निळ्या रंगाची न्यारी दुनिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019   
Total Views |



निळ्या रंगांच्या अनेक छटांच्या वापरामुळे विविध अर्थ आणि संदर्भ सूचित केले जातात अथवा अनेक संवेदनांसाठी वापरले जातात. अ‍ॅक्वा आणि अ‍ॅक्वामरीन ही छटा पाण्यासाठी, तर नेव्ही ही छटा सागरी सैनिकांसाठी, अझूर आणि सेरुलिअन या आकाशासाठी, कोबाल्ट ही छटा एका धातूसाठी, तर पर्शियन आणि इजिप्शियन या छटा प्राचीन संस्कृतींचा परिचय देतात.


चिह्न आणि चिह्नसंकेतांच्या भिंगातून केलेला या रंगगाथेचा अभ्यास फार रंजक आहे आणि वाचकांसाठी तो लिहिताना फार लगबग होते आहे, इतके या प्रत्येक रंगाचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. देशोदेशींच्या विविध संस्कृती, परंपरा, लोकश्रद्धा, लोकश्रुति यामध्ये सापडणारे रंगांचे संदर्भ आणि प्राचीन साहित्यातील उल्लेख, आधुनिक विज्ञानाचा अभ्यास हे सर्व वाचकांसमोर ठेवताना यातले काही राहू नये अशी माझी लगबग आहे. आपल्या चतुर पूर्वजांनी, वर्तुळ - पृथ्वीचा गोलाकार याचे भूमितीय चिह्न किंवा प्रतीक निळ्या रंगाला बहाल केले आहे. शीतलता, आर्द्रता, पारदर्शकता आणि भव्यता हे निळ्या रंगाचे सर्व गुणधर्म या एकाच गोलाकार चिह्नात व्यक्त होतात. अगणित - अपरिमित ही या रंगाची वैश्विक वैशिष्ट्य या एका कोनविरहित वर्तुळात, प्राचीन पंडितांनी व्यक्त केली आहेत. निळ्या रंगाची नजरेत न मावणारी व्यापकता, सुप्त आणि व्यक्त मनात दर्शकाचा आत्मसन्मान, त्याच्या नकळत वृद्धिंगत करते आणि शांत-विश्रांत स्थितीची अनुभूती देते. हा रंग जसे ज्ञानाचे प्रतीक मानला जातो त्याबरोबरच हा रंग; प्रसन्नता, स्तब्धता, शांतता, स्थिरता अशा भावनाही निर्माण करतो. निसर्गाच्या अलौकीक शक्तीचा परिचय, असीम- अमर्याद - विश्रांत आकाशाचा हा रंग, अव्याहतपणे आपल्याला देत असतो. व्यापक आकाशाबरोबरच विशाल सागर आणि बर्फ याचेही हा निळा रंग प्रतीक मनाला गेला आहे. सत्य - शुचिता - पावित्र्य - निष्ठा - दया - क्षमा - करुणा - वात्सल्य अशा सर्व गुणवत्ता आणि मुल्ये यांची अनुभूती, या एका निळ्या रंगामुळे दर्शकाला होते.

 

वैयक्तिक अथवा समाजजीवनात, आत्मसन्मान - प्रतिष्ठा - गौरव - परंपरांचा अभिमान अशा भावना या निळ्या रंगातून व्यक्त होतात. व्युत्पत्तिशास्त्रानुसार 'निळा'अर्थात इंग्लिश 'Blue' हा शब्द मूळ 'bleu' या फ्रेंच शब्दापासून प्रचलित झाला आहे. आजही थायलंड, कोरिया आणि जपान या पौर्वात्य देशात 'bleu' हा फ्रेंच शब्दच आजही निळ्या आणि हिरव्या रंगाच्या लिखित संदर्भात वापरला जातो. मात्र, याच देशात, हा निळा रंग; अनुत्साह, कंटाळा, एकटेपणा अशा भावना व्यक्त करण्यासाठीही वापरला जातो. याच्या अगदी विरुद्ध, पाश्चिमात्य देशात; 'Blue Family' (ब्ल्यू फॅमिली) अथवा 'Blue Blood' (ब्ल्यू ब्लड) अशी रंगाधारित संबोधने, राजकुल आणि राजा अथवा राणीच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वापरली जातात. इस्राईल या देशाच्या ध्वजावर, पांढऱ्या पार्श्वभूमीवर निळ्या रंगाच्या दोन पट्ट्या आणि स्टार ऑफ डेव्हिडचे चिह्न, निळ्या रंगात असते., ज्युडाइझम किंवा सेमिटीझम अर्थात, यहुदी-ज्यू धर्मबांधवांच्या प्रार्थनेचे वेळी, टॅल्लिट नावाची निळी शाल खांद्यावरून घेण्याची साधारण दोन हजार वर्षांपासून परंपरा आहे. या शालीच्या निळ्या रंगाचे रूपक या ध्वजाच्या रंगासाठी वापरले गेले. या रंगछटेला 'Yel Blue' (येल ब्ल्यू) असे नाव आहे. मात्र, या निळ्या रंगाच्या छटेबद्दल ज्यू बांधव फार आग्रही नसल्याने निळ्याच्या अनेक छटा या ध्वजावर अंकित झालेल्या दिसतात.

 

विसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात विकसित आणि प्रगत झालेल्या माहिती-तंत्रज्ञान या विषयाची एक वेगळी भाषा आहे त्याला HTML म्हणजे Hyper Text Markup Language असे म्हटले जाते. या HTMLची आपल्या रंगासंदर्भात असलेली मांडणी पाहणे महत्त्वाचे आहे. मोबाईल हँडसेट आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या रंगीत प्रतिमा, Red - Green - Blue Lightचा...म्हणजे लाल-हिरव्या-निळ्या किरणांचा योग्य वापर करून तयार केल्या जातात. यालाच 'RGB' असे संबोधन वापरले जाते. 'Hexadecimal notation' म्हणजेच 'HEX हे HTML' च्या या तीन रंगांचे प्रमाण आहे. या प्रमाणानुसार या तीनपैकी प्रत्येक रंगांचा प्रभाव कमी अथवा जास्त करता येतो. याच तंत्रज्ञानाने, मोबाईल हँडसेट आणि कॉम्पुटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या रंगांच्या १६० लाख छटा बनवता येतात. अगणित रंगछटांचे हे वैविध्य आणि तंत्रज्ञानाची प्रगती आपल्याला अचंबित करते. लाल, केशरी आणि पिवळा हे रंग दर्शकाच्या भावनाशील संवेदनांच्या जवळ असतात. या उलट, निळा रंग दर्शकाच्या वास्तवाच्या जाणीवा आणि प्रज्ञा आणि बुद्धीच्या संवेदनांच्या जवळचा असतो. कौशल्य, स्थिरता, गांभीर्य, सखोलता या मर्दानी गुणवत्ता, नवे तंत्रज्ञान आणि त्याची अचूकता, हे सर्व निळ्या रंगाच्या वापरने दर्शवले जाते. मर्दानी रंग म्हणून निळा जगभरात स्वीकृत आहे याउलट गुलाबी रंगाच्या नाजूक छटा नेहमीच स्त्रीत्वाचे प्रतीक मानल्या गेल्या. खूप विशाल उद्योग आणि व्यवसाय, अनेक समाजाभिमुख कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था या सर्वांनी आपल्या ध्वज आणि परिचय चिह्नासाठी आग्रहाने निळ्या रंगाचा वापर केलेला दिसतो. बोईंग - hp - इंटेल - फोर्ड - फॉक्सवॅगन - BMW - DELL - फेसबुकचा F - सॅमसंग - सिमेन्स - फिलिप्स आणि IBM या सर्व आंतरराष्ट्रीय उद्योगांचे मूळ लोगो निळ्या रंगात आहेत. NASA, NATO, UN, UNESCO, UNICEF, Council of Europe, European Union अशा संघटना आणि इंग्लंड - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया या देशांच्या ध्वजाचा प्रमुख रंग निळा आहे.

 

लाल + निळा + पिवळा + हिरवा अशा सर्व रंगाचा वापर अनेक लोगोमध्ये केलेला दिसतो. असे लोगो फार यशस्वी झालेले दिसतात. यातील प्रत्येक रंगाचा संतुलित वापर कसा केला आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे. हेच रंगांचे दृश्य स्वरूपातील चिह्नसंकेत आहेत. 'ऑलिम्पिक चिह्न', 'गुगल', ' NCB', 'मायक्रोसॉफ्ट' असे काही खूप यशस्वी लोगो आपल्याला नित्यनेमाने दर्शन देतात. निळ्या रंगाचे हे कौतुक होत असले तरी, एक गंमतीशीर सत्य जाणून घ्यायला हवेच असे आहे. निळा रंग भूक कमी करतो, असा काही कसोट्यांवर सिद्ध झालेला वैज्ञानिकांचा अनुभव आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या वेष्टनांवर, निळा रंग चुकूनसुद्धा वापरला जात नसतो. राशिचक्रातील तूळ आणि धनु या दोन राशींचा रंग निळा आहे. याबरोबरच शनि, गुरु, शुक्र हे ग्रह आणि चंद्राचे, निळा रंग हे तात्त्विक रूपक चिह्न आहे. दुर्बिणीतून निरीक्षण करताना आपल्या डोळ्यांना हे ग्रह निळे दिसतीलच असे मात्र नाही. निळ्या रंगाच्या निव्वळ दर्शनाने, आपल्या मनात आपसूक काही जाणीव - भावना निर्माण होतात. याची आर्द्रता आणि पारदर्शकता या प्रथम निर्माण होणाऱ्या दोन महत्त्वाच्या जाणिवा, वस्तुनिष्ठ अथवा हेतुपूर्वक, वास्तव विचार करताना या रंगाचे एक खास व्यक्तिमत्त्व आहे. मनावरचे एखादे दडपण बाजूला सारून, स्वतःच तणावमुक्त होणे, या रंगाच्या सान्निध्यामुळे काही व्यक्तींना अनुभवता येते. मात्र, काही व्यक्तींना उदास आणि खिन्न अशा भावना निर्माण करणारा हा रंग, एकाचवेळी शांत आणि संयम अशाही भावना देणारा आहे. राजनिष्ठा, चातुर्य, सत्य, प्रामाणिकपणा, आत्मसन्मान, आत्मगौरव आणि भव्यता अशा सर्व भावना या रंग निर्माण करतात. याउलट व्यक्तिनिष्ठ गृहीतकांचा म्हणजेच व्यक्तीच्या समजुतीचा अनुभव वेगळाच आहे. अनेक व्यक्ती या रंगामुळे खिन्न-उदास-भीतीग्रस्त होतात आणि अनेकांना एकांत हवासा वाटतो.

 

काही प्राचीन आणि काही आधुनिक संस्कृतीतील समाज जीवनात निळ्या रंगाच्या उपयोगाचे विविध संदर्भ आणि अर्थ पाहायला मिळतात. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये आराध्य देव-देवता आणि राजे-राण्या यांच्या चित्रांमध्ये त्यांना निळे पंख आणि निळ्या रंगाच्या दाढ्या रंगवलेल्या असत. एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटनमध्ये निळा रंग अधिकारदर्शक मानला गेला आणि पोलीसदलाचा गणवेश निळ्या रंगाचा झाला. ब्रिटिश पारंपरिक विवाह समारंभात, वधूने तिच्या परिधानात छोट्या स्वरूपात निळ्या रंगाचा वापर करण्याची परंपरा आजही पाळली जाते. ख्रिस्ती धर्मसंकेतानुसार, येशू ख्रिस्ताची आई मेरी, नेहमी निळ्या रंगात रंगवली जाते. याउलट प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन देवांच्या प्रतिमा निळ्या वर्णामध्ये चित्रित केल्या जातात. इंग्लिश भाषेतील 'ब्ल्यू जोक' किंवा 'ब्ल्यू फिल्म' या दोन संज्ञा मात्र अश्लीलता सूचित करतात. निळ्या रंगांच्या अनेक छटांच्या वापरामुळे विविध अर्थ आणि संदर्भ सूचित केले जातात अथवा अनेक संवेदनांसाठी वापरले जातात. अ‍ॅक्वा आणि अ‍ॅक्वामरीन ही छटा पाण्यासाठी, तर नेव्ही ही छटा सागरी सैनिकांसाठी, अझूर आणि सेरुलिअन या आकाशासाठी, कोबाल्ट ही छटा एका धातूसाठी, तर पर्शियन आणि इजिप्शियन या छटा प्राचीन संस्कृतींचा परिचय देतात. टरक्वाईज, फिरोजा आणि सफायर या मौल्यवान खड्यांच्या छटा आहेत. अल्ट्रामरिन, स्टील ब्ल्यू, पावडर ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू, इंडिगो आणि रेझोल्युशन ब्ल्यू अशा निळ्या रंगाच्या अन्य छटा अनेक कारणांनी व्यवहारात वापरल्या जातात. भव्य आकाशाच्या रूपाने हा प्रभावी, आश्वासक निळा रंग आपल्या दैनंदिन जीवनात कायमचा भरून राहिलेला असतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@