हॅलो... प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय!

    03-May-2019
Total Views | 208



भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचा पाठ आपण सर्वांनीच पाहिला, ऐकला किंवा अनुभवलाही असेल. जिगरी मित्र, राजकारण-समाजकारणातील सहकारी ते वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक नातेसंबंध असा या दोघांचा प्रवास होता. पण, हे मी तुम्हाला का सांगतोय? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. तर आज चाणाक्ष रणनीतिज्ञ, राजकारणातील धुरंदर व्यक्तिमत्त्व व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची १३ वी पुण्यतिथी आहे. ३ मे, २००६ साली हा राजकारणातील तारा आपल्यातून निखळला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ मुंडे आणि त्यांची मैत्री किती घनिष्ट होती याचे एक उदाहरण पाहणार आहोत.

 

महाजन आणि मुंडे यांच्या मैत्रीचा अध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाला. या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले, एकत्रच राजकारण व समाजकारणाला सुरुवात केली. या दोघांनाही ‘राजकारणातील मुरब्बी नेते’ म्हटले जायचे. या दोघांना ‘राजकारणातील राम-लक्ष्मणांची जोडी’ असेही म्हटले जायचे. हे दोघे जिथे जातील तिथे लोकांची गर्दी जमा व्हायची. अशातच महाजन यांचा लहान भाऊ प्रवीण याने २२ एप्रिल, २००६ रोजी प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर प्रमोदजींनी तब्बल १२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर ३ मे, २००६ रोजी प्रमोदजींची प्राणज्योत मालवली. प्रमोदजींचं अकाली निघून जाणं हे गोपीनाथजींसाठी अतिशय दुःखदच होतं. प्रमोदजींच्या निधनानंतर कित्येक दिवस गोपीनाथजी शोकमग्न होते. हयात असताना त्यांनी अनेक वेळेस प्रमोदजींच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली होती.

 

एकदा गोपीनाथ मुंडे झी मराठीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रमोदजींच्या आठवणींना उजाळा देत, प्रमोदजींना फोन लावत तुम्ही मला एकट्याला सोडून का गेलात, असा हृदयद्रावक प्रश्न विचारला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्याला एक फोन लावायचा असतो. तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीला एक फोन करायचा आहे, असं ज्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी सांगितले; त्यावेळी त्यांनी दिवंगत प्रमोदजींना फोन लावला. यावेळी गोपीनाथजींनी प्रमोदजींच्या आठवणींनी भारावून जात अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. प्रमोदजींना फोन केल्यानंतर गोपीनाथजी काय म्हणाले? हे जाणून घेऊयात..

 

हॅलो... प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, हो! हो! गोपीनाथ मुंडे बोलतोय मी...

 

आपण एकाचवेळी कॉलेजमध्ये होतो, एकत्रच खेळाच्या मैदानात आपण खेळलो, एकाच वेळी आंबेजोगाई सोडून पुण्याला शिकायला गेलो, एकाच वेळी आणीबाणीत तुरुंगात गेलो, एकाच वेळी आपण राजकारणात आलो, एकाच वेळी राजकारणात आपण यश संपादन केले... मग, याचवेळी आपण मला एकटे सोडून का गेलात? हा अन्याय आहे. तुमच्या अचानक सोडून जाण्यामुळे माझं नाही, तर देशाचं नुकसान झालंय. कारण, आज देशाला पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. तुम्ही परत या. तुम्ही आलात, तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल, एवढी तुमची योग्यता आहे. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव असाच अर्ध्यावर का सोडलात ? हा माझा प्रश्न आहे. मित्र म्हणून तुम्हाला विचारण्याचा मला अधिकार आहे.

 

तुम्ही ममता, जयललिता, समता या सगळ्यांना एकत्र बांधत होतात. आता कोणीच नाही आपल्याबरोबर. त्यांना तुम्हीच आणू शकला असतात. शिवसेनेत आमच्यातही कधी मतभेद होतात, पण युती कशी टिकवायची याची कला तुम्हाला अवगत होती, आम्हाला कुठे ? अशा स्थितीत तुमचं ‘असणं’ किती आवश्यक होतं. आज परत या. तुम्ही आलात, तर या देशात नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आलात, तर माझ्यासारखे असंख्य लोक तुमच्या पाठीमागे उभे राहून ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाहीत. पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे, कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्चित महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास वाटतो.

 

तुम्ही बोललात, याबद्दल धन्यवाद...

 

यावरूनच प्रमोदजी आणि गोपीनाथजी यांचे ऋणानुबंध राजकीय नात्यांच्या पलीकडील असल्याची प्रचिती आपल्याला येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121