‘ख्रिस्ती क्रॉस’(ख्रिश्चन क्रॉस) आणि ‘स्वस्तिक’ या दोन्ही चिह्नांचे परस्पर नाते, अनेक अर्थसंकेत, विविध प्रगत आणि अप्रगत संस्कृतींमध्ये काही सहस्र वर्षांपासून प्रचलित झालेले दिसतात. ‘वासंतिक स्वस्तिका’चा, सूर्य-चंद्र-सप्तर्षीमंडळाची दैनिक आवर्तने असा एक संकेत प्राचीन भारतीय संस्कृतीत दिला गेला.
‘प्रतीकशास्त्र-चिह्न-चिह्नसंकेत-चिह्नार्थ’ या ज्ञानशाखेचा व्यापक विचार करणे हा कुठल्याही अभ्यासकासाठी महत्त्वाचा अभ्यास आणि गृहपाठ असतो. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ‘ख्रिश्चन क्रॉस’ आणि ‘स्वस्तिक’ या दोन्ही चिह्नांचा अभ्यास. या दोन्ही चिह्नांचे प्राचीन काळापासून असलेले अस्तित्व, जगभरातील अनेक प्रदेशात झालेला याचा प्रसार, समाजस्वीकृती आणि सरतेशेवटी त्याला जोडल्या गेलेल्या धार्मिक, आध्यात्मिक, अलौकिक आख्यायिका आणि मिथके या सर्व गुणवत्तांमुळे, अभ्यासकांना ही चिह्ने नेहमीच आकर्षित करतात. याचे संकेत आणि अर्थ शोधणे, याचा अभ्यास करणे म्हणजे याच्यासारख्या दिसणाऱ्या अथवा याच्यासारखे अर्थसंकेत देणाऱ्या अन्य चिह्नांशी तुलना करून या चिह्नांचे वेगळेपण स्पष्ट करणे. या अभ्यासात सातत्याने काही त्रुटींची जाणीवही होते. या चिह्नांच्या संदर्भात लौकिक ऐतिहासिक नोंदी आणि त्यावर झालेल्या संतुलित आणि लक्षणीय टीका अशा सर्व नोंदींचा अभाव सतत जाणवत राहतो. या चिह्नांचा अभ्यास करताना त्यांच्या पुरातत्त्व शोधाच्या नोंदी, त्याचा कालावधी, तत्कालीन समाजाची भौतिक व आध्यात्मिक प्रगती आणि महत्त्वाच्या घटना या सर्वांचा संदर्भ घेणे आवश्यक असते. समाजातील नागरिकांची स्थलांतरे, त्यामुळे प्रसार झालेली चिह्ने, नव्याने प्रचलित झालेली चिह्ने, या चिह्नांच्या संकेतांचे दर्शक आणि उपासकाला होणारे आकलन, या चिह्नांच्या संकेतांचा विज्ञान-तत्त्वज्ञान याबरोबरच समाजाच्या बुद्धीवर आणि भावनांवर असलेला प्रभाव आणि त्याचा पगडा अशा अनेक संदर्भांचे विश्लेषण या अभ्यासात करणे आवश्यक असते.
‘ख्रिस्ती क्रॉस’(ख्रिश्चन क्रॉस) आणि ‘स्वस्तिक’ या दोन्ही चिह्नांचे परस्पर नाते, अनेक अर्थसंकेत, विविध प्रगत आणि अप्रगत संस्कृतींमध्ये काही सहस्र वर्षांपासून प्रचलित झालेले दिसतात. ‘वासंतिक स्वस्तिका’चा, सूर्य-चंद्र-सप्तर्षीमंडळाची दैनिक आवर्तने असा एक संकेत प्राचीन भारतीय संस्कृतीत दिला गेला. (चित्र क्र.1मध्ये या सप्तर्षीमंडळाची दैनिक आवर्तने, ध्रुव ताऱ्याभोवती ‘स्वस्तिक’ चिह्नाच्या स्थिती आणि गतीप्रमाणे फिरताना कशी दिसत असतील, त्याची म्हणजेच ‘The Big Dipper’ या संकल्पनेची काल्पनिक आकृती.) काही संस्कृतीत हेच ‘स्वस्तिक’ शाश्वत आणि अनंतकाळाचे प्रतीक झाले. काहींसाठी हे चार दिशांचे निर्देशक चिह्न आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीसाठी हे ‘स्वस्तिक’ अग्नीचे आणि इंद्र-विष्णू-गणेश या देवतांचे रूपक आहे. कोणी या चिह्नांना पाऊस आणि चमकणाऱ्या विजेचे प्रतीक मानले. या चिह्नाची उभी आणि आडवी रेषा हे सजीवांच्या युगुलधर्माचे आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक म्हणूनही संमत झाले. त्याचबरोबर गणितातील वृद्धीचे म्हणजेच बेरजेचे चिह्न म्हणून सर्व जगात वापरले गेले. सरते शेवटी, उत्क्रांतीच्या प्राथमिक काळात वापरल्या गेलेल्या अग्नी प्रज्वलित करण्याच्या साधनेशी याचे साधर्म्य सांगितले गेले.
‘ख्रिश्चन क्रॉस’ आणि ‘स्वस्तिक’ यांचे भूमितीय आकृतीतील साधर्म्य याबरोबरच विविध संस्कृतीतील ‘सूर्यदेव’ या संकल्पनेचे आणि येशू ख्रिस्ताच्या देवत्वाच्या संकल्पनेतील साधर्म्य, या संदर्भातील अनेक विद्वानांचे विचार आपण पहिल्या चार लेखांत वाचले. मला माझ्या अभ्यासात ‘ख्रिश्चन क्रॉस’ या चिह्नाची किमान अडीचशे वेगळी रूपे आणि आकार अभ्यासता आले. जगभर पसरलेल्या ख्रिश्चन धर्माचे अनेक पंथ आणि संप्रदाय प्रचलित आहेत. या सर्वांनी जरी ‘क्रॉस’ हे चिह्न ‘धर्मचिह्न’ म्हणून स्वीकारले असले तरी, त्याचे अनेक आकार आणि रूपे प्रचारात आहेत. या प्रत्येक ‘क्रॉस’ चिह्नाला स्वतःचा वेगळा संदर्भ आहे, वेगळा अर्थसंकेत आहे.
सोबतच्या चित्र क्र. १ मधील पहिले चिह्न आहे ‘ग्रीक क्रॉस’चे. याचे चारही हात समान लांबीचे आहेत. रोमन कॅथलिक ख्रिश्चन इतिहासात चौथ्या शतकापर्यंत ‘क्रॉस’चे हे चिह्न मोठ्या प्रमाणात प्रचलित होते. यातील दुसरे चिह्न आहे ‘माल्टीज क्रॉस’चे. याच्या ’त’आकाराच्या प्रत्येक हाताला दोन काटे आहेत. जेरुसलेममधील सेंट जॉन याच्या नावाशी जोडला गेलेला हा ‘माल्टीज क्रॉस’ मध्ययुगात लष्करी शौर्य आणि युद्धातील पराक्रमी वीरांना शौर्याचे सन्मानचिह्न म्हणून दिला जात असे. ‘माल्टीज क्रॉस’च्या बाजूला आहे - गुणाकाराच्या चिह्नाचा अथवा इंग्लिश वर्णमालेतील ’ु’ या अक्षरासारखा दिसणारा, स्कॉटलंड या देशाचा रक्षणकर्ता ‘सेंट अॅण्ड्य्रू’ याचा क्रॉस. हा क्रॉस श्रद्धा भावनेचे प्रतीक मानला गेला आहे. या आकाराच्या क्रॉसवर सेंट अॅण्ड्य्रू यांना बळी दिले गेले. त्यावेळी हा क्रॉस त्यांनी आपल्या खांद्यावर वाहून वेदीवर नेला होता, अशी एक आख्यायिका सांगितली जाते.
वरच्या चित्र क्र. २ मध्ये पहिले चिह्न आहे ‘लॅटिन क्रॉस’चे. याला ‘रोमन क्रॉस’ असेही संबोधले जाते. याच्या चार हातांपैकी खालचा हात अन्य तीन हातांपेक्षा लांबीला जास्त असतो. सामान्यतः ‘येशू ख्रिस्ताचा क्रॉस’ किंवा ‘ख्रिश्चन क्रॉस’ असे म्हटले की याचेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्याच्या बाजूला असणारा उभ्या दांडीवर एक लहान, एक मोठी अशा दोन आडव्या दांड्या आणि सहा टोकांचा ‘पॅट्रीआर्कल क्रॉस’ किंवा ‘डबल क्रॉस’ या संबोधनाने ओळखला जातो. ‘वरिष्ठ धर्मगुरूंचा क्रॉस’ अथवा ‘आर्चबिशपचा क्रॉस’ या संबोधनानेसुद्धा हा ओळखला जातो. याच्या बाजूला आहे ‘पेपल क्रॉस.’ उभ्या दांडीवर लहान दांडीपासून सुरू होऊन मोठी अशा तीन समांतर दांड्या हे याचे वैशिष्ट्य आहे. ‘पेपल क्रॉस’ म्हणजे रोमन कॅथलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांचा क्रॉस. बाजूच्या ‘पॅट्रीआर्कल क्रॉस’पेक्षा तिसरी जास्त लांबीची आडवी दांडी, धर्मगुरू पोप यांचे आर्चबिशपपेक्षा वरचे, मोठ्या अधिकाराचे प्रतीक आहे.
चित्र क्र. ३ मध्ये पहिला आहे ‘इजिप्शियन क्रॉस.’ याला ‘अंख चिह्न’ असे म्हटले जाते. ख्रिस्तपूर्व पाच सहस्रके आधी प्राचीन इजिप्शियन संस्कृती खूप प्रगत झाली होती. हे चिह्न वेगवेगळ्या अर्थसंकेताने वापरले जात असे. मानवाच्या शाश्वत आणि अनंतकाळ टिकणाऱ्या जीवनाचे, सुपीक जमिनीचे, सजीवांच्या प्रजनन क्षमतेचे आणि राजा-राणी यांच्या चातुर्य- बुद्धिमत्ता या दैवी गुणवत्तेचे प्रतीक मानले गेले होते. अनेक इजिप्शियन देव-देवतांच्या प्रतिमांमध्ये हे चिह्न त्यांच्या हातात धरलेले दिसते. या चिह्नाचा इतिहास थोडासा रक्तरंजित आहे. प्राचीन इजिप्तमधील एका बहुदेवतावादी संप्रदायाचा र्हास झाल्यानंतर सेंट मार्क याच्या प्रेरणेने ख्रिस्तपश्चात पहिल्या शतकांत इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या ‘ख्रिश्चन कॉप्टीक चर्च’ने हे चिह्न स्वीकारले. ‘येशू ख्रिस्ताला फक्त एका मानवाचा दर्जा आहे, त्याला कुठल्याही दुसऱ्या संदर्भाने ओळखले जाणार नाही,’ असे मानणाऱ्या ‘ख्रिश्चन कॉप्टीक चर्च’ची ही संकल्पना सन ४५१ मध्ये कॅलसेडन या टर्कीमधील शहरात भरलेल्या ख्रिश्चन धर्मपरिषदेने अमान्य केली. अरबी आक्रमकांनी सातव्या शतकात इजिप्तवर केलेल्या हल्ल्यात असंख्य ख्रिश्चन कॉप्टीक धर्मबांधवांची कत्तल केली आणि या संप्रदायाचाही र्हास सुरू झाला. ‘इजिप्शियन क्रॉस’चे हे चिह्न आजही फक्त ‘ख्रिश्चन कॉप्टीक चर्च’मधील संप्रदाय बांधव वापरतात. चित्र क्र. ३ मध्ये पुढचे वर्तुळाकार चिह्न ‘सन क्रॉस’ या संबोधनाने परिचित आहे. ‘पृथ्वी सपाट आहे’ ही संकल्पना प्रचलित होती, त्या काळात हे चिह्न प्रचलित होते. याच्या पुढे आहे ’ढ’ या इंग्रजी मुळाक्षरासारखा दिसणारा ‘टाउ क्रॉस.’ सेंट अॅन्थनी आणि सेंट फ्रान्सिस या दोघांच्या नावाने क्रॉसचे हे चिह्न ओळखले जाते.
चित्र क्र. ४ मध्ये पहिले चिह्न आहे डावीकडे वळणारे ‘शारदीय स्वस्तिक चिह्न.’ मात्र, चिह्न हे डावीकडे कललेले आहे. आजच्या स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, उत्तर जर्मनी आणि पोलंड हे देश स्कॅण्डिनेविआ म्हणजेच उत्तर युरोपचा भाग आहेत. पुरातत्त्व अभ्यासानुसार ‘निओलिथिक’ म्हणजे पाषाणयुगाच्या अखेरच्या कालखंडात असे डावीकडे कललेले ‘स्वस्तिक’ या भागातील तत्कालीन नागरिकांच्या वापरात प्रचलित होते. विसाव्या शतकांतील अत्याचारी जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने हे चिह्न आपल्या संघटनेचे ‘मानचिह्न’ म्हणून स्वीकारले होते. कारण, तो त्या प्रदेशाचा रहिवासी होता. अडॉल्फ हिटलरच्या समजुतीनुसार, हे प्राचीन आर्यांचे प्रतीक होते. प्राचीन लोकश्रुतीनुसार डावीकडे वळणाऱ्या या ‘सुवास्तिक’ अशा संबोधनाने परिचित चिह्नामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ते विद्ध्वंसाकडे प्रवास करते.
चित्र क्र. ४ मध्ये मध्यभागी आहे, ‘क्रुसेडर क्रॉस.’ मध्यभागी एक अधिक चिह्नाच्या आकाराचा क्रॉस आणि त्याच्या चार कोनात चार छोटे क्रॉस अशी याची मांडणी आहे. या मधील क्रॉसच्या प्रत्येक टोकावर एक आडवी दांडी दिसते आहे. या चिह्नाची अव्यक्त किंवा संभवित क्षमता या प्रतीकात दडलेली आहे. चार कोनातले चार छोटे क्रॉस म्हणजे जगभरात चारही दिशांनी झालेला ख्रिश्चन धर्माचा प्रसार याचे हे प्रतीक आहे. जॉर्जिया या देशाच्या ध्वजावर हे चिह्न अंकित झालेले आहे.
चित्र क्र. ४ मध्ये पुढचे चिह्न ‘मरिनर क्रॉस’ (समुद्री खलाशाचा क्रॉस) आणि ‘सेंट क्लेमंट क्रॉस’ या संबोधनाने परिचित आहे. जहाजाच्या नांगराच्या आकाराचे हे चिह्न उमेद, आशा, विश्वास आणि खात्री असे संकेत देते. ‘जहाजाचा एक नांगर जसा निश्चितपणे आणि भक्कमपणे मोठ्या जहाजाला एका जागी उभे ठेवतो, तसाच विश्वास तुम्ही येशू ख्रिस्तावर ठेवा,’ असा हा चिह्नसंकेत आहे. क्रिकेटचे सामने सुरू असताना सहभागी अन्य देशांच्या ध्वजाबरोबर इंग्लंड या देशाचा हा ध्वज फडकताना आपल्याला नेहमी दिसतो. हा ‘युनियन फ्लॅग’ म्हणजे पांढऱ्या पार्श्वभूमीवर सेंट जॉर्जच्या ‘लाल क्रॉस’चे चिह्न असा बनलेला आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘ख्रिश्चन क्रॉस’ या चिह्नाची किमान अडीचशे रूपे आहेत. त्यातील माझ्या अभ्यासातील काही निवडक आणि महत्त्वाच्या प्रतीकांच्या चिह्नसंकेतांचा परिचय वाचकांना करून देता आला, हे माझे सद्भाग्य आहे.
या लेखमालेचा हा पन्नासावा लेख. पुढच्या लेखांत चार क्रॉसच्या चिह्नांनी अंकित झालेला इंग्लंडचा ‘युनियन जॅक’ हा ध्वज आणि अन्य प्राचीन आणि प्रचलित धर्मप्रणालींच्या चिह्न आणि प्रतीकांचा परिचय वाचकांना होईलच...!!..
दि. १६ जूनच्या अंकातील लेखात ‘भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे दोन वरिष्ठ मान्यवर अभ्यासक लक्ष्मणशास्त्री जोशी आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या संशोधन ग्रंथांमध्ये याच काळातील तत्कालीन भारतीय समाजाचे असेच वर्णन केले आहे,’ असा एक उल्लेख आहे. अनावधानाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाचा उल्लेख ‘भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे वरिष्ठ अभ्यासक’ असा केला गेला होता. प्रत्यक्षात तो उल्लेख ‘भारतीय सामाजिकशास्त्राचे वरिष्ठ अभ्यासक-संशोधक’ असा असायला हवा होता. या चुकीच्या उल्लेखासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, ही त्रुटी वेळीच लक्षात आणून दिल्याबद्दल जागृत वाचकांचे आभार मानतो.
संपर्क – 7400173637
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat