प्रवक्ते कोण? बंदी कोणावर?

    01-Jun-2019   
Total Views | 110



पक्षाला पुढील दहा-वीस वर्षांत आपले नव्याने पुनरूज्जीवन करण्याची योजना आखावी लागेल. झटपट सत्ता मिळवण्यासाठी युती-आघाडी करण्यापासून माध्यमांना ‘मलिदा’ पुरवून अफवा पिकवण्याचा धंदा बंद करावा लागेल. आपला कंडू शमवण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांनी लोया किंवा तत्सम भुतावळ निर्माण केल्यावर त्याच्या मागे पळत सुटण्याचा मोह टाळावा लागेल.


लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मागील गुरुवार, दि. २३ मे रोजी झाली आणि निकालही लागले. त्यानंतर बरोबर सात दिवसांनी म्हणजे गुरुवार, दि. ३० मे रोजी काँग्रेसच्या माहिती विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी एक ट्विट करून आपले आदेश जारी केलेत. त्यानुसार त्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना कुठल्याही उपग्रहवाहिनीच्या चर्चेत हजेरी लावण्यावर प्रतिबंध लागू केला आहे. त्याच्याही पुढे जाऊन वाहिन्यांनीही कोणा काँग्रेस प्रवक्त्याला चर्चेसाठीनिमंत्रित करू नये, असे आवाहन केलेले आहे. हे वाचून अनेकांना मोठी मौज वाटली असेल. कारण, मागील अनेक वर्षांत अनेक वाहिन्यांवर होणाऱ्या चर्चेत नाव घेण्यासारखा कोणी काँग्रेस प्रवक्ता समोर आलेला नाही. किंबहुना, २०१४ नंतर अनेक प्रमुख वाहिन्यांवर काँग्रेस पक्षाने अघोषित बहिष्कार घातलेला होता. इंग्रजीतील लोकप्रिय वाहिन्या म्हणजे ‘टाईम्स नाऊ’ आणि दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘रिपब्लिक’ वाहिनीयावर कित्येक वर्षांमध्ये काँग्रेसचा कुठला प्रवक्ता सहभागी होऊ शकलेला नाही. तिथे काँग्रेसचे समर्थक वा पाठीराखे म्हणून अनेक पत्रकार विश्लेषकच काँग्रेसची बाजू हिरीरीने मांडताना दिसलेले आहेत. किंबहुना, कोणा खऱ्या काँग्रेस प्रवक्त्यापेक्षाही अशा विश्लेषक पत्रकारांनी काँग्रेसची बाजू अतिशय समर्थपणे मांडलेली आहे; अन्यथा इतर वाहिन्यांवर प्रकाश झा किंवा पवन खेरा असे कोणी काँग्रेसी अधूनमधून दिसतात. त्यांच्याखेरीज नव्याने भरती झालेले पण वेळ संपल्यावरही अथक बोलत राहणारे काही प्रवक्ते दिसलेले आहेत. त्यांच्या बोलण्यातून पक्षाला लाभ मिळण्यापेक्षा अधिकाधिक हास्यास्पद बनवण्याचे कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले आहे. साहजिकच नेमक्या कोणाला सुरजेवाला यांनी प्रतिबंधित केले आहे, हा खरा प्रश्न आहे. कारण, अनेकजण दोन-तीन वर्षे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. त्यापैकी कोणीही अधिकृत पक्ष प्रवक्ता नाही. मग बंदी कशाला व कोणावर?

 

लोकसभेचे निकाल लागल्यावर समाजवादी पक्षाने सर्वात आधी आपले सर्व पक्षप्रवक्ते बरखास्त करून टाकले. त्यासारखे उत्तम पक्षकार्य अध्यक्ष अखिलेशने मागल्या चार वर्षांमध्ये दुसरे काही केलेले नसेल. कारण, या पक्षाचा घनश्याम तिवारी नावाचा प्रवक्ता कुठल्या पक्षाचा आहे, याचीच शंका नेहमी यायची. त्याने कधीही समाजवादी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काही धोरणात्मक वा भूमिकेवर काही प्रतिपादन केलेले ऐकायला मिळाले नाही. कुठलाही विषय असो. हा तिवारी कायम मोदी व भाजपला नुसत्या शिव्याशाप देताना ऐकायला मिळे. शिवाय कुठल्याही टोकाला जाऊन त्याने राहुल गांधी यांच्या तद्दन मूर्खपणाचे समर्थन करताना, समाजवादी पक्षाला काँग्रेसची जणू शाखाच बनवून टाकलेले होते. नेमकी तशीच कहाणी मार्क्सवादी पक्षाचे सुनीत चोप्रा किंवा कम्युनिस्ट पक्षाचे दिनेश वार्ष्णेय यांची होती. ते पक्षाचे नाव कशाला घेतात, असा प्रश्न पडायचा. त्यांचा भाजपविरोध समजू शकतो. पण त्यांनी कुठल्याही टोकाला जाऊन काँग्रेसच्या वेडगळपणाचे समर्थन चालविलेले ऐकायला मिळायचे. हे त्यांचे काम होते काय? त्यांनी आपला पक्ष, त्याच्या भूमिका वा धोरणांवर प्रतिपादन करताना भाजपचा विरोध करावा. याविषयी कोणाची तक्रार असायचे कारण नाही. पण त्यांनीही कधी आपल्या पक्षाची कुठली भूमिका मांडलेली बघायला मिळाली नाही. कारण, वा निमित्त कुठलेही असो, भाजपच्या नावाने उद्धार करणे यापेक्षा त्यांना दुसरे काही काम नसायचे. थोडक्यात, ते राहुल गांधी व काँग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते असायचे. मग अर्णब गोस्वामी त्यांना पुढे करून एकूण डाव्या चळवळीचे वाभाडे काढायचा आणि अशा प्रवक्त्यांकडून काँग्रेसचे समर्थन व डाव्या चळवळीला बदनाम व्हायला लागले आहे. अशा लोकांना काँग्रेस कसे रोखू शकणार आहे? तेच आताही काँग्रेसची बाजू वाहिन्यांवर मांडणार आहेत आणि लोकांचे मनोरंजन चालूच राहणार आहे.

 

याखेरीज तहसिन पुनावाला, सबा नकवी, अलिमुद्दीन खान किंवा कोणी दुष्यंत नागर असे प्रवक्तेवजा काँग्रेस समर्थक वाहिन्यांवर बघायची श्रोत्यांना सवय लागलेली आहे. त्यांच्या मनोरंजक युक्तीवादातून काँग्रेसची उडवली जाणारी खिल्ली, श्रोत्यांमध्ये लोकप्रिय झालेले ‘आयटेम्स’ आहेत. त्यांना सुरजेवाला रोखू शकत नाहीत. म्हणून मग काँग्रेसची वाहिन्यांवरची विटंबना कशी थांबू शकणार आहे? अर्थात, वाहिन्या आपल्या चर्चांमध्ये अशा लोकांना अगत्याने बोलावणार आहेत आणि काँग्रेसला आपली अशी अवहेलना थांबवता येणार नाही. ते मागील दोन-तीन वर्षात राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्याचे फळ आहे. मुद्दा कुठलाही असो, त्याला छेद देऊन ‘अच्छे दिन’ वा ‘१५ लाख रुपये’ असली बाष्कळ बडबड करणाऱ्यांची एक फौज निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांची विल्हेवाट कशी लावायची? कोण एक मोहम्मद खान किंवा महादेवन नावाची कोवळ्या वयातली मुलगी, ती पोपटपंची छानपैकी करतात. त्यांच्यामुळे काँग्रेसची मते गेली असे आता पक्षाला वाटते काय? असेल तर त्यांना असे निरर्थक बडबडायला ज्यांनी शिकवले किंवा प्रोत्साहीत केले? त्याच्यावर बडगा उगारावा लागेल. खुद्द सुरजेवालाच त्याला जबाबदार आहेत. कारण, पत्रकार परिषद घेऊन कुठलेही बिनबुडाचे आरोप त्यांनी करायचे आणि त्यावर खळबळ माजवणाऱ्या चर्चा वाहिन्यांवर घडवून आणायला प्रोत्साहन देण्याचे पाप त्यांचेच आहे. कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, सॅम पित्रोदा किंवा मणिशंकर अय्यर, शशी थरूर यांनी बेछूट बडबड केल्याने वाहिन्यांना खळबळ माजवण्याची संधी नित्यनेमाने मिळत गेली. अशा प्रवक्ते किंवा समर्थकांनी त्याची पाठराखण केलेली आहे. मग आता त्यांच्यावर खापर फोडून काय निष्पन्न होणार आहे? असे प्रवक्ते बाजूला करून थरूर वा पित्रोदांचे तोंड कसे बंद होऊ शकते? पक्षबाह्य अन्य पक्षाच्या प्रवक्त्यांना लगाम कसा लागणार आहे?

 

मुळात प्रवक्ते किंवा समर्थक म्हणून पोपटपंची करणारे यांच्या माथी खापर फोडून काहीही साध्य होणार नाही. मुद्दा असे बिनबुडाचे आरोप करून वा आवई अफवांचे रान पिकवून, लोकांना भुलवता येण्याचे दिवस संपलेत, हे समजून घ्यावे लागेल. प्रवक्ते वा समर्थकांची गोष्ट सोडून द्या. पत्रकार म्हणून हयात काढलेल्या काँग्रेसच्या समर्थकांनाही अशा खोटेपणाची आता चटक लागलेली आहे. त्यामुळे जो काही ‘बालीश-फुलीश’ प्रकार पक्षातून होईल, त्याचे समर्थन करायला अशी मंडळी नंतरही मोठ्या उत्साहात वाहिन्यांवर जाणार आहेत. त्यांच्या हास्यास्पद विधानातून काँग्रेसच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याला पर्याय नाही. राहुल गांधी पक्षाध्यक्ष असोत किंवा नसोत, पक्षाला खुळेपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची गरज आहे. भाजप किंवा मोदींवर बेछूट आरोप करून लोकमत जिंकता येत नसते. राहुलनी सुरुवात करून दिली नसती, तर हे बाकीचे झिलकरी हलकारे द्यायला पुढे कशाला आले असते? पक्षाला पुढील दहा-वीस वर्षांत आपले नव्याने पुनरूज्जीवन करण्याची योजना आखावी लागेल. झटपट सत्ता मिळवण्यासाठी युती-आघाडी करण्यापासून माध्यमांना ‘मलिदा’ पुरवून अफवा पिकवण्याचा धंदा बंद करावा लागेल. आपला कंडू शमवण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांनी लोया किंवा तत्सम भुतावळ निर्माण केल्यावर त्याच्या मागे पळत सुटण्याचा मोह टाळावा लागेल. संघटनेत लक्ष घालून फक्त माध्यमात धुळवड करून निवडणुका जिंकण्याचे मनसुबे सोडायला हवेत. इतक्या गोष्टी नुसती प्रवक्त्यांची मुस्कटदाबी करून शक्य होणार नाहीत. एकट्या राहुल गांधींना शक्य नाहीत. त्यासाठी जाणकारांची मदत घ्यावी लागेल आणि बालीशपणाला पूर्णपणे फाटा द्यावा लागेल. सामान्य जनतेत जावे लागेल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे करावे लागेल. खूप कष्टाचे काम आहे आणि गांधी कुटुंबाला मेहनत इतरांनी करावी असेच वाटत असेल, तर अन्य मार्ग कुठला आहे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121