भारत-पाक दरम्यानच्या या युद्धसदृश परिस्थितीनंतर एक लोकशाही देश म्हणून आपल्याला या सर्वांपासून काही शिकले पाहिजे व या सर्वांचे काय परिणाम होतात, याकडे नजर ठेवली पाहिजे.
भारत आणि पाकिस्तान या दक्षिण आशियातील दोन शेजारी राष्ट्रांत गेला आठवडाभर युद्धाचे वातावरण आहे. अजून तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. २६ फेब्रुवारीच्या रात्री भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद या कुविख्यात दहशतवादी गटाचे ठाणे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावग्रस्त झालेले आहे. भारत त्याच्या परंपरेनुसार कधी शेजारच्या राष्ट्राची आगळीक करत नाही. पाकिस्तान काय किंवा चीन काय, या ना त्या प्रकारे भारताला त्रास देण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. यातील सर्वात जुना मार्ग म्हणजे भारताशी शत्रुत्व असलेल्या इस्लामी दहशतवादी गटांना स्वत:च्या भूमीत आश्रय देणे, त्यांना शस्त्रास्त्रांची व इतर सर्व प्रकारची मदत करणे. याच जैश-ए-मोहम्मदने २००८ साली मुंबईवर कसाब व त्याच्या साथीदारांच्या साथीने हल्ला केला होता. तसे पाहिले तर शेवटचे भारत-पाक युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले होते, ज्यात बांगलादेश या स्वतंत्र, सार्वभौम देशाचा जन्म झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानने भारताला त्रस्त करण्यासाठी इस्लामी दहशतवादी गटांना हाताशी धरले आहे. मागच्या महिन्यात भारतीय निमलष्करी जवानांच्या काफिल्यावर याच जैश-ए-मोहम्मदने बॉम्बस्फोट केले होते. तेव्हापासून मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारत याचा 'मूंह तोड जवाब' देईल याची अटकळ होतीच. त्यानुसार भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीच्या रात्री हल्ला केला. नंतर मात्र यातून वेगळेच नाट्य बाहेर येऊ लागले. पण, अजूनही ते पूर्णपणे बाहेर आलेले नाही. एक लोकशाही देश म्हणून आपल्याला या सर्वांपासून काही शिकले पाहिजे व या सर्वांचे काय परिणाम होत आहेत याकडे नजर ठेवली पाहिजे.यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या घटनेचे जागतिक परिणाम.
आजच्या काळात फक्त लष्करी सामर्थ्य असून भागत नाही, तर जगात तुमच्या देशाची प्रतिमा उजळ पाहिजे. जे पाकिस्तानी विमान 'एफ१६' भारतीय हवाई दलाने पाडले ते अमेरिकेने पाकिस्तानला विकले होते. जेव्हा अमेरिकेने हे अत्याधुनिक विमान पाकिस्तानला विकले होते तेव्हा एक महत्त्वाची अट घातली होती की, 'ही अत्याधुनिक विमानं फक्त दहशतवादाचा सामना करण्यासाठीच वापरली जातील.' ही अट पाकिस्तानने मान्य केली होती. पण, जेव्हा वेळ आली तेव्हा पाकिस्तानने ही विमानं भारताविरुद्ध वापरली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने सुरूवातीला 'एफ १६' वापरल्याच्या आरोपाचा साफ इन्कार केला होता. पण, जेव्हा भारताने पाडलेल्या 'एफ १६'चे अवशेष पुरावे म्हणून सादर केले तेव्हा पाकिस्तानचा नाईलाज झाला. ताज्या बातमीनुसार, आता अमेरिका पाकिस्तानकडे याबद्दल खुलासा मागत आहे. यामुळे पाकिस्तानची अधिकच कोंडी झाली आहे. पाकिस्तानचे 'एफ १६' विमान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाडले. यात त्यांचेही विमान कोसळले व ते पॅराशूटच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले होते. पाकिस्तानने नंतर त्यांची विनाअट सुटका केली. या घटनेचा फायदा उचलण्यासाठी पाकिस्तानच्या लोकसभेने पंतप्रधान इमरान खान यांच्या नावाची शिफारस शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी करावी असा ठराव केला होता. भारतीय वैमानिकाची सुटका करण्याचा निर्णय घेऊन इमरान खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. अशा तणावाच्या प्रसंगी ते जबाबदारीने वागले, त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी करावी, असे ठरावात म्हटले आहे. हा तर मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणावा लागेल.आता दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे, अशा प्रसंगी त्या त्या देशांतील जनता कशी वागते हा. वर उल्लेख केल्याप्रमाणे २६ फेबु्रवारीच्या सकाळी भारत आणि पाकिस्तानची विमानं समोरासमोर आली. यात आपले एक विमान पडले आणि पाकिस्तानचेसुद्धा एक विमान पडले.
दोन्ही विमानांतील वैमानिक पॅराशूटच्या मदतीने सुखरूप खाली उतरले होते. मात्र, दोघांच्या नशिबांत शेवट वेगळा होता. पाकिस्तानने ताब्यात घेतलेले वैमानिक अभिनंदन सुखरूप मायदेशी परतले, तर पाकिस्तानी वैमानिकाला मृत्यूला सामोरे जावे लागले. पाकिस्तानी वैमानिक पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरुनही त्याला स्थानिकांनी बेदम मारहाण केली. यात त्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. पाकिस्तानी वैमानिक शहाजुद्दीन 'एफ १६' विमान उडवत होते. तेव्हा भारतीय वैमानिक अभिनंदनने त्यांच्या विमानाचा वेध घेतला. परिणामी, शहाजुद्दीन यांना पॅराशूटच्या मदतीने खाली उतरावे लागले. पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून हा देश भारताचा द्वेष करत आला आहे. भारताचा नायनाट करणे हेच जणू या देशाचे अवतारकार्य. ''हिंदू व मुसलमान या दोन संस्कृती आहे, दोन वेगवेगळे देश आहेत,” म्हणत जिनासाहेबांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. ही मागणी मुस्लीम लिगने मार्च १९४० मध्ये केली होती. स्वत: जिनासाहेब जरी धर्मांध नव्हते तरी, त्यांनी धर्माधिष्ठित राजकारण केले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर ही धर्मांधता कमी होईल, अशी अपेक्षा होती आणि ती कदाचित पूर्ण झालीसुद्धा असती. पण, दुर्दैवाने जिनासाहेब अवघ्या १३ महिन्यांत (सप्टेंबर १९४८) पैंगबरवासी झाले. तेव्हापासून पाकिस्तानातील धर्मांधता कमी होण्याऐवजी वाढतच गेली. भारत-पाकिस्तान मैत्रीची स्वप्नं बघणार्यांनी ही वस्तुस्थिती डोळ्यांसमोर ठेवावी. शिवाय काश्मीरवरून जर एवढ्या मारामाऱ्या होत असतील, तर काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा अशा सूचना करणार्यांच्या अक्कलेची कीव करावी तेवढी थोडी.
भारताचा द्वेष रोमारोमात भरलेल्या पाकिस्तानला काश्मीर देऊनही त्याची शांती होणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे, भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद. हा वाद दोन देशांतील नसून दोन संस्कृतीतील आहे आणि हा वाद सहजासहजी संपणारा नाही. जसा इस्रायल व अरेबियन यांच्यातला वाद दोन संस्कृतीतील आहे, तसाच भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद आहे. या वादात जास्त महत्त्वाचा व व्यवहाराचा मुद्दा गुंतला आहे व तो म्हणजे बदनामीचा. या प्रकरणात पाकिस्तानपेक्षा अमेरिकेची जास्त बदनामी झाली. हा मुद्दा व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. जगातील अनेक देशांत शस्त्रास्त्रांचे कारखाने खाजगी मालकीचे आहेत. यात अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड वगैरे देश आघाडीवर आहेत. इतर कोणत्याही धंद्यासारखाच हा धंदा आहे, ज्यात 'नफा' अतिशय महत्त्वाचा असतो. नफा मिळवण्यासाठी तयार झालेला माल (म्हणजे बंदुका, तोफा, दारूगोळा वगैरे) विकावा लागतो. हा माल तिसऱ्या जगातील गरीब देश विकत घेतात. इतर व्यावसायिक जगतात जशी व्यापारी स्पर्धा असते तशीच शस्त्रास्त्रांच्या व्यापारातही असते. अमेरिकेची 'एफ १६' ही विमानं अतिशय महाग असतात व शत्रूला नमवण्यासही अतिशय प्रभावी असतात. मात्र, आता भारताच्या एका शूर वैमानिकाने अभिनंदनने एक 'एफ १६' विमान पाडून दाखवले. याचा अर्थ आता अमेरिकेच्या या प्रतिष्ठित विमानांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. हे अमेरिकेला सहन होण्यासारखे नाही. यात अमेरिकन मालाची प्रतिष्ठा दडलेली आहे. असाच प्रकार १९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धादरम्यान झाला होता. त्याकाळी अमेरिकेने बनवलेल्या 'पॅटन' रणगाड्यांचा फार बोलबोला होता. पाकिस्तानने गाजावाजा करत हे रणगाडे विकत घेतले होते. पण, १९६५च्या युद्धात भारतीय सैनिकांनी 'पॅटन' रणगाड्यांना न घाबरता पाकिस्तानी सैन्याला मात दिली होती. यात पाकिस्तानपेक्षा अमेरिकेच्या 'पॅटन' रणगाड्यांची बदनामी जास्त झाली होती. अभिनंदन या शूर भारतीय वैमानिकामुळे जर 'एफ १६' विमानांची मागणी कमी झाली, तर आश्चर्य वाटायला नको. युद्धात बाजार असतो, नफा असतो, तो असा. युद्ध जवळपास संपले. आता कवित्व सुरू झालेले आहे, एवढेच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat