नवी दिल्ली : ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदींची मोजणी करण्यासंदर्भातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. काँग्रेस, टीडीपीसह देशातील एकूण २१ विरोधी पक्षांनी मिळून ही फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायालायने ही फेरविचार याचिका फेटाळल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रंजन गोगई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीवेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, डी. राजा, संजय सिंह आणि फारुख अब्दुल्ला हे नेते उपस्थित होते. एकच प्रकरण न्यायालयाने किती वेळा ऐकायचे? असा सवाल करत न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी ही याचिका फेटाळून लावली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत न्यायालयात धाव घेतली होती. याआधी त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत आपली बाजू मांडली मात्र यावेळी आयोगाने त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालायत याचिका दाखल केली यावर न्यायालयाने ८ एप्रिल रोजी सुनावणी करत मतदान केंद्रावरील ५ व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदणीची पडताळणी करण्याची परवानगी दिली होती. त्यावरही विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्या. गोगई यांनी ही याचिका फेटाळून लावली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat