विविध संस्कृतीतील विविध धर्म प्रणालीतील अशा अनेक भावना-श्रद्धा-संकल्पना धारण करणारा, दिवसाच्या २४ तासातील रात्रीचे १२ तास आपली सोबत करणारा, अन्य कोणत्याही रंगांपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात व्यापक उपस्थिती असलेला भारतीयांचा आवडता कृष्णवर्ण काळा रंग!
काळा रंग नक्की कशाचे प्रतीक आहे? शुभ की अशुभ? मंगल की अमंगल? उत्साह की निराशा? आनंद की दु:ख? अधिकार की वर्चस्व? रंगांच्या जगात सर्वात जास्त परस्पर विरोधी संकेत देणारा हा भारतीयांचा आवडता रंग-‘कृष्णवर्णी काळा रंग.’ या काळ्याभोर रंगाचे एवढे परस्पर विरोधी संकेत, कुठल्याही अन्य रंगाला जोडले गेलेले नाहीत. अमंगल, दु:खदायी, हिंसक अशी ओळख असलेला पाश्चात्य जगातला काळा रंग हा भारतीयांसाठी ऊर्जादायी, मंगलकारक आणि श्रद्धा-भक्तीचा पूरक रंग असतो. दत्ताराम गाडेकर यांचे संगीत, गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांचे स्वर... यात सजलेली ही विष्णुदास नामदेव महाराज या संत-महात्म्याने रचलेली सुंदर गौळण आपण सर्वांनी ऐकली असेल. (संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत नामदेव वेगळे). विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी गो माय... यमुना जळ बहु काळी वो माय... बुन्थ काळी बिलवर काळी, गळामोती एकावळी काळी गो माय...!! भारतीय संस्कृतीत आणि मराठी भक्तीमार्गी परंपरेत अंधार, रात्र आणि काळा रंग याची ही अनपेक्षित विलक्षण मांडणी. काळ्या रंगाची चिह्नसंकेतातील अशी द्वयार्थी भावार्थ मांडणी या दृष्टीने जगात एकमेवाद्वितीय असावी. गौळणींच्या हंड्यातील दही-लोणी पळवणारा माखनचोर, नटखट बाळकृष्ण इतका काळा आहे की, त्याच्या काळ्या सर्वांगावर माखलेल्या दह्यामुळे त्याला ‘दह्यांग’ म्हटले गेले. पंढरपुरात विटेवर उभा असलेला काळा-सावळा पांडुरंग, शतकानुशतके वारकऱ्यांचे श्रद्धास्थान बनला आहे.
काळी-सावळी विठ्ठल-रखुमाई
‘तमसो मा ज्योतिर्गमय।’ या सर्वमान्य मार्गदर्शक सुभाषिताप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यात या अंधाराचा, या काळ्या रात्रीचा उल्लेख सातत्याने केला गेला. भारतीय संकल्पनेप्रमाणेच प्रकाश म्हणजे अंधाराचा नाश आणि प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार, अशी संकल्पना वैश्विक सत्य म्हणून जगभरातील प्रत्येक संस्कृतीमध्ये स्वीकारली गेली आहे. भारत देशापलीकडच्या पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतींमध्ये काळा रंग सामान्यतः दु:ख, हिंसा, मृत्यू, विषाद, खिन्नता, अशुभ, अमंगल, गौप्य आणि गुप्तता, दिशाभूल या संदर्भात वापरला जातो. त्याचवेळी औपचारिक, प्रतिष्ठीत, रुबाबदार रंग म्हणूनही हा स्वीकृत आहे. सर्वच रंगांचे असे परस्पर विरोधी गुणधर्म प्रदेशागणिक आणि संस्कृतीमध्ये प्रचलित आहेत व काळा रंग याला अपवाद नाही. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रत्येक सजीवाच्या अगदी प्राथमिक गरजा आहेत. यातील एक ‘अज्ञाताची भीती’ ही भावना रात्रीच्या अंधारात प्रत्येक सजीवाच्या मनात निसर्गतः निर्माण होतेच. नेमकी हीच भीती काळ्या रंगाच्या वैशिष्ट्याचा एका भाग झाली असावी. काळ्या रंगाचा वापर, नकारात्मक कारणासाठी अनेक ठिकाणी केला जातो. गंमत्या स्वभावाची व्यक्ती काही चुटकुले, विनोद सांगून आपले मनोरंजन करते, याला ‘ह्युमर’ असे इंग्रजी संबोधन आहे. मनोरंजनाऐवजी यात निंदा-नालस्तीआणि नकारात्मक संदर्भ आला की, त्याला ‘ब्लॅक ह्युमर’ असे म्हटले जाते. नापसंतीची आणि अनुत्तीर्णांची यादी म्हणजे ‘ब्लॅक लिस्ट’ असते. युरोपमध्ये चौदाव्या शतकात संसर्गजन्य रोगाच्या खूप मोठ्या साथीने अगणित नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या साथीत झालेल्या मृत्यूला ‘ब्लॅक डेथ’ असे संबोधले गेले. राक्षसी-पाशवी वृत्ती, चेटकीण-चेटूक आणि अघोरी विद्या याला ‘ब्लॅक मॅजिक’ असे संबोधित केले जाते. काही कामांसाठी निघाल्यावर काळ्या मांजराचे ‘दर्शन’ अशुभ आणि अमंगल असते, अशी अंधश्रद्धा आजही जगभरातील सर्व समाजात प्रचलित आहे. मात्र, याचवेळी युरोप आणि पाश्चिमात्य संस्कृतीत पुरुषांचे काळ्या रंगाचे जाकीट आणि टाय, कणखरपणा आणि अधिकार याचे प्रतीक मानले गेले. कॉर्पोरेट जगात आता स्त्रियासुद्धा त्यांचा अधिकार दर्शवण्यासाठी असे रुबाबदार काळे जाकीट आणि टाय याचा वापर आग्रहाने करतात. एखाद्या चित्रकाराला, सपाट पृष्ठभागावर द्विमिती चित्रात वस्तूची घनता दृष्टिमान करण्याचे कसब याच काळ्या रंगाच्या वापराने साध्य होते. अनुभवी आणि कसबी छायाचित्रकार याच कृष्ण-धवल रंगांच्या हजारो छटांतून, दर्शकाशी नि:शब्द संवाद करत असतो. चित्रांचे आणि छायाचित्रांचे एखादे प्रदर्शन निरखून पाहिले, तर त्या चित्रांना उठावदार बनवण्यासाठी पार्श्वभूमीवर केलेला काळ्या रंगाचा वापर आपल्या सहज लक्षात येतो. काळ्या रंगाची पार्श्वभूमी, खुल्या चमकदार अशा लाल आणि केशरी रंगांना अधिक तेजस्वी बनवते. या रंगाचा योग्य वापर करून किंमती मोटारगाड्या, स्मार्ट फोन, पुरुषांचे शेवर, स्त्रियांच्या चामड्याच्या पर्स, काळ्या रंगातील स्त्री-पुरुषांची परिधाने अशी उत्पादने जगभर खूप यशस्वी झाली आहेत.
काळी शनी देवता
जगातील बहुतांश संस्कृतींमध्ये काळा रंग शनी ग्रह, आठवड्यातील शनिवार, वृश्चिक आणि मकर रास या सर्वांचे प्रतीक मानला गेला आहे. या रंगाच्या वस्तुनिष्ठ मांडणीमध्ये मात्र वैविध्य आहे. पाश्चिमात्य देशात विशेष करून ख्रिश्चन धर्म प्रणालीमध्ये काळा रंग अमंगल, अशुभ, अनिष्ट, धोकादायक, भीतीदायक आहे. मृत्यू आणि निराश मन:स्थितीचा कारक मानला गेला आहे. या उलट प्राचीन भारतीय संस्कृतीत हा रंग शुभकारक, ऊर्जादायी आणि श्रद्धेय म्हणून स्वीकृत आहे. सूर्याच्या उत्तरायण काळात म्हणजे संक्रांतीच्या सणाचे वेळी, महिला आणि पुरुष काळ्या रंगाची वस्त्र -परिधान वापरतात. केरळमधील शबरीमला डोंगरावरील अय्यप्पाच्या मंदिरात दर्शनाला जाणारे पुरुष काळ्या रंगाची लुंगी अथवा धोतर आणि कुर्ता वापरतात. यावेळी साधारण ४४ दिवस आधीपासून ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रघात आहे. व्यक्तिनिष्ठ विचारधारणेत, विज्ञाननिष्ठ भारतीय संस्कृतीत हा रंग ऊर्जादायी आहे. या उलट ख्रिश्चन धर्म प्रणालीत, काही अभाव आणि कमतरतेची जाणीव देणारा, देवाने प्रकाशाची निर्मिती करण्याच्या आधीचा जगाचा हा रंग फारसा लोकप्रिय नाही. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत काळा रंग फार वेगळ्या कारणासाठी सकारात्मक म्हणून स्वीकारला गेला. प्राचीन इजिप्तमध्ये मृत्यूनंतर राजे-राण्यांच्या शवांचे, ‘ममीज’ स्वरूपात दफन केले जात असे. अशा वेळी पाताळातील दुष्ट-अमंगल शक्तींपासून ‘अनुबिस’ नावाची देवता काळ्या कोल्ह्याच्या रूपात या शवांचे रक्षण करते, अशी श्रद्धा लोकमानसात दृढ होती. आपल्या देशाच्या आर्थिक व्यवहारात आणि राजकारणात ‘काळा पैसा’ अर्थात ‘ब्लॅक मनी’ या संबोधनाचा वापर आपापल्या ‘फायद्या’साठी नियमितपणे केला जातो. या संबोधनातला काळा रंग हा संदर्भ करचुकव्या नागरिकांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या आणि लपवून ठेवलेल्या पैशांसाठी वापराला जातो. याबरोबरच बेकायदेशीर व्यवसाय आणि व्यवहार यांना ‘काळे धंदे’ या संबोधनाने हिणवले जाते. काळा आणि लाल या दोन्ही रंगांचा एकत्र वापर परंपरेने अशुभ मानला गेला आहे. आजही या रंगाचा वापर उत्पादनाच्या जाहिरातींसाठी एकत्रपणे केला जात नाही. जगाच्या इतिहासातील विसावे शतक जर्मनीच्या नाझी हिंसाचाराने प्रभावित झाले होते. ते अत्याचार वाचून आजही प्रत्येकाचा थरकाप होतो. एक योगायोग असा की, या नाझी राजवटीचे चिह्न काळ्या चौकोनाच्या पार्श्वभूमीवरील उलटे लाल स्वस्तिक अशा प्रकारचे होते. नाझी जर्मनीच्या संपूर्ण विनाशानंतर आज हे चिह्न अशुभ-अमंगल याचेच प्रतीक झाले आहे. मनुष्य जातीच्या अनेक वंशांच्या व्यक्तींचे त्वचेचे, गोरा-गव्हाळ-पीत-कृष्ण असे निसर्गदत्त वर्ण आहेत. गेल्या शतकांत यातल्या कृष्णवर्णी लोकांना ‘काळे’-‘ब्लॅक’ हे तुच्छतादर्शक संबोधन वापरले गेले. हे संबोधन त्यांच्या काळ्या वर्णामुळे हीनदर्जाची व्यक्ती असा अर्थाने वापरले जात असे. आज ही वर्णभिन्नता आणि कृष्णवर्णी समाजाला मिळणारी दुय्यम वागणूक याचे उच्चाटन झालेले दिसते. मात्र, भारतीय समाजात दोन अनिष्ट प्रथा आजही प्रचलित आहेत. आपल्याला कृष्णवर्णी बायको नको, उजळ रंगाचीच हवी, अशी अपेक्षा धरून वधुपरीक्षा करणारे लग्नाळू आपल्या समाजात आजही ही अंधश्रद्धा बाळगून आहेत. परदेशी कंपन्यांनी आपली उत्पादने विकली जावी म्हणून काळ्या वर्णाला एका आठवड्यात उजळ बनविणाऱ्या आपल्यावर लादल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती अशा या दोन अनिष्ट प्रथा.
मंगळसूत्र
काळ्या मण्यांचे ‘मंगळसूत्र’ हा विवाहित स्त्रीचा अलंकार भारतीय संस्कृतीत पवित्र-मंगलकारक आहे आणि तो विवाहित दम्पतीच्या दीर्घायुष्याचे रूपक आहे. छोट्या बाळाची काळजी घेणारी आई आंघोळ झाल्यावर बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याला रोज काळी ‘तीट’ लावते. पाच महिने पूर्ण झाले की, बाळाच्या कमरेला काळ्या दोऱ्याचा ‘करदोरा’ बांधते. संध्याकाळी काळ्या मोहरीच्या दाण्यांनी त्याची दृष्ट काढते. या सर्व परंपरांच्या मुळाशी ‘काळा’ रंग निगडित आहे. अमंगल-अशुभ शक्तींपासून बाळाचे रक्षण करणे, अशी निश्चित श्रद्धा या दीर्घ परंपरेला जोडलेली आहे. विविध संस्कृतीतील विविध धर्म प्रणालीतील अशा अनेक भावना-श्रद्धा-संकल्पना धारण करणारा, दिवसाच्या २४ तासातील रात्रीचे १२ तास आपली सोबत करणारा, अन्य कोणत्याही रंगांपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात व्यापक उपस्थिती असलेला भारतीयांचा आवडता कृष्णवर्ण काळा रंग! जगाच्या अंतापर्यंत आपली सोबत निश्चितपणे करणार असतो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat