मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील येऊर वन परिक्षेत्राच्या प्रवेशव्दारानजीक बुधवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली आहे. येऊर वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत चार इसमांना अटक करण्यात आली आहे. ही कातडी २० लाख रुपये किंमतीस विकण्यासाठी हे इसम ठाण्यात आले होते. अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून येऊर वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करीविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ठाण्याच्या चेणा परिसरातील स्थानिक रहिवाशी योगेश जाधव याच्या घरावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी रानडुक्काराचे २ किलो मांस आणि दोन बंदुका जप्त केल्या होत्या. हे प्रकरण ताजे असताना बुधवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी ठाण्यात बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चार इसमांना अटक केली आहे. त्याच्यांकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे. बुधवारी रात्री साधारण ९.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई पार पडली. ठाण्यात काही इसम बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार येऊर प्रवेशव्दाराजवळ (मधुबन गेट) सापळा रचून आम्ही एका चारचाकी वाहनाची तपासणी केल्याचे येऊरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. या चारचाकीची (MH 43 R 7382 swift vdi) तपासणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे आढळ्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी गाडीत बसलेले बशिर पठाण, जावीद पठाण (४२), किरण राऊत (४२) आणि मधुकर कंक (४९) या चार आरोपींना अटक केल्याचे, पवार म्हणाले. हे चारही आरोपी रोहा तालुक्यातील वरसे आणि तळ्याचे रहिवाशी आहेत.
या कारवाईत सापडलेली बिबट्याची कातडी २० लाख रुपये किंमतीस ठाण्यामध्ये विकण्यासाठी आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हे कातडे रोहा तालुक्यातील तळा येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले. कातडे मिळविण्यासाठी बिबट्याची झालेली शिकार आणि ठाण्यामधील कातडीच्या खरेदीदारासंदर्भात आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राष्ट्रीय उद्यानचे संचालक अन्वर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या तपासात राजेंद्र पवार यांच्यासमवेत वनपरिमंडळ अधिकारी विकास कदम, सुजय कोळी आणि वनरक्षक संजय साबळे, राजन खरात, अमित राणे, जितेंद्र देशमुख,शेखर मोरे, रमाकांत मोेरे, सुशिल राॅय, भगवान भगत सहभागी आहेत. गेल्या वर्षी गोरेगावच्या 'दादासाहेब फाळके चित्रनगरी' येथून एक मादी बिबट्या आणि सांबराच्या शिकारीचे प्रकरण उघड झाले होते. तेव्हापासून वन्यजीवांची शिकार आणि तस्करीच्या अनुषंगाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. येऊर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शिकारीच्या विरोधात विशेष मोहिम राबवून शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat