पांढरा रंग स्पष्टपण, शुद्धता, पावित्र्य आणि तारुण्य याचा संकेत देत असतो. व्यक्तिनिष्ठ धारणेत हा रंग उत्साहित करतो आणि संतुलित आरोग्य आणि मनःस्वास्थ्याचे निःशब्द प्रतीक असतो. पृथ्वीचा उपग्रह चंद्र, आठवड्यातील सोमवार आणि राशीचक्रातील कर्क राशी, या सर्वांचे हा प्रतीक-चिह्न आहे. एखादे उत्पादन वापरासाठी किती सुलभ आणि सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी जाहिरातीत पांढरा रंग प्रामुख्याने वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी घ्यायचे एखादे औषध, कमी उष्मांक असलेले उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ याच्या जाहिराती आणि वेष्टनावर अनेकदा पांढरा रंग प्रभावीपणे वापरलेला असतो.
‘इसकी कमीज मेरे कमीजसें सफेत कैसी’ अशी दर्शकाच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी, एका कपड्याच्या साबणाच्या जाहिरातीमधील ही एक गाजलेली ‘कॅच लाईन.’ ‘माझ्यापेक्षा याचा कुडता इतका पांढराशुभ्र कसा!’ पांढऱ्या रंगाचे वस्त्र-परिधान करणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी उत्सुकता किंवा थोडीशी असूया, थोडासा मत्सर दर्शकाच्या मनात निर्माण करणारी, त्याकाळात गाजलेली यशस्वी जाहिरात. अशी उत्सुकता आणि असूया निर्माण होण्याचे कारणही तसेच आहे. पांढरा रंग वापरणारी व्यक्ती साधारणपणे सकारात्मक असते आणि दिसतेसुद्धा. त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाची जाणीवसुद्धा आपल्या नकळत आपल्याला होते. हीच पांढऱ्या रंगाची व्यष्टी आणि वैशिष्ट्ये आहेत. मात्र, अशी व्यक्ती अतिचोखंदळ आणि सहजासहजी समाधान मानणारी नसते. आपल्या रंगगाथेचा हा सातवा आणि शेवटचा लेख. काळ्या रंगासारखेच आपले दैनंदिन जीवन व्यापून राहिलेला. सकाळी हातात येणारे वर्तमानपत्र, त्याआधी आपल्या कॉफी किंवा चहातले दूध आणि साखर (काहींना वर्ज्य असेल कदाचित), काही लिहिण्यासाठी हातात घेतलेला वहीचा कागद... आपल्या प्रत्येकाची सकाळची सुरुवात अशी पांढरीशुभ्र होत असते. काळी रात्र संपून नव्या दिवसाची सुरुवात म्हणजे पांढरा रंग. काळ्या पाटीवरची जुनी अक्षरे पुसून पांढऱ्या खडूने नवी अक्षरे लिहिणारा प्रसन्न-सकारात्मक म्हणजे पांढरा रंग. वेगवेगळे रंग, दर्शकाच्या मनात विविध भावना निर्माण करतात. पांढरा रंग अशा काही भावना निर्माण करत नाही. मात्र, पांढऱ्या रंगाच्या ‘विषमता’ या एका गुणधर्मामुळे, अन्य रंगांच्या रिकाम्या पार्श्वभूमीवर आपले विचार व्यक्त करण्याचे, तो एक नैसर्गिक साधन आहे. संगणक आणि स्मार्टफोनचा वापर करताना अगदी छोट्या पडद्यावर गडद रंगांच्या पार्श्वभूमीवर लिहिले जाणारे आणि वाचले जाणारे पांढऱ्या रंगातील मेसेज, हे या विषमतेचा अनुभव आपल्याला निश्चितपणे देतात. थोडक्यात, पांढरा आणि काळा यांची जोडी अविभाज्य आहे, एकमेकांशिवाय त्यांचे अस्तित्व आणि त्यांच्या शिवाय आपल्या दृष्टीच्या जाणिवा जागृत होणार नाहीत. याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांचा पांढऱ्या रंगावरील काळ्या अक्षरांचा तक्ता. चश्म्याचा नंबर तपासताना नेमके हेच दोन रंग आपल्या दृष्टीक्षमतेची परीक्षा करतात.
विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण एक प्रश्न विचारूया. पांढरा आणि काळा हे दोन्ही रंग आहेत का...? याला उत्तर देताना भौतिकशास्त्राचा विद्यार्थी म्हणेल, काळा हा रंग नाही. कारण, तो आपल्या डोळ्यातील प्रकाश पूर्णपणे शोषून घेतो. पांढरा हा रंग आहे. कारण, तो स्पेक्ट्रम म्हणजे वर्णपटातील सर्व रंग आपल्या डोळ्यांना परावर्तित करतो. चित्रकलेचा विद्यार्थी सांगेल काळा हा रंगच आहे. कारण, कितीही गडद असला तरी त्यावरून थोडासा प्रकाश परावर्तित होतोच. विज्ञानाचा चिकित्सक विद्यार्थी सांगेल, प्रथम त्या रंगांचे माध्यम वस्तू आहे की प्रकाशाचा किरण आहे ते बघूया. त्यानंतर तो प्रसारित कसा झाला आहे, ते पाहणे महत्त्वाचे. त्यानंतर आपल्या डोळ्यांना रंग कसा दिसतो, त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. रसायनशास्त्राचा विद्यार्थी छातीठोकपणे सांगेल, काळा हा रंगच आहे. थोडक्यात, या दोन रंगांविषयी विविध विज्ञाननिष्ठ मतप्रवाह वाचणे फार रंजक अनुभव असतो हे मात्र खरे. पांढऱ्या रंगाचे एक वैशिष्ट्य असे की, तो वर्णपटातील सर्व रंगांचे संतुलन सांभाळतो. निष्पक्षता, वाजवीपणा, औचित्य, तटस्थ वृत्ती आणि स्वतंत्र विचार ही सर्व आपल्या पांढऱ्या रंगाची गुणवत्ता आहे. जन्माला आलेल्या बाळाला, जन्मतः फक्त पांढरा रंग बघण्याची क्षमता असते. वर्णपट आणि त्यातील रंग याचा परिचय त्या बाळाला अनुभवाने होत जातो. याचे अन्य वैशिष्ट्य असे की, हा चिंतनशील आणि परावर्तक रंग आहे. याची पारंपरिक ओळख स्पष्ट, निष्कपट आणि निर्मळ रंग अशी आहे. मात्र, वर्तमानकाळात याचा विपर्यास झालेला आपल्याला दिसतो. देशातील राजकारणी सतत पांढऱ्या कपड्यात वावरताना दिसतात, तेव्हा रंगाच्या या गुणवत्तेचा आपला भ्रमनिरास नक्की होतो.
पांढऱ्या रंगाच्या स्वच्छता, शुचिता, पावित्र्य, निर्मल पारदर्शकता, सामंजस्य, व्यापकता, न्यायनिष्ठा, सत्त्वशीलता, तारतम्यभाव आणि प्रवाहीपणा या सर्व गुणवत्तांचे एकच प्रतीक-चिह्न, आपल्या चतुर पूर्वजांनी आपल्याला दिले. विद्येची देवता सरस्वतीदेवीचे शुभ्र पांढरे वस्त्र, तिचे शुभ्र कमलासन आणि तिच्या बाजूचा पांढरा हंस ही पांढऱ्या रंगाची पहिली प्रतीके. पांढरा रंग ज्या रंगांचे संतुलन ठेवतो, त्या रंगांनी नटलेला बहुरंगी मोर हे याचे दुसरे प्रतीक. स्थैर्य आणि शांतता, दिलासा आणि आश्वासन, दुःख कमी करणारा आणि सांत्वनशील असा पांढरा रंग या विशेषणांनी संपन्न आहे. दक्षता, सुव्यवस्था आणि कार्यक्षमतेचे प्रतीक म्हणून समाजमनात स्वीकृत आहे. स्वत:च्या त्रुटी दूर करायला साहाय्य करणारा रंग आहे. आपले चित्त आणि वृत्ती म्हणजेच मन आणि बुद्धी स्थिर करून केंद्रित करणे हे अभ्यास आणि अन्य कुठलेही काम करण्यासाठी आवश्यक असते. पांढरा रंग या प्रक्रियेला साहाय्यक रंग आहे. रसिक नवरोबांनी आपल्या सौभाग्यवतीसाठी आणलेल्या पांढऱ्या शुभ्र सुवासिक मोगऱ्याच्या गजऱ्याचा शृंगार करून नटलेली ललना, हे आपल्या भारतीय संस्कृतीतील दाम्पत्य प्रेमाचे खास शृंगार लेणेच म्हणायला हवे. पाश्चिमात्य संस्कृतीनुसार निर्मलता आणि पवित्रता या गुणवत्तेमुळे लग्न समारंभात वधू नेहमी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करते. मात्र, याच वेळी पाश्चात्य समाजमनात पांढरा रंग निष्क्रियता, रिक्तपणा, अर्थशून्यता, एकटेपणा, नैराश्य, मृत्यू आणि दुःख या सर्व भावना-धारणांचा आणि निष्फलता, नापीकवृत्तीचा सूचक रंग आहे. दहाव्या -बाराव्या शतकांत युरोपात झालेल्या युद्धांत, पराभूत होणाऱ्या सैन्याचा सेनापती नेहमी पांढरे निशाण उंच काठीवर लावून जेत्या सैन्याला पराभवाची कबुली देत असे. हे आहे पांढऱ्या रंगाचे एक नकारात्मक वैशिष्ट्य. आधुनिक युद्धप्रसंगी पराभवाचे असे पांढरे निशाण आता सोशल मीडियामध्ये प्रसारित झालेल्या चित्र माध्यमातून सर्व जगाला दिसेल, अशा पद्धतीने झळकते. भारतीय वायुदलाने, बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पराभूत देशाच्या पंतप्रधानांनी नरो वा कुंजरोवा शैलीमध्ये असेच पांढरे निशाण फडकावलेले सर्व जगाने पाहिलेच आहे. निशाण तेच, माध्यम बदलले इतकेच!
आपले निरागस बालपण आणि त्या आठवणी मनात उफाळून आल्या की, शाळेच्या गणवेशातला पांढरा रंग, वही-पुस्तकाची पांढरी पाने डोळ्यासमोर येतात. डेंटिस्ट आणि डॉक्टरांच्या दवाखान्यामधल्या सर्व खोल्या नेहमीच पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या असतात. यामुळे पेशंटच्या मनात नकळत, स्वच्छता, शांतता अशा भावना निर्माण होतात. म्हणूनच डॉक्टरी पेशातील सर्वजण पांढऱ्या रंगाचा अॅप्रन वापरताना दिसतात. या पांढऱ्या अॅप्रनचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्या दुखण्याचे-व्याधीचे निदान करताना डॉक्टरी पेशातले व्यावसायिक, आपल्याला खूश करण्यासाठी भावनिक विचार करत नाहीत, तर वास्तव परिस्थितीचेच वर्णन करतात. या मांडणीनुसार पांढरा रंग, अनेकदा भावनाशून्येतेचे संकेत देतो. बर्फ अथवा हिम याचा रंग असल्याने हा रंग थंड प्रवृत्तीचा आहे. अनेकदा ही टोकाची प्रवृत्ती अतिथंड म्हणजे भावनाशून्यतेकडेही जाते. वस्तुनिष्ठ विचार करताना हा रंग स्पष्टपण, शुद्धता, पावित्र्य आणि तारुण्य याचा संकेत देत असतो. व्यक्तिनिष्ठ धारणेत हा रंग उत्साहित करतो आणि संतुलित आरोग्य आणि मनःस्वास्थ्याचे निःशब्द प्रतीक असतो. पृथ्वीचा उपग्रह चंद्र, आठवड्यातील सोमवार आणि राशिचक्रातील कर्क राशी या सर्वांचे हा प्रतीक-चिह्न आहे. एखादे उत्पादन वापरासाठी किती सुलभ आणि सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी जाहिरातीत पांढरा रंग प्रामुख्याने वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी घ्यायचे एखादे औषध, कमी उष्मांक असलेले उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ याच्या जाहिराती आणि वेष्टनावर अनेकदा पांढरा रंग प्रभावीपणे वापरलेला असतो. या पांढऱ्या रंगाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की, याच्या मागे कोणी लपू शकत नाही. कारण, या रंगाची पारदर्शकता आणि मग पांढरे शुभ्र कपडे घालून गैरव्यवहार करणाऱ्या मंडळींच्या फसव्या पांढऱ्या रंगाला ‘सफेद झूट’ असे म्हटले जाते. विविध धर्मप्रणाली, पंथ आणि संप्रदाय यातील प्रतीके-चिह्न आणि त्याच्या संकेतांचा अभ्यास यापुढील लेखांमध्ये वाचकांना सादर करण्यासाठी मी उत्सुक आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat