मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानातील वाद आता मैदानाबाहेरही दिसत आहेत. निमित्त ठरले आहे ते शाहिद आफ्रिदीच्या 'गेम चेंजर' आत्मचरित्राचे. "गंभीरच्या नावावर विक्रम नाहीत, फक्त अहंकारच आहे." असे आफ्रिदीने म्हटले होते. त्यावर गंभीरनेही पलटवार करताना आफ्रिदीला मानसोपचार तज्ञाची आवश्यकता असून त्याच्या उपचाराची जबाबदारी घेणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान आणि भारतातील क्रिकेटचा तो सामना सर्वांनाच आठवत असेल. ज्यामध्ये गंभीर आणि आफ्रिदीच्या भांडणाची सगळीकडे चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मैदानाबाहेरदेखील या दोघांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. आफ्रिदी आत्मचरित्रात गंभीरवर जोरदार टीका केली आहे. "गंभीरच्या नावावर विक्रमांची नोंद नाही. त्याच्या नावावर केवळ अहंकार आहे." अशी टीका आफ्रिदीने केली. "खेळाडू म्हणून गंभीर फक्त नकारात्मक विचार घेऊन खेळायचा. अशा लोकांना आम्ही कराचीत सनकी म्हणतो. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तवणूक करत असाल तरी हरकत नाही मात्र तुम्ही सकारात्मक रहावे, गंभीर तसा नव्हता." असे मत आफ्रिदीने आत्मचरित्रात नोंदवले आहे.
आफ्रिदीच्या आत्मचरित्रातील हा भाग पुढे आल्यानंतर गंभीरनेदेखील यावर सणसणीत चपराक दिली. त्याने ट्विट करत सांगितले की, "पाकिस्तानमधील अनेक नागरीक उपचारासाठी भारतात येत असतात. मी तुला स्वतः मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन." असा टोला गंभीरने आफ्रिदीला मारला आहे. 'गेम चेंजर' या पुस्तकात आफ्रिदीने आपल्या वयाचा खुलासा केल्यामुळे मागील काही दिवसांपासून पुस्तकाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat