'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...' असं जेव्हा केव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा पैठणीचा मोर नजरेसमोर फेर धरून नाचायला लागतो. पैठणीचं स्वत:चं एक वलय आहे. हे वलय आपोआप त्या व्यक्तीलासुद्धा प्राप्त होतं, जो या पैठणीच्या सान्निध्यात येतो. या पैठणीने त्याचं आयुष्य अगदीच बदलून टाकलं. एक सर्वसामान्य मुलगा आज काही कोटींची उलाढाल करतोय हे स्वप्नातीत आहे. मात्र, हे स्वप्न त्याने साकारलंय. हा स्वप्न साकारणारा तरुण म्हणजे 'राणेज पैठणी'चे निनाद राणे.
वरळी... मराठी मध्यमवर्गीय वसाहतींची एक स्वत:ची ओळख. याच वरळीमध्ये विलास राणे आणि मनिषा राणे हे राणे दाम्पत्य सुखाने संसार करत होते. विलास राणे हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. मनिषा राणे या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. राणे कुटुंब सुखवस्तू जरी असले तरी, राणेंच्या मोठ्या मुलाला, निनादला वेगळं काहीतरी करायचं होतं, तेदेखील स्वकर्तृत्वावर. बालमोहन शाळेत शिकणारा निनाद तसा अभ्यासात हुशार. ज्या वयात मुलं आई-वडिलांकडे हट्ट करतात, त्या वयात निनादला उद्योजक होण्याचं स्वप्न पडत होतं. या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे अवघा १७ वर्षांचा असताना त्याने 'लेडिज पर्स' तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
ना कोणी गुरू, ना कोणी मार्गदर्शक. अनुभव हाच गुरू मानून हा एकलव्य व्यवसाय करण्यास सिद्ध झाला. घरी पर्स तयार करायची आणि सीएसटीच्या अब्दुल रेहमान स्ट्रीटच्या घाऊक व्यापार्यांना विकायची. या व्यापार्यांना आपण बनवलेली पर्स विकतो. पण, एवढी मेहनत घेऊन आपला ब्रॅण्ड कुठेच नाही हे त्याला जाणवले. त्या अजाणत्या वयातसुद्धा निनादला 'ब्रॅण्ड महात्म्य' उमगले. 'राणेज पर्सेस'या नावाने तो पर्सेस तयार करू लागला. 'कल्पकता' आणि 'कलात्मकता' यामुळे 'राणेज पर्सेस' महिलांच्या पसंतीस उतरली. निनादच्या पत्नी पल्लवी राणे या आता 'राणे पर्सेस'चं पूर्ण कामकाज पाहतात.
पर्सेसमध्ये नवीन डिझाईन आणताना 'पैठणीची पर्स' ही संकल्पना निनादने विकसित केली. या पर्ससाठी लागणारी पैठणी तयार करणारा कारखाना येवल्यात सुरू केला. त्यानिमित्ताने येवल्यात महिन्यातून तीन-चार वेळा सहज येणंजाणं होत होतं. त्यावेळेस एक गोष्ट जाणवली की, इकडची पैठणी अव्वाच्या सव्वा भावाने मुंबईत आणून विकली जाते. जर हीच पैठणी अगदी रास्त दरात आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिली तर...
डोक्यात आलेली कल्पना लगेच प्रत्यक्षात उतरवली. पर्सच्या दुकानात १५ पैठणी सुरुवातीस विक्रीला ठेवल्या. वाजवी दर ठेवल्याने या पैठणी हातोहात विकल्या गेल्या. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तर सणांचा जोर असल्याने या पैठणींना भलतीच मागणी आली. सुरुवातीला साडी उघडून दाखवणं आणि ती घडी घालून ठेवणंसुद्धा निनाद यांना माहीत नव्हतं. पण, त्याचा पैठणी विक्रीवर काहीही फरक पडला नाही. लोकं सकाळपासून बाहेर रांगा लावून पैठणी खरेदी करण्यासाठी उभे असत. निनाद राणेंनी दुकानावर पाटी लावली होती, त्यावर स्पष्ट नमूद केलं होतं की,'साडी बदलून मिळणार नाही. फॉलबिडिंग करुन मिळणार नाही.' ही पाटी पाहून अनेकांनी निनादना वेड्यात काढलं. 'दुकान चालणारच नाही,' असंदेखील ठणकावून सांगितलं. पण, दुकानासमोरच्या गर्दीने या बोलक्या बाहुल्यांचे दात घशातच पाडले.
आज 'राणेज पैठणी'मध्ये पैठणी व्यतिरिक्त सेमी पैठणी, कांजिवरम, गढवाल, उपाडा, माहेश्वरीसारख्या विविध प्रकारच्या विविध प्रांतातील भारतीय साड्या मिळतात. अगदी ५०० रुपयांपासून ते अगदी लाख रुपयांपर्यंत दर असणार्या वेगवेगळ्या श्रेणीतल्या साड्या येथे उपलब्ध आहेत. १२ कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यास सदैव तत्पर असतात. ग्राहकांचं हित हे नेहमीच अग्रस्थानी ठेवल्याने ग्राहकांसाठी निरनिराळ्या साड्यांचे महोत्सव देखील या दुकानात भरविले जातात. एवढंच नव्हे, तर ग्राहकांना सर्वोत्तम पैठणी पाहता याव्यात यासाठी निनाद राणेंनी महाराष्ट्रभर प्रदर्शन भरविलेले आहे. कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असा अर्धा महाराष्ट्र आतापर्यंत पूर्ण झाला आहे. अनेक राजकीय पक्ष 'राणेज पैठणी'च्या सहकार्याने 'पैठणी महोत्सव' भरवतात. फक्त साड्याच नव्हे, तर पैठणीचे रेडी टॉप, पैठणीचे दुपट्टे, पैठणी टॉपसाठी अडीच मीटर कापड आणि पैठणीचा गाऊनदेखील येथे मिळतो. सध्या राणेंचा हा समूह काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. २८० चौरस फूट जागेत असणारं हे दुकान एवढं तेजीत कसं चालतं, हे पाहण्यासाठी अगदी नागपूर, वर्धा, पुण्याहून व्यापारी 'राणेज पैठणी'मध्ये येतात. लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांतदेखील 'राणेज पैठणी'च्या शाखा सुरू करण्याचा निनाद राणेंचा मानस आहे.
अनेक कॉर्पोरेट्स, मराठी सेलिब्रेटीज 'राणेज पैठणी'चे नियमित ग्राहक आहेत. मुंबईबाहेर पुणे, अलिबाग, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथून ग्राहक पैठणी खरेदी करण्यासाठी 'राणेज पैठणी'मध्ये येतात. हा प्रवास मात्र म्हणावा तेवढा सोपा नव्हता. अगदी सुरुवातीला 'राणेज पैठणी'ची उलाढाल १ कोटी रुपयेही नसताना देना बँकेने राणेंना एक कोटी रुपयांची कॅश क्रेडिट निव्वळ विश्वासार्हतेवर दिली होती. देना बँकेच्या महाव्यवस्थापक जया चक्रवर्ती यांनी निनाद राणेंवर विश्वास दाखविला. ही कॅश क्रेडिट मंजूर करण्यास सांगितले. निनाद यांनी हा विश्वास सार्थ ठरवत काहीच महिन्यांत पाच कोटी रुपयांची उलाढाल केली.
पैठणी हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या बहुतांश महिलांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. या महिलांचं स्वप्न पूर्ण करणं हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे, हे समजून 'राणेज पैठणी' अगदी येवल्याच्या दरात पैठणी उपलब्ध करुन देतात. निनाद राणेंच्या या भूमिकेमुळे कालपर्यंत 'पैठणी परवडत नाही' म्हणणारा महिला वर्ग आनंदाने पैठणी खरेदी करत आहे. निनाद राणेंच्या या सामाजिक जाणिवेमुळेच 'राणेज पैठणी'वरचा मोर हसरा आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat