जशी मनं, तशी घरं...

    15-Apr-2019
Total Views | 79



खरंच कळेल का कधी लोकांना की, घर कधी ५० हजारांचे नसते किंवा कोट्यवधींचे नसते, ते असते माणसांच्या मनातले घर, तिथे राहणार्‍या माणसांचे घर, थकलेल्या, भागलेल्या मनाला विश्राम देणारे घर, आकाशात भरारी घेऊ पाहणार्‍या मनाला पंख देणारे घर.

 

घरात आईचं मुलांवरचं निर्व्याज प्रेम, मुलांच्या आपल्या आईवडिलांच्या आनंदासाठी केलेल्या प्रेमळ गोष्टी, पतीपत्नींमधील एकरूपता, मुलांच्या संवर्धनासाठी प्रेम आणि नैतिकता या दोन गोष्टींची सुंदर सांगड घालणार्‍या कुटुंबांचे संस्कार घराच्या एकूणच वातावरणातून प्रतिबिंबित होतात. त्या घरात सुंदर देवघर आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करताना चराचराचे अस्तित्व मान्य करण्याची प्रेरणा मिळते. खूप जुनाट वाटलं तरी वाडवडिलांच्या स्मृती जपत पिढीजात सुसंस्कृतीचा वारसा चालविणारा विचारांचा प्रवाह हा घरात तरुण पिढीला वाम मार्गाला लागण्यापासून वाचवितो. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हौशीची, आवडी-निवडींची बेरीज-वजाबाकी करत सगळ्यांना आनंदाच्या मधुर स्वरात गुंतविण्याचे कामसुद्धा अशाच घरात होत राहते.

 

ज्या घरात उठल्या उठल्या शिवराळ भाषेचा मारा होतो, एकमेकांबद्दल शब्दाशब्दांत दुःखासपाखडले जाते, ‘तुझा पुरा सत्यानाश होईल’ असे शिव्याशाप एकमेकांना दिले जातात, मुद्दामच घरातल्या इतरांना त्रास होईल, अशा गोष्टी दुष्टपणाने केल्या जातात, त्या घरात माणसांचे चेहरे-मोहरे कसे दिसतील? तापलेले, शरमलेले, रागाने पिंजलेले, संतापलेले, अतृप्त या चेहर्‍यांच्या मागची मनेसुद्धा तशीच चिडचिडलेली, धास्तावलेली, दुखावलेली. अशा घरात या नकारात्मक भावनांचा पसरलेला पसारा आपल्याला सहजही दिसू शकतो. तो कसा आवरायचा हे कळतही नाही. प्रत्येकाने सामान स्वत:च्या सोयीनुसार ठेवल्यामुळे घर कसे अस्वच्छ, विस्कळीत दिसू लागते! जशी मनाची लय आणि रंगसंगती बिघडली तशी घराची सुसंगती बिघडली. मग त्या घरात स्वतःला त्रास होऊ न देण्याच्या प्रयत्नात आत्मकेंद्रित माणसं दिसू लागतात. दुसर्‍याचे भले चिंतता येत नाही. किंबहुना, दुसर्‍याला सांगण्यात काही अर्थच नाही. म्हणून एकमेकांपासून दूर गेलेली माणसे आपल्याला दिसू लागतात. या माणसांत बसल्या बसल्याच जाणवते की आपण कुठल्या विचित्र जागेत बसलो आहोत. आपण कोणाशी रामाची भाषा बोलतोय, तर कोणाच्या तोंडी रावणाची भाषा ऐकू येते आहे. केवळ एकमेकांना विरोध करायचा म्हणून ही माणसे तोंड उघडतात आणि आपल्यासारख्या पाहुण्यांचे तोंड बंद व्हायची पाळी येते. शब्दसूरांची पूर्ण लय भंगलेली जाणवते. प्रत्येक क्षण भेसूर आणि बेसूर झाल्याचे जाणवते. केव्हा एकदा आपण तेथून पळ काढतो आणि या भयानक वातावरणातून केव्हा सुटका करून घेतो, असे आपल्याला वाटते.

 

अशा विसंगत, भांडकुदळ मंडळींच्या घरात लहान मुलांचा, तरुणांचा आणि वृद्धांचा जो भावनिक कोंडमारा होतो त्याबद्दल काय बोलणार! दिवस कसाबसा शाळा आणि क्लासेसमध्ये जाईल. घरी संध्याकाळी परतायचे, तर या मुलींचे पाय घराकडे वळत नसत. एके दिवशी छोटीने मोठ्या बहिणीला सांगितले की, तिला घरी जायचेच नाही. ती दुसर्‍या दिशेने चालू लागली. बहिणीने घाईघाईने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. ती जीवाच्या आकांताने सुसाट पळत सुटली. पदपथावरून रस्त्यावर भरकटत गेली आणि अचानक ती एका लॉरीच्या खाली आली, ती घराकडे परत न जाण्यासाठी. अशा घरांचे करायचे काय? तिथल्या भिंती कशा भांडणार्‍या, तोडणार्‍या, मारणार्‍या. जगायचे कसे कोणी तिथे? तेथील माणसांना ना त्या भिंतींच्या अस्तित्वाची जाणीव, ना स्वत:च्या विद्ध होत जाणार्‍या जीवनाची खंत. खरंच कळेल का कधी लोकांना की, घर कधी ५० हजारांचे नसते किंवा कोट्यवधींचे नसते, ते असते माणसांच्या मनातले घर, तिथे राहणार्‍या माणसांचे घर, थकलेल्या, भागलेल्या मनाला विश्राम देणारे घर, आकाशात भरारी घेऊ पाहणार्‍या मनाला पंख देणारे घर. ते असते या जगात वटवृक्षासारखे विस्तारू पाहणार्‍या मनात रूजणार्‍या भावनिक मुळांसाठी संपन्न जमीन देणारे घर, जीवनातल्या जखमांनी विद्ध होणार्‍या मनाला चंदनी लेप देणारे घर...

- डॉ. शुभांगी पारकर 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
बलुच आर्मी आक्रमक! पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्याची माहिती

बलुच आर्मी आक्रमक! पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्याची माहिती

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील बंडखोरांनीसुद्धा पाकिस्तानी सैन्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केलीय. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ताब्यात घेतल्याची माहिती उघडकीस येत आहे. बीएलए आर्मीने असा दावा केला की, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. सध्या पाकिस्तानी सैन्याने शहराच्या अनेक भागांतील नियंत्रण गमावले असून बीएलएने गॅस पाइपलाइन उडवल्याचा दावा केला आहे. Baluchista..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121