पूर्वीच्या काळी पिढ्यान्पिढ्या एखाद्या सराफाकडून दागिने खरेदी करणे, हा एकप्रकारे अलिखित नियमच होता. अशाच सराफांपैकी ते सुद्धा एक. अगदी सहा पिढ्यांपासून सुरू झालेला सोन्या-चांदीचा व्यवसाय म्हणजे जणू त्यांच्यावरच्या विश्वासार्हतेचं प्रमाणपत्रच जणू. आजीच्या लग्नासाठी सोन्या-चांदीची खरेदी याच दुकानात झाली आणि नातीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायलासुद्धा इथेच येतात. हे नातं जपलंय मुरलीधर वासुदेव पेंडुरकर अर्थात एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्सने. या परंपरेची वाटचाल उलगडत आहेत मुरलीधरांचे नातू अभिषेक पेंडुरकर.
अजित पेंडुरकरांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक अभिषेक. अभिषेकचं शालेय शिक्षण हिंदू कॉलनीतल्या राजा शिवाजी विद्यालयात झालं. शिवाजी पार्कजवळ राहूनसुद्धा अभिषेक कधीच पार्कातल्या कट्ट्यावर बसला नाही. कारण, शाळेतून आल्यानंतर थेट दुकानात जायचं, हा जणू शिरस्ताच झाला होता. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळत होतं. पुढे रुईयामधून विज्ञान शाखेतून बारावी झाल्यावर दादरच्या केटरिंग कॉलेजमधून त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली. हॉटेल मॅनेजमेंट तर झालं, आता त्याचं प्रात्यक्षिक घ्यायचं तर चांगल्याच हॉटेलमधून घेऊया, या विचाराने अभिषेकने थेट इंग्लंड गाठलं. इंग्लंडमधील काही नामांकित हॉटेल्समधून त्याने अनुभव मिळवला. आता इथेच राहून आपलं करिअर सेट करायचं, हा विचार त्याने केला.
नेमकं त्याचवेळी दुर्दैव आडवं आलं. अभिषेकच्या बाबांना चेहर्याचा लकवा मारला. परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं झालं होतं. तशी अभिषेकची आई, आरती पेंडुरकर दुकान सांभाळत होत्या. त्यांच्या माहेरीसुद्धा सराफाचा व्यवसाय असल्याने त्यांना हे सारं नवखं असं काही नव्हतं. मात्र, घर आणि व्यवसाय अशा दोन्ही आघाड्या सांभाळणं जरा कठीणच होतं, विशेषत: मानसिकदृष्ट्या. अभिषेक भारतात परतला. व्यवसायाची सूत्रे त्यांनी हातात घेतली. यावेळी हॉटेलचा का असेना, पण व्यवस्थापनाचा गाढा अनुभव गाठीशी होता. सोबत २०-३० वर्षे काम करणारा दुकानातला कर्मचारीवर्ग होता. सुरुवातीलाच त्यांनी आपल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले. अभिषेकच्या या निर्णयाची त्यांच्या सोबतच्या व्यावसायिक मित्रांनी टीका केली.
प्रशिक्षण दिल्याने हेच कर्मचारी स्वत:चं दुकान थाटतील, मग काय फायदा? अशी भीतीसुद्धा घातली. मात्र, अभिषेक स्वत:च्या निर्णयक्षमतेवर ठाम होते. जर कोणी कर्मचारी स्वत:चा व्यवसाय करणार असेल तर आपण त्यास सर्वतोपरी मदत करू, अशी उलट भूमिका घेतली. परिणामी, कर्मचार्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले. तोपर्यंत अजित पेंडुरकर यांची प्रकृती हळूहळू पूर्वपदावर येत होती. २००६ मध्ये दुकान रानडे रोडजवळ आताच्या वास्तूत स्थलांतरित झालं. आज पेंडुरकरांमुळे २१ जणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. काही कोटी रुपयांची उलाढाल पेंडुरकर ज्वेलर्स करत आहेत.
एकदा पेंडुरकरांच्या दुकानात स्टेट बँकेतून निवृत्त झालेले एक अधिकारी सोने खरेदी करावयास आले. तसे ते दुकानात येत असत. मुलाच्या लग्नानिमित्ताने त्यांनी बायको, २ सुना आणि मुलगी यांच्यासाठी समसमान सोन्याची खरेदी केली. एक निवृत बँक अधिकारी अगदी सरळमार्गाने आपलं आयुष्य जगलेल्या माणसाने एवढं सोनं खरेदी करण्याइतपत पैसे कुठून आणले असतील, हा प्रश्न अभिषेकच्या मनात आला. त्यांनी तो प्रश्न त्या निवृत्त अधिकार्याला विचारलादेखील. ते निवृत्त अधिकारी म्हणाले, “दर महिन्याला पगार झाला की एक ठराविक रक्कम साठवत गेलो. त्यातून थोडं थोडं सोनं खरेदी करत गेलो. त्यामुळेच सगळ्यांसाठी सोनं खरेदी करू शकलो.” त्या अधिकार्याच्या उत्तरातूनच एका नवीन योजनेचा जन्म झाला. विजयालक्ष्मी सुवर्णसंचय योजना. अगदी हजार रुपयापासून दर महिन्याला बचत करून एक ठराविक तोळे सोने खरेदी करण्याची तरतूद या योजनेत आहे.
असाच एक दुसरा किस्सा अभिषेक पेंडुरकर सांगतात. दादरमधील पाठारे प्रभू समाजातील एक आजीबाई दहा खोल्यांचं घर असलेल्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्याकडे खूप सोनं होतं. मात्र, एकटं राहत असल्याने जीवाला धोका होताच. त्यांच्यासारखी अनेकांची अडचण असू शकते, हे अभिषेक यांनी जाणलं आणि त्यातून सुरू झाली सुवर्ण बचत योजना. या योजनेअंतर्गत सोने पेंडुरकर ज्वेलर्सकडे आणून द्यायचे आणि त्याच्यावर एक ठराविक परतावा सोन्याच्या मालकाला दिला जात असे. यामुळे त्या आजीबाईंच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली लागला.
काहीजणी एखाद्या समारंभासाठी एखादा हार विकत घेतात. मात्र, पुढच्या समारंभासाठी काय घालायचं, हा प्रश्न उद्भवायचा. नवीन दागिने घेण्याइतपत पैसेदेखील नसायचे. अशा महिलांच्या मदतीस पेंडुरकर धावले. हार घेतलेल्या महिलेच्या हाराचे बाजूबंदमध्ये रुपांतर करून त्या महिलेचा आनंद द्विगुणित करण्याचं कामसुद्धा अभिषेक यांनी केलं. तसेच गर्भश्रीमंत वा अतिश्रीमंत वर्गाच्या लोकांकडे अमाप पैसा आहे. त्यांना चांदीच्या भांड्याचं वैशिष्ट्य समजावून या गटाला चांदीचे भांडे घेण्यास उद्युक्त केले. तसेच सोने घेणार्या ग्राहकांना हिर्यांच्या दागिन्यांकडे वळविले. अशा अनेक क्लृप्त्या व्यवसायवाढीसाठी अभिषेक पेंडुरकरांनी अमलात आणल्या.
एक ८४ वर्षांच्या आजीबाई दुकानात कोणाचीही मदत न घेता चालत आल्या होत्या. एवढंच नाही तर स्वत:च्या नातीच्या लग्नासाठी दागिने चोखंदळपणे निवडत होत्या. या वयातल्या आजीबाईंचा फिटनेस आणि उत्साह पाहून अभिषेक यांच्यासह दुकानातला कर्मचारी वर्गसुद्धा अवाक् झाला. आजीबाईंनी त्यांच्या तब्बेतीचं रहस्य सांगताना सांगितले की,“त्यांच्या आई लहानपणी पाटल्या ठेवलेल्या भांड्यातलं पाणी सकाळी उठून आपल्या मुलांना देत असे. परिणामी, या आजी आयुष्यात कधीच आजारी पडल्या नाहीत.” या आजीबाईंमुळे अभिषेक यांना नवीन दृष्टिकोन मिळाला. सोनं आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध या विषयाच्या अनुषंगाने अभिषेक पेंडुरकरांनी संशोधन सुरू केलं. दैनंदिन समस्यानिवारणासाठी सोन्याचा वापर कसा करता येईल, यावरदेखील त्यांचा संशोधनाचा मानस आहे.
अभिषेक यांच्या पत्नी मानसी या फॅशन डिझायनर आहेत. अथर्व आणि सिद्धांत अशी दोन गोंडस मुलं असं छान कुटुंब आहे. ‘एनर्जी सायन्स’ या विषयावर त्यांचं अध्ययन सुरू आहे. स्वत:च्या अनुभवातून आलेलं शहाणपण तरुण उद्योजकांसोबत शेअर करण्याचा त्यांचा भविष्यकालीन विचार असून एक मोटिव्हेशनल स्पीकर या भूमिकेमध्ये ते लवकरच दिसणार आहेत. “स्वत:वर प्रचंड विश्वास ठेवा. आई-वडिलांनी दिलेलं शिक्षण म्हणजेच भांडवल असं समजून त्याचा योग्य वापर करा. तुमचं कोणतंही उत्पादन वा सेवा असेल तर त्याचा दर्जा चांगला असू द्या आणि व्यवसाय करताना कोणाशीच तुलना नको. या चार बाबी लक्षात ठेवल्या तर व्यवसाय १०० टक्के यशस्वी होतोच,” असं पेंडुरकर म्हणतात. अभिषेक पेंडुरकर खर्या अर्थाने ‘मिडास टच’ देणारे उद्योजक आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat