महाबळेश्वर : भारतातील भिलार या पहिल्या पुस्तकाच्या गावाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ४ मे २०१७ साली महाबळेश्वरजवळील भिलार या स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या गावात राज्य सरकारने पुस्तकाचे गाव साकारले होते. मागील दोन वर्षात वाचन संस्कृतीला नवा आयाम देण्यात या गावाचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या पुस्तकाच्या गावाच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील पहिलं 'पुस्तकांचं गाव' आज दृतीय वर्षात पदार्पण करीत आहे. वाचन संस्कृतीला नवा आयाम देण्यात या गावाचा मोलाचा सहभाग आहे. महाराष्ट्रात महाबळेश्वर जवळ भिलार येथे उभारलेलं हे 'पुस्तकांचं गाव' आपल्या भेटीसाठी आतुर आहे. या वाचनाच्या पंढरीला जरूर भेट द्यावी. pic.twitter.com/nlruqax8AN
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 4, 2019
दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने 'राज्य मराठी विकास संस्था' या संस्थेच्या मार्फत भिलारला पुस्तकांनी सजवले होते. यात सांस्कृतिक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मोलाची भूमिका होती. प्रशासन व गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या गावात आज तब्बल ३० हजार पुस्तके असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच देश-विदेशातून हजारो वाचक रसिक या गावाला भेटी देत असतात.
ब्रिटनमधील 'हे-ऑन-वये' या गावाच्या धर्तीवर राज्य सरकारने 'भिलार' या पुस्तकांच्या गावाची निर्मिती केली होती. 'हे-ऑन-वये' हे जगातील पहिले पुस्तकाचे गाव होते त्यानंतर आता भिलारचा नंबर लागतो. या गावात तब्बल तीस ठिकाणी पुस्तक, ग्रंथ आढळतात. दरम्यान, या गावाला भेट देण्याचे आवाहन सांस्कृतिक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat