डॉ. सुजय विखेंनी केला शरद पवारांचा पराभव

    23-May-2019   
Total Views | 2816



अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी विजय मिळवत इतिहास घडविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. तत्पूर्वी अनेक नाट्यमय परिस्थितीनंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपनेही अहमदनगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉ. सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी दिली. अखेर सर्व विघ्ने पार करून डॉ. सुजय विखेंनी अहमदनगर दक्षिणेचा गड काबीज केला.

 

विखेंचा हा विजय सहजासहजी मिळालेला विजय नाही. यामागे त्यांची मेहनत व पक्षाची साथ महत्त्वाची ठरते. याशिवाय राधाकृष्ण विखे-पाटलांनी पक्षादेशाला न जुमानता प्रवरेची यंत्रणा सुजय यांच्या प्रचाराला पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा सुजय विखेंना तारून गेल्या. त्यापलीकडेही विरोधी उमेदवार जगताप यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते निवडून आल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे बिंबवण्यात व जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सुजय विखे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगण्यात विखेंच्या प्रचार यंत्रणेला यश आले. ही सर्व समीकरणे जुळून आल्याने विखेंना विखे परिवाराचा इतिहास बदलता आला. पवार घराण्यानेही इतिहास उकरून काढत ही लढत प्रतिष्ठेची केली होती.

 

१९९१ सालच्या पराभवाचा दाखला देत, “२०१९च्या निवडणुकीतही पराभवाची धूळ चारू,” या शरद पवारांच्या विधानानंतर विखे कुटुंबीय दुखावले होते. १९९१च्या आजोबांच्या पराभवाचा वचपा काढायचाच, या त्वेषाने सुजय यांनी मतदारसंघ पिंजून काढला. पवार कुटुंबीयांनीही नगरमध्ये तळ ठोकून संग्राम जगताप यांचा प्रचार केला होता. पवार कुटुंबातील शरद पवार, रोहित पवार, अजित पवार व सुप्रिया सुळेंनी जंगजंग पछाडले. तरीही, त्यांच्या हाती पराभवच आला असून विखेंनी जगताप यांचा तब्बल २ लाख, ६५ हजार, ३८६ मतांनी पराभव केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

विजय डोळे

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब सब एडिटर म्हणून कार्यरत, ३ वर्षांपासून मेन स्ट्रीम मीडिया व डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव असून पुणे विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. अनेक लघुपटांसाठी, विविध वेबसाईटसाठी लेखन, डिजिटल मीडिया तसेच शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन आदी कामाचा अनुभव...

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121