विविध धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत - ख्रिश्चन क्रॉस ४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019   
Total Views |


 


रेने गुनोन यांच्यासिम्बॉलिझम ऑफ क्रॉस’ या पुस्तकांत ‘ख्रिश्चन क्रॉस’च्या पुरातत्त्व संशोधनाचा आणि त्यातील निष्कर्षाचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. ख्रिस्तपूर्व तीन सहस्रके म्हणजेच आजपासून साधारण पाच हजार वर्षांपासून भारतीय उपखंड, चीन आणि अन्य पौर्वात्य देशात‘स्वस्तिक’ चिह्नाचा प्रसार झाला होता.


‘सिम्बॉल’ आणि ‘सिम्बॉलिझम’ या विषयात आणि खासकरून त्यातील ‘ख्रिश्चन क्रॉस’च्या चिह्नसंकेतांचा अभ्यास करताना अनेक विद्वानांचे लेखन माझ्या वाचनात आले, हा या अभ्यासाच्या वेळी मिळालेल्या आनंदाचा भाग झाला. याच वाचन प्रक्रियेत डॉ. आल्विन बॉयड कुह्न (१८८०-१९६३) या विद्वानाचा परिचय झाला. ‘शॅडो ऑफ द थर्ड सेंच्युरी - रिव्हॅल्युएशन ऑफ ख्रिश्चनॅनिटी,’ ‘द लॉस्ट लाईट,’ ‘द लॉस्ट की टू द स्क्रीप्चर्स,’ ‘अ रीबर्थ ऑफ ख्रिश्चनॅनिटी’, ‘द अल्टिमेट कॅनन ऑफ नॉलेज’ अशी डॉ. कुह्न यांची ग्रंथसंपदा. आधी उल्लेख केलेल्या सर्व विद्वान लेखकांप्रमाणेच यांनी सातत्याने प्राचीन भारतीय संस्कृतीचा संदर्भ सातत्याने त्यांच्या सर्वच साहित्यरचनांमध्ये दिला आहे. ‘शॅडो ऑफ द थर्ड सेंच्युरी - रिव्हॅल्युएशन ऑफ ख्रिश्चनॅनिटी’ या ग्रंथात डॉ. कुह्न स्पष्टपणे लिहितात की, “ख्रिस्तपूर्व ७००० वर्षे ते ख्रिस्तपूर्व १००० वर्षे या ‘निओलीथिक’ काळात भारतामध्ये काही प्रगत संस्कृती प्रचलित होत्या. येशू ख्रिस्ताच्या आख्यायिकेच्या सुरुवातीला म्हणजेच ख्रिस्तकालीन पहिल्या शतकांत यातल्याच एका प्रणालीला ‘ख्रिश्चनॅनिटी’ असे नाव दिले गेले. ‘निओलीथिक काळ’ म्हणजे पाषाणयुगाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा. या काळात शेतीव्यवस्था निर्माण झाली आणि दगडापासून अवजारे आणि हत्यारे बनवून त्यांचा वापर सुरू झाला. भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे दोन वरिष्ठ मान्यवर अभ्यासक लक्ष्मणशास्त्री जोशी आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या संशोधन ग्रंथांमध्ये याच काळातील तत्कालीन भारतीय समाजाचे असेच वर्णन केले आहे. आधीच्या लेखांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे रेने गुनोन यांनी त्यांच्या लिखाणात स्वतंत्रपणे या विचारांना समांतर मत मांडले आहे. गुनोन यांच्या अभ्यासानुसार, ख्रिस्तपश्चात तिसऱ्या शतकांत रोमन राज्यकर्ते आणि प्रजेने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर ‘स्वस्तिक’ चिह्नाऐवजी ‘ख्रिश्चन क्रॉस’चा वापर सुरू झाला आणि ‘ख्रिश्चनॅनिटी’ हे संबोधन बाजूला सारून ‘ख्रिश्चनॅनिझम’ असे संबोधन वापरण्यास सुरुवात झाली.

 

डॉ. कुह्न यांचा एक विचार मला मनोमन पटणारा आहे. कारण, तो प्राचीन भारतीय चिह्नसंकेतांच्या जवळ जाणारा आहे. ‘द ग्रेट मिथ ऑफ सनगॉड’मध्ये ते लिहितात, वैश्विक-आध्यात्मिक सत्य आणि अलौकिक अनुभवांचे वर्णन करण्यासाठी, ते सामान्य श्रद्धावान उपासकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, काही सहस्र वर्षांपासून जगभरातील सर्वच विद्वान तत्त्ववेत्त्यांनी मिथके, पुराणकथा, नीतिकथा, दंतकथा, आख्यायिका यांचा योग्यवेळी, योग्य ठिकाणी चपखल वापर केला. निव्वळ लिखित अलंकारिक शब्दांच्या वापराने असे अलौकिक सत्य आणि अनुभव सांगता येणार नाही, या वास्तवाची या सर्वांना निश्चित कल्पना होती. अशी मांडणी आधी करून मग डॉ. कुह्न पुढे लिहितात की, “बायबल’मधील कट्टर परंपरावादी-रुढीप्रिय लिखाण, मनाला न पटणारे, गैरवाजवी आणि क्षिती निर्माण करणारे आहे. यातील अलौकिक सत्य आणि अनुभव याच्या मांडणीचे श्रद्धा भावनेने आकलन होत नाही आणि उपासनेसाठी त्याचा सहज वापरही करता येत नाही. ही मांडणी संदर्भहीन वाटते.” हे डॉ कुह्न यांचे मत आहे. या मताना पुढे ते अनेक दाखले देतात. ते म्हणतात की, “अव्याहत, निरंतर, अलौकिक ऊर्जेचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे ही ‘सूर्यदेवता.’ रोज उगवणारा हा सूर्य नवजीवनाचे आणि नव्या स्फूर्तीचे रूपक आहे. माझ्या या ‘द ग्रेट मिथ ऑफ सनगॉड’ या पुस्तकाच्या शीर्षकात ‘मिथ’ म्हणजे ‘मिथक’ या शब्दाचा वापर मी जाणीवपूर्वक केला आहे. एखाद्या नैतिक मूल्यांवर आधारित कथेचे नाट्यमय सादरीकरण जसे आपले लक्ष पटकन वेधून घेते, नेमके तेच काम ही मिथके, पुराणकथा, नीतिकथा, दंतकथा, आख्यायिका करतात. ती, उपासक आणि दर्शकाच्या श्रद्धा भावनेला जागृत करतात. अशी मिथके आणि पुराणकथा वरवर खऱ्या नाहीत, हे दर्शकाला माहीत असते. मात्र, तीव्र श्रद्धा भावनेतून त्या मिथकातील मूल्य त्याला समजलेली असतात आणि त्या मूल्यांची वृद्धी व्हावी, हे त्याला निश्चित माहीत असते. अनेक वेळा लिखित शब्दातील व्यक्त होणाऱ्या अशा भावनांचा अतिरेक होतो आणि त्या निष्फळ आणि व्यर्थ वाटू लागतात. नेमके हेच मत डॉ. कुह्न ‘बायबल’ या धर्मग्रंथासंदर्भात स्पष्टपणे मांडतात. येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या काही सहस्र वर्षे आधीपासून, पूर्वेकडील भूमध्य भागात अशी मिथके आणि पुराणकथा प्राचीन काळापासून प्रचलित होत्या.

  

 
 

इजिप्तमध्ये ‘रा,’ ‘आमून-रा’ आणि ‘होरस’सारख्या दहा सूर्यदेवता आहेत. सीरिया, असीरिया, बाबिलोनीयामध्ये अशा प्रत्येकी तीन देवता. पर्शियामध्ये ‘मीथरा,’ ‘झोरास्टर’ आणि ‘अहुरा मझदा.’ ग्रीसमध्ये ‘अचिलीस,’ ‘हर्क्युलिस’सारख्या सात सूर्य देवता. भारतात ब्रह्मा-विष्णू-महेश-बुद्ध. तिबेटमध्ये ‘बोधिसत्त्व’ आणि अन्य देशात अशाच अगणित सूर्यदेवता. भक्तांना प्रेम आणि करुणेची शिकवण देणारा गॉस्पेलमधील येशू ख्रिस्त इतिहासात खरा(खरोखर) होऊन गेला की नाही हे सांगता येणार नाही. मात्र, सूर्य देवतेच्या भल्यामोठ्या यादीतला तो एक सूर्य देव होता आणि आहे. कोण होते हे सूर्यदेव? कुठून आले होते? कसे होते ते? आणि येशू ख्रिस्ताला ‘सूर्यदेवता’ संबोधून त्याला सुळावर का चढवले असावे? त्या मागेसुद्धा काही संकेत किंवा गूढार्थ असावा का? डॉ. कुह्न यांच्या मते, हे सर्व सूर्य देव म्हणजे विविध भाषा, विविध संस्कृतीतील देश-प्रदेशातील कथा-काव्य आणि महाकाव्यातील महानायक होते. मानव जातीच्या उत्क्रांतीपासून झालेल्या मानवाच्या आध्यात्मिक-धार्मिक-मानसिक प्रवासाचा आणि प्रगतीचा असे महानायक आलेख आहेत, असेच म्हणायला हवे. नैसर्गिक आणि दैवी देणगी समजल्या गेलेल्या अव्यक्त बुद्धी सामर्थ्याचे आणि मानसिक क्षमतेचे, सूर्य देवतेच्या रूपातील ही प्रतीके आहेत. सामान्य माणसात अशा गुणवत्तेची जाणीव-जागृती करून त्यातून दैनंदिन जीवनक्रम सुखावह करणारी ऊर्जा केंद्रे आहेत. अशी ही एकच व्यक्ती नाही. रोज उगवणाऱ्या सूर्यदेवतेप्रमाणे नियमित तत्त्वावर याचे अवतार निर्माण होत जातात. म्हणजेच अशा नैसर्गिक शक्ती आणि दैवी क्षमता प्राप्त होणाऱ्या असामान्य व्यक्तींचा परिचय नियमितपणे समाजाला होत असतो. अशा तेजस्वी जीवंत माणसाच्या ऊर्जेचा अनुभव आणि त्या क्षमतेची थोड्या-अधिक प्रमाणात होणारी प्राप्ती ही उपासकाची फलितं आहेत. ‘बायबल’मधील देवता, सूर्याची ऊर्जा आणि प्रकाश याच दोन प्रतीकांनी व्यक्त केली जातात. थोडक्यात आपल्यातील प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातील देवत्व, सूर्याची ऊर्जा आणि प्रकाश याच दोन निसर्गदत्त भौतिक शक्तींमुळे जोपासले जाते. याच मांडणीला पुढे नेताना डॉ. कुह्न ‘बायबल’ या धर्मग्रंथाच्या योग्यतेबद्दल काही प्रश्न निर्माण करतात. प्राचीन भारतीय संस्कृती विज्ञान-तत्त्वज्ञान- बुद्धिमत्ता या तीन पायांवर रचली गेली आहे. यातील अनेक साहित्यकृती कोणी रचल्या, कधी रचल्या, का रचल्या, त्या कशा वाचायच्या, या सर्वाचा उल्लेख प्रत्येक साहित्यकृतींमध्ये केला गेला आहे. ‘बायबल’च्या बाबतीत मात्र असे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. ‘बायबल’मधील गोष्टी कोणी सांगितल्या किंवा कोणाला सुचल्या हे आज कोणालाही माहीत नाही. या गोष्टींचा नक्की अर्थ काय, त्या कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या हेसुद्धा खात्रीशीरपणे कोणीही सांगू शकत नाही. याला कुठला कल्पित अथवा वास्तव इतिहासाचा संदर्भ आहे, याचाही उल्लेख कुठेच उपलब्ध नाही.

 

प्रत्येक धर्मगुरूने आपापल्या मनाप्रमाणे यातील गोष्टींचे अर्थ लावले. त्यामुळे, उपासकाला सतत आकर्षित करणाऱ्या या पुस्तकातील गोष्टी कधीच दुरुस्त केल्या गेल्या नाहीत. त्या गोष्टी कायमच सत्यापासून दूरच राहिल्या. असंख्य अन्य पुस्तके उपलब्ध असताना नेमक्या याच जुळवाजुळव करून बनवलेल्या पुस्तकाला धर्मग्रंथाचा दर्जा का दिला गेला, असे अनेक प्रश्न डॉ. कुह्न आपल्या ‘द ग्रेट मिथ ऑफ सनगॉड’ या पुस्तकांत उपस्थित करतात. ‘बायबल’ हे नियमितपणे लिहून तयार झालेले पुस्तक नाही. याचे कारण असे की, काही सहस्र वर्षांपासून यात समाविष्ट केलेल्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या संस्कृतीतील विद्वानांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून मौखिक परंपरेने जोपासल्या गेल्या होत्या. या गोष्टी श्रुती आणि स्मृतींचा भाग होत्या. अशा एकमेकांशी कुठलाही सांधा नसलेल्या गोष्टी एकत्र करून ‘बायबल’ची निर्मिती झाली. याचे अगदी स्पष्ट उदाहरण देताना डॉ. कुह्न विस्ताराने ‘लॉस्ट की टू द स्किप्चर्स’ या पुस्तकांत 'To die' म्हणजे मरणे 'The death' म्हणजे मृत्यू आणि 'The dead' मृत झालेला व्यक्ती, या ‘बायबल’मधील तीन महत्त्वाच्या संज्ञांचा अथवा शब्दांचा संदर्भ देतात. त्यांच्या मते, येशू ख्रिस्ताला लाकडी क्रॉसवर म्हणजे सुळावर बळी दिले गेलेच नव्हते. ‘ख्रिश्चन बायबल’वर प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा खूप प्रभाव आहे. ‘बायबल’मधील प्राथमिक शिकवणीनुसार, सध्या प्रचलित असलेल्या येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्यांचे पुनरुत्थ्यान याचा ग्रीक तत्त्वज्ञानानुसार सांकेतिक अर्थ पार उलट आहे आणि तोच सांकेतिक अर्थ, ‘बायबल’मधे सुरुवातीला स्वीकृत होता म्हणूनच प्रचलित होता. प्रत्यक्षात 'To die' म्हणजे मुक्त झालेल्या आत्म्याने पृथ्वीवर निवास करणे. 'Death' म्हणजे ‘मृत्यूचा अर्थ आहे.’ मुक्त झालेला आत्मा पार्थिव शरीरात बंदिस्त होणे. 'The death' म्हणजे आपल्या पार्थिव शरीरात जीवित असलेले आत्मे. यात कुठेही भौतिक अर्थाने मरण आणि मृत्यूचा अर्थ सूचित केलेला नाही. डॉ. कुह्न यांच्याच शब्दात अगदी थोडक्यात सांगायचे, तर ‘बायबल’मधील सर्वच गोष्टी फक्त सांकेतिक आहेत. येशू ख्रिस्ताला क्रॉसवर (सुळावर) बळी दिले गेले, हे त्यांच्या मते एक मिथक आहे. अशा इतिहासाचा ‘बायबल’मध्ये कुठेही उल्लेख नाही. ‘ख्रिश्चन क्रॉस’ या चिह्नाचा अभ्यासक या नात्याने वाचकांना डॉ. आल्विन बॉयड कुह्न यांच्या पुस्तकातील या चिह्नाच्या संदर्भातील अगदी वेगळ्या आणि प्रभावी विचारांचा परिचय या लेखांत करून दिला. ‘ख्रिस्ती क्रॉस’च्या अन्य रूपांचा अभ्यास पुढील लेखांत अवश्य वाचवा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@