद करताना त्यांनी रोज दर्शन देणाऱ्या सूर्याचे महत्त्व निश्चितपणे ओळखले असावे. म्हणूनच अविनाशी आणि अमरत्व प्राप्त झालेला देव म्हणून सूर्याला स्वीकारले असावे. आराधना-उपासना करण्यासाठी दृश्य स्वरूपातल्या प्रकाश-ऊर्जा देणाऱ्या सूर्याला या देवतेचे स्थान दिले गेले असावे. मला या अभ्यासात भेटलेल्या विद्वान अभ्यासकांचा सविस्तर परिचय आणि त्यांच्या साहित्यातील या दोन्ही चिह्नांच्या विश्लेषणाचे विस्ताराने वर्णन करण्यामागे काही उद्देश आहे. हे सर्व विद्वान अभ्यासक आपल्याला मानवाच्या उत्क्रांती काळातील मानसिकतेचा वैविध्यपूर्ण परिचय करून देतात. 'स्वस्तिक' आणि 'ख्रिश्चन क्रॉस' या चिह्नांच्या मूळ उगमस्थानापर्यंत घेऊन जातात. 'स्वस्तिक' चिह्न खूप प्राचीन काळापासून जगातल्या तत्कालीन सर्वच संस्कृतींमध्ये प्रचलित होते, आजही आहे. प्रत्येक प्रदेशातील पुरातत्व संशोधनातून याचे पुरावे सातत्याने उपलब्ध होत राहतात. 'स्वस्तिक' या शब्दाचा उगम संस्कृत भाषेतला आहे. मात्र या लेखमालेतून, त्या सर्व चिह्नांच्या स्वामित्वाची चर्चा न करता, त्याच्या अर्थसंकेताकडे आपल्याला जायचे आहे. मानवी उत्क्रांती- आपण कुठून आलो? आपला निर्माता कोण? आपल्या जीवनाचा उद्देश काय? मिळालेला मानवी जन्म सुखी आणि समृद्ध कसा करता येईल? अशा अनेक गहन प्रश्नांचा अभ्यास आपल्या प्रत्येक पिढीतील पूर्वजांनी सातत्याने केलेला दिसतो. इथे 'आपले पूर्वज' हा उल्लेख जगभरातील समस्त मानववंशाच्या संदर्भाने वापरला आहे. आपल्या लेखात उल्लेख झालेल्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील, म्हणजे गेल्या दोनशे वर्षांतील सर्व विद्वान अभ्यासकांनी, काही सहस्त्र वर्षातील या अभ्यासाची तुलना करताना त्याचे विश्लेषण केले.

 

 
 

'अधिक' अथवा 'प्लस' चिह्न, हे गणितातील वृद्धी सूचित करणारे चिह्न आहे आणि 'स्वस्तिक' चिह्नाची अगदी मूलभूत व्यक्त संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञानाच्या संकेतांनुसार, या चिह्नातील उभी रेषा हे 'शिवतत्त्व' म्हणजेच पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. यातील आडवी रेषा हे 'शक्तीतत्त्वा'चे म्हणजेच स्त्रीतत्त्वाचे प्रतीक आहे, तर दोन रेषांचा मध्य हे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे. विश्वाची निर्मिती आणि विकास असे दोन संकेत या चिह्नातून प्रसारित होतात. जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वाचे गमक आणि महत्त्व आपल्याला सांगितले. एकच निर्माता-एकच ब्रह्मतत्त्व-तोच जन्म देतो, पालन करतो आणि आपण पुन्हा त्या ब्रह्मतत्त्वात विलीन होतो. ख्रिश्चन धर्मशास्त्रसुद्धा 'आपण एकाच देवाची मुले आहोत' असाच संदेश देते. भारतीय संस्कृतीत, ब्रह्मा-विष्णू-महेश या अनुक्रमे निर्माता-पालनकर्ता-लयकर्ता या ब्रह्मतत्त्वाच्या तीन उद्देशांची मांडणी एका त्रिमूर्तीत केली गेली. ख्रिस्ती धर्मग्रंथात 'फादर-सन-अ‍ॅण्ड होली घोस्ट' या त्रिनिटीची संकल्पना विस्ताराने सांगितली गेली. एकाच निर्मितीक्षम चेतनेची ही विविध व्यक्तता आहे. नऊ वेळा भारतात येऊन, वाराणशीत संस्कृत पाठशाळांमधील विद्वानांसमोर बसून 'पतंजली योगसूत्रा'चा अभ्यास करणारे विद्वान जर्मन मानसविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. कार्ल गुस्ताव यंग यांनी त्यांच्या 'Jung on Christianity' म्हणजेच 'Symbolism of Cross' या विद्यार्थ्याबरोबरच्या संवादात 'क्रॉस'ची नेमकी हीच संकेत संकल्पना विस्ताराने विशद केली आहे. या चिह्नाच्या प्राचीन भारतीय अर्थसंकेताला ते आग्रहपूर्वक दुजोरा देतात. क्रॉसभोवती वर्तुळ याला चिह्नाभोवती काढलेल्या वर्तुळाचा डॉ. यंग यांनी एक वेगळा संकेत सांगितला. ज्यावेळी पृथ्वी सपाट आहे, ही संकल्पना प्रचलित होती, त्यावेळची ही भूमिका आहे. कोणत्याही व्यक्तीने सभोवार पाहिले तर वर्तुळातील आकाश दिसत असे. असा अवकाशाकडे गोल फिरून पाहणारा अर्थातच वर्तुळाच्या म्हणजे त्याच्या अवकाशाच्या म्हणजे क्रॉसच्या मध्यावर असे आणि उभ्या-आडव्या दोन रेषा चार दिशा दाखवत असत. डॉ. यंग म्हणतात, “हे वर्तुळ म्हणजे तत्कालीन व्यक्तिगत आयुष्यात प्रत्येकाने पाळायच्या मर्यादा असाही संकेत असावा.” वर उल्लेख केल्याप्रमाणे 'अधिक'चे किंवा 'प्लस'चे चिह्न फक्त संकल्पनेत वृद्धी दाखवत नाही, तर गणितासारख्या वास्तव भौतिक विज्ञान शाखेतसुद्धा, प्राचीन काळापासून बेरीज म्हणजे वृद्धीसाठीच वापरले गेले. दुसरे महत्त्वाचे असे की, गणितातील वजाबाकीचे आडव्या रेषेचे चिह्न जर या 'क्रॉस'च्या संकल्पनेतून काढून टाकले तर सतत लय होत राहील, वृद्धी कधीच होणार नाही. गणित या वास्तवाच्या सर्वात जवळ असणाऱ्या भौतिक विज्ञानशाखेतसुद्धा या आडव्या रेषेच्या चिह्नाचा वापर, ऋणात्मक म्हणजेच वजाबाकी-घट नोंदविण्यासाठीच केला जातो.

 

'ख्रिश्चन क्रॉस' आणि अर्थातच 'स्वस्तिक' चिह्नाचा अभ्यास जगभरातील मान्यवर विद्वानांनी केला. त्याला इतकी परिमाणे आहेत की, त्या सर्वांचा परिचय करून घेणे फारच रंजक आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सण आणि उत्सव नेहमीच खगोल विज्ञान आणि निसर्गाच्या ऋतू बदलावरून आखलेले आहेत. वर उल्लेख केलेले 'अधिक'चे अथवा 'प्लस'चे चिह्न याचे एक वेगळे रूप म्हणजे 'स्वस्तिक.' हे पारंपरिक भारतीय मंगलकारक चिह्न सूर्याचे प्रतीक आहे. बेरजेच्या चिह्नाला म्हणजे 'क्रॉस'च्या चिह्नाला चारी बाजूला काटकोनात जोडलेली एक रेषा म्हणजे 'स्वस्तिक' चिह्न. भारतीय संस्कृतीत आणि अर्थातच जगभरात याचे दोन प्रकार दिसतात. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजवीकडे वळणारे 'स्वस्तिक' आणि दुसरे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध डाव्या बाजूला वळणारे 'स्वस्तिक.' आपला भारत देश उत्तर गोलार्धात वसलेला आहे. २१ मार्च ते २१ जून या उत्तरायण काळात सूर्य उत्तरेला सरकतो. वसंत ऋतूच्या आगमनानंतर, चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण हिंदू नव्या वर्षाचा दिवस, गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. त्यापुढील २२ जून ते २१ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात तो पुन्हा पृथ्वीच्या दक्षिणेकडे सरकू लागतो. या उत्तरायण काळात, उजवीकडे वळणारे 'स्वस्तिक' 'वासंतिक स्वस्तिक' या संबोधनाने भारतीय संस्कृतीत परिचित आहे. वसंत-ग्रीष्म-वर्षा या ऋतूत, म्हणजे मार्च ते ऑगस्ट हा ग्रेगरियन कॅलेंडरचा सहा महिन्यांचा कालावधी. 'वासंतिक' कालावधीत साधारणपणे दिवस आणि रात्रसारख्या लांबीचे असतात. या उजव्या स्वस्तिकाला पुरुष प्रकृतीचे 'स्वस्तिक' म्हणूनही संबोधित केले जाते. साधारणपणे उजव्या बाजूला सातत्याने होणारे स्वस्तिकाचे गतीचे सूचक आंदोलन हे विकासाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. डाव्या बाजूला फिरणारे स्वस्तिकाच्या गतीचे सूचक आंदोलन हे लय-विघटन-नाश-वैगुण्याचे संकेत देते. अशा डाव्या आंदोलनाच्या स्वस्तिकाला शरद-हेमंत- शिशीर ऋतूंच्या काळात म्हणजेच २२ सप्टेंबर ते २० मार्च या ग्रेगरियन कॅलेंडर कालावधीत, सूर्याच्या दक्षिणायन काळात, 'शारदीय स्वस्तिक' असे संबोधित केले जाते. या काळात दिवस आणि रात्रीचा कालावधी विषम असतो. या डावीकडे गती असलेल्या स्वस्तिकाला स्त्री तत्त्वाचे म्हणजे शक्ती तत्त्वाचे प्रतीक मानले गेले आहे. 'स्वस्तिक' आणि 'ख्रिश्चन क्रॉस' या दोन्ही चिह्नांचे प्राचीन नाते असे रंजक आहे. या चिह्नसंकेतांचा प्रवास पुढील लेखात सुरू राहील...!!!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@