भारत हा फुलपाखरांच्या जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. जगाच्या तुलनेत भारताच्या दोन टक्के भूभागावर तब्बल ११ टक्यांपेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळत असून त्यांची संख्या १५०० एवढी आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये सुमारे २८५ प्रजातींच्या फुलपाखरांचा वावर आहे. फुलपाखरू हा कीटक इतका छोटा आहे की, ‘अलेक्झांड्रा बर्डिवग’ (२५० मिमी) हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा जीव, तर ‘ग्रास ज्वेल’ (१४ मिमी) हे सर्वात छोटे फुलपाखरू आहे. देशातील दोन ठिकाणं फुलपाखरांच्या वैविध्याच्या दृष्टीने गर्भश्रीमंत आहेत. एक म्हणजे हिमालय-उत्तर पूर्वेकडील राज्ये आणि दुसरे म्हणजे सुमारे १ हजार, ६०० किमी विस्तृत लांबीचा पश्चिम घाट. केवळ पश्चिम घाटात फुलपाखरांच्या ३३४ इतक्या प्रजाती अढळतात. विशेष म्हणजे त्यातील ११ प्रजाती फक्त पश्चिम घाटामध्ये सापडतात. या घाटांमध्ये आढळणारी फुलपाखरे सह्याद्रीत काही ठिकाणी दिसतात. यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि त्याचा आसपासचा परिसर. राज्यात फुलपाखरांचा वावरदेखील जंगलांच्या पद्धतीनुसार बदलता आहे. उदाहरणार्थ, आंबोलीच्या सदाहरित जंगलांमध्ये ‘सदर्न बर्डिवग’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरु आढळते. मात्र, ते इतरत्र कुठे दिसणार नाही. तसेच विदर्भातील रखरखीत जंगलात ‘क्रिमसन टिप,’ ‘लिटील ऑरेंज टिप,’ ‘स्पॉटेड पीआरओ’ ही फुलपाखरे दिसतील.
फुलपाखरांचे जीवन
फुलपाखरांचे जीवनचक्र अंडी, अळी, कोश आणि प्रौढत्व या स्वरूपाचे असते. नर हा आयुष्यात दोन ते चार वेळा समागमाची प्रक्रिया करतो, तर मादी तिच्या आयुष्यात एकदाच विणीवर येते. कोशातून बाहेर पडलेल्या मादीच्या पोटात अंड्यांचे अस्तिव असते. मात्र, ती परिपक्व झालेली नसतात. तिने नराशी समागम केल्यानंतर अंडी फलित होतात. त्यानंतर मादी अंड्यांना पानावर सोडते. अंड्यावर चिकट स्त्राव असल्याने ती पानावर चिकटून राहतात. काही माद्या एकच अंडं घालतात, तर काही अनेक. शिवाय ही अंडी वेगवेगळ्या झाडांवरदेखील घातली जातात. फुलपाखरांमध्ये ‘पालकत्व’ हा प्रकार नाही. त्यामुळे अंड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही निसर्गावरच असते. अंड्यांच्या आत अळी विकसित झाल्यानंतर ती अंड्याचे पुढील आवरण फोडून बाहेर पडते. कोशात जाण्यापूर्वी अळी योग्य सुरक्षित जागेचा ठावठिकाणा घेते. रेशमाचे धागे विणून ती जागा सुरक्षित करून घेते. पतंगाइतके रेशीम फुलपाखरांकडे नसते. कोशातून फुलपाखरू बाहेर पडण्याची प्रक्रिया साधारण पहाटेच्या वेळी होते. कोशातून बाहेर पडल्यानंतर साधारण १२ ते १५ दिवसांमध्ये त्याचे नवीन अवयव विकसित होतात. फुलपाखराचे आयुष्य हे किमान दोन आठवड्यांपासून जास्तीत जास्त सुमारे दोन महिने असते.
फुलपाखरे का महत्त्वाची ?
फुलपाखरांच्या अळ्या या अनेक पक्ष्यांच्या खाद्य असतात. विणीच्या हंगामातील पक्ष्यांना प्रथिनयुक्त अन्नाची गरज असते. त्यामुळे अळी या अन्नाची गरज भागवते. फुलपाखरांचा दुसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे परागीभवन. फुलपाखराला जगण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. अगदी मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेपासून ते रुईच्या विषारी चिकापर्यंत विविध घटकांचा वापर फुलपाखरे करतात.
सूचना कुठे नोंदवाल ?
फुलपाखरांच्या मराठी नावांची संभाव्य यादी मंडळाच्या http://maharashtrabiodiversityboard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर गेल्यास 'Research and Documentation' मध्ये जाऊन 'Download' वर क्लिक केल्यास ही यादी आपल्याला दिसेल. या यादीतील नावांवर आपले विचार-सूचना msbbpune@gmail.com या ई-मेलवर ११ मे, २०१९ पर्यंत पाठवाव्यात. एखाद्या फुलपाखराला सुचवलेल्या नावापेक्षा वेगळे नाव आपल्याला सुचवायचे असल्यास, त्या नावाचादेखील विचार करण्यात येणार आहे.