हल्ली या इमरानजींना फारसं कुणी गांभीर्याने घेत नाही पण, आज पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजनेही इमरान खानकडे डोळेझाक केली. भल्या पहाटे त्यांनी ट्विट करून सर्फराज खानला नाणेफेक जिंकल्यास पहिली फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता.
जूनमधील तिसरा रविवार हा जगभरात ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो आणि नेमक्या याच दिवशी विश्वचषकामधील भारताचा मुकाबला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता. रविवारचा दिवस मावळता मावळता क्रिकेटच्या जगतात विश्वचषकामध्ये भारतच पाकिस्तानचा बाप असल्याचं एकदा नव्हे तर आजच्यासहित आतापर्यंत तब्बल सातवेळा सिद्ध झालंय. होय, विश्वचषकामधील सातच्या सात लढतीत भारताने पाकिस्तानला पाणी पाजलंय. आज अपेक्षेप्रमाणे मैदानावर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आणि मग खऱ्याखुऱ्या पावसाने हजेरी लावण्याआधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी पाठीराख्यांच्या डोळ्यात पाणी आणले. यात अगदी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानचाही समावेश असणार. हल्ली या इमरानजींना फारसं कुणी गांभीर्याने घेत नाही पण, आज पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजनेही इमरान खानकडे डोळेझाक केली. पाकिस्तानने जिंकलेल्या एकमेव विश्वचषकामध्ये कर्णधार म्हणून इमरान खानचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. आज ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. भल्या पहाटे त्यांनी ट्विट करून सर्फराज अहमदला नाणेफेक जिंकल्यास पहिली फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला दोन कारणं होती, एक तर दबावाखाली पाकिस्तानची फलंदाजी कोसळण्याची शक्यता आणि इंग्लंडमध्ये थैमान घालत असलेल्या पावसामुळे डकवर्थ लुईसचा बसणारा फटका. इतकं सारं स्पष्ट असतानाही सर्फराजने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय धक्कायदायक होता. कसोटी सामन्यांमध्ये हा निर्णय ठीक होता. तेथे ड्युक्सचे लालचुटूक बॉल असतात, जे खतरनाक स्विंग होतात. पण हा तर वन डेचा खेळ. येथे कोकाबुराचे पांढरेशुभ्र चेंडू. हवेवर तरंगत येणारे, स्विंगशी फारशी छेडछाड न करणारे. शेवटी अनुभवी इमरानची भीती खरी ठरली, भारत पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ८७ धावांनी जिंकला.
या विजयाची खरी सुरुवात झाली ती रोहित शर्माच्या तुफानी शतकी खेळीमुळे. मागील तीन सामन्यांमधील त्याचे हे दुसरे शतक. त्याला के. एल. राहुल आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने जी साथ दिली, त्यामुळे भारताचा तीनशेपारचा टप्पा पक्का झाला आणि येथे पाकिस्तानसाठी धोक्याचा पहिला लाल बावटा फडकला. कारण, त्यानंतर भारताच्या फलंदाजीच्यावेळी आलेला पावसाचा व्यत्यय पाकिस्तानच्या मेंदूत शिरला. कारण प्रत्येक सर त्या बॉलसोबत त्यांना विकेट राखून धावा वाढविण्याचं डकवर्थ लुईसचं कॅलक्युलेशन मेंदूत फिट्ट बसलं होतं. मॅच निकाली निघण्यासाठी पाकिस्तानला किमान २० षटकं खेळणं भाग होतं आणि त्यानंतर सुरू होणार होतं डकवर्थ लुईसचं गणित. पाचव्याच षटकात विजयशंकरने इमान उल हकला आऊट केल्यामुळे २० व्या षटकापर्यंत पाकिस्तानला पाऊस पडल्यास १ बाद १०९ चा पल्ला गाठणं गरजेचं होतं, पण पाकिस्तानची अवस्था होती त्यावेळी ८७ धावांवर १ गडी बाद आणि येथेच पाकिस्तानने कच खाण्यास सुरुवात केली. संपूर्ण सामन्यामध्ये पाकिस्तान डकवर्थ लुईसनुसार कधीच भारताच्या पुढे नव्हता. ३५ व्या षटकादरम्यान पुन्हा पाऊस आला तोवर पाकिस्तानचे १६६ धावांवर ६ गडी बाद झाले होते आणि त्यानंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला, तेव्हा ४० षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय झाला आणि पाकिस्तानसमोर उरलेल्या ३० चेंडूंमध्ये १३६ धावा करण्याचं अशक्यप्राय लक्ष्य ठेवण्यात आलं. म्हणून इमरान खान भल्या पहाटे उठून सांगत होता की, “पहिली फलंदाजी घ्या.” थोडक्यात काय, तर गावसकर म्हणतो तेच खरं. पूर्वी क्रिकेटमध्ये ६० टक्के गुणवत्तेच्या आणि ४० टक्के कणखर मानसिकतेच्या जोरावर सामना जिंकता येत असे. आज तंत्रज्ञानाच्या युगात ४० टक्के गुणवत्ता आणि ६० टक्के मानसिक कणखरतेच्या जोरावर सामना जिंकता येतो. विराटसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तान्यांना दाखवून दिले की, क्रिकेटच्या मैदानावर आम्हीच तुमचे बाप आहोत. अगदी शहेनशाह अमिताभच्या डायलॉगमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानला इतकंच सांगायचंय की, “रिश्तेमें तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है भारत...!”
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat