मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ने उभयचर व सरपटणाऱ्या जीवांची ओळख करुन देण्याच्या उद्देशाने एका कार्यशााळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये भारताच्या उभयसृपशास्त्र संशोधनात उल्लेखनीय कामगिरी करणारे उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी मार्गदर्शन करतील. १३ आणि १४ जुलै रोजी ही कार्यशाळा पार पडेल. दोन दिवसीय या कार्यशाळेमध्ये उभयचर आणि सरपटणाऱ्या जीवांची माहिती, त्यांना ओळखण्याचे तंत्र आणि प्रत्यक्षात जंगलात जाऊन त्यांना पाहण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेकरिता प्रवेश सशुल्क आहे.
समाजात असणारी भिती आणि गैरसमूजतींमुळे पाली, बेडूक, विंचू व सापांसारखे जीव आजवर दुर्लक्षित राहिले आहेत. माध्यमांमधूनही या जीवांविषयी फारसे प्रबोधन होत नसल्याने सर्वसामान्यांना या जीवांविषयी फारच कमी माहिती आहे. या कारणाने डाॅ.वरद गिरी हे उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी सर्वसामान्य व विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. 'नायडस' या संस्थेमार्फत विविध कार्यशाळा व उपक्रम राबवून हे काम केले जाते. आता मुंबईकरांना या जीवांची ओळख करुन देण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाच्या 'निसर्ग माहिती केंद्रा'तर्फे डाॅ.गिरी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ आणि १४ जुलै रोजी ही कार्यशाळा राष्ट्रीय उद्यानात पार पडेल. कार्यशाळेमध्ये जीवांची प्राथमिक माहिती देण्यासाठी काही तासिका आणि जंगलामध्ये जाऊन त्यांना न्याहाळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी १६ ते २१ वयोगटातील विद्यार्थांकडून ३,६०० रुपये आणि २१ व त्यावरील वयोगटातील इच्छुक सहभागींकडून ४,६०० रुपये आकारण्यात येणार आहेत. या शुल्कामध्ये कार्यशाळा शुल्क, राहण्याची व्यवस्था, भोजन, अंतर्गत प्रवास आणि राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशशुल्काचा समावेश आहे.
मुंबईतील निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग माहिती केंद्रा'च्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबविण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. डाॅ.वरद गिरी यांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून उभयचर आणि सरपटणाऱ्या जीवांना समजून घेण्याची संधी आम्ही मुंबईकरांना देत असल्याचे राष्ट्रीय उद्यानाचे शिक्षण अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे कार्यशाळेदरम्यान सहभागींना गिरी यांच्यासोबत जंगलात फिरुन या जीवांना न्याहाळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी दिवसाला तीन जंगलफेरीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विश्वकर्मा यांनी दिली. तर उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी जनजागृतीच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे डाॅ. वरद गिरी म्हणाले. या जीवांची प्राथमिक माहिती, त्यांना कसे ओळखावे, त्यांची सद्यस्थिती यासंबंधीचे मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयी शून्य ज्ञान असलेला सर्वसामान्य माणूसही कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतो. १३ जुलैला उभयचर आणि १४ जुलैला सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी मागर्दशन करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यशाळेमध्ये जीवांना फक्त न्याहाळण्याची संधी मिळणार असून त्यांना हाताळण्यास मिळणार नसल्याचे गिरी यांनी अधोरेखित केले आहे. कार्यशाळेसंबंधी अधिक माहितीसाठी ०२२-२८८६८६८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat