हैदराबाद : हैदराबादची खास ओळख असलेल्या आणि जगभर प्रसिद्ध असलेल्या ४०० वर्षे पुरातन चारमिनारचा काही भाग कोसळला. बुधवारी रात्री चारमिनारच्या वरच्या मजल्याचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेमुळे चारमीनार इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे.
राज्याच्या पुरातत्व विभागाने काही दिवसांपूर्वी या इमारतीची डागडूजी करण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी देखील या इमारतीच्या पश्चिमेकडील चारमिनारचा एक तुकडा अशाच प्रकारे कोसळला होता. यावरुन चारमिनारच्या सुरेक्षचा प्रश्न पुढे येत आहे. दररोज चारमिनार पाहण्यासाठी येथे हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांना चारमिनारचा फक्त पहिला मजला पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हैदराबाद शहराची ओळख बनलेला चारमिनार वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १५९१ मध्ये शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात महम्मद कुली कुतुबशाह द्वारे बनवण्यात आलेला वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणजे चारमिनार. शहराची ओळख बनलेला चारमिनार म्हणजे चार मिनारांनी मिळून बनलेली एक चौरसाकार प्रभावशाली इमारत आहे. त्याच्या आर्क मध्ये रोज रोषणाई केली जाते जे एक अविस्मरणीय नयनरम्य दृश्य बनते. विमान, रेल्वे, बस किंवा खाजगी गाड्यांनी हैदराबादला जाता येते. चारमिनार रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किमी अंतरावर आहे. बस स्थानकापासून साधारण ५ किमी अंतरावर आहे. खाजगी वाहनांनी देखील इथे सहज जाता येऊ शकते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat