चेन्नई : ‘फनी’ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या १२ तासांत ‘फनी’ चक्रीवादळ भीषण रूप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबाच्या क्षेत्रामुळे ‘फनी’ हे वादळ निर्माण झाले आहे. हे वादळ ३० एप्रिलला सायंकाळी तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर तसेच, आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकू शकते. हे वादळ भीषण रूप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळाबाबत भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली आहे. "फनी चक्रीवादळ पुढच्या काही काळात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहोचेल. किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी हे चक्रीवादळ परत फिरण्याचीही शक्यता आहे. सध्या आम्ही या वादळाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत," असे ते म्हणाले.
या वादळामुळे २९ आणि ३० एप्रिलला केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३० एप्रिल आणि १ मे रोजी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून या भागातील मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat