सुप्रजा भाग-८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



नऊ महिन्यात गर्भाच्या होणाऱ्या एकूणच वाढीची माहिती आपण मागील लेखांतून जाणून घेतली. स्त्री शरीरात गर्भ वाढतेवेळी त्या स्त्रीच्या म्हणजेच, गर्भवतीच्याही शरीरात बदल घडत जातात. हे बदल केवळ शारीरिक नसून मानसिक आणि भावनिकही होत असतात. या सगळ्या बदलांबद्दल आजच्या लेखांत जाणून घेऊया.


गर्भधारणा झाली आहे, हे प्रथमत: त्या स्त्रीलाच कळते. बहुतांशी वेळेस नियमित येणारी पाळी (मासिक रज:स्राव) चुकली की, गर्भधारणा राहिली असल्याचा तपास केला जातो. रक्त तपासणी व मूत्र तपासणीतून गर्भधारणा राहिल्याची खात्री मग करून घेतली जाते. हाच पहिला बदल. बाल्यावस्थेतून कुमारीअवस्था झाल्यावर मासिक रजःस्राव सुरू होतो. नियमित चाललेले चक्र गर्भधारणा झाली की थांबते. याचे कारण म्हणजे शरीरातील विविध अंत:स्रावींच्या स्रावांमध्ये होणारा बदल (Harmonic changes) या अवस्थेत 'oestrogen' व ' progesterone' ची पातळी वाढते. संपूर्ण गर्भिणी अवस्था असेपर्यंत हे वाढलेले राहते. गर्भ हा स्त्री शरीरासाठी सुरुवातीस 'Foreign object' असतो. त्याला शरीरामध्ये ठेवावे का काढावे, हे त्या गर्भिणीच्या शरीराला कळत नाही. ते शरीराबाहेर काढण्याचा प्रयत्न नैसर्गिकरीत्या स्त्रीशरीर करत असते. सुरुवातीस होणाऱ्या उलट्या, क्वचित प्रसंगी जुलाब, मळमळ इ. ही त्याचीच लक्षणे आहेत. या लक्षणांबरोबर भूक मंदावणे, अन्नाची इच्छा न होणे इ. घडू शकते. पण, चौथ्या-सहाव्या आठवड्यांपर्यंत ही वरील लक्षणे शमतात, कमी होतात. या कालावधीपर्यंत मळमळ-उलटी-भूक न लागणे इ. लक्षणांसाठी औषधोपचार करू नयेत. पण, खूप अधिक प्रमाणात जर ही लक्षणे उत्पन्न झाली, तर मात्र वैद्यांच्या सल्ल्याने औषधी चिकित्सा घ्यावी.

 

गर्भाची वाढ खूप झपाट्याने होत असते. प्राकृत गर्भाशयाचा आकार हा आपल्या बंद मुठीइतका असतो. गर्भ राहिल्यावर, गर्भाच्या सहाव्या आठवड्यात, स्त्री गर्भाशय वाढून कोंबडीच्या अंड्याइतके होते. जसजसा गर्भाचा आकार वाढत जातो, तसतसा गर्भाशयाचा आकारही वाढतो. गर्भाशयात लवचिकता खूप असते. तसेच त्याच्या भिंती (Walls) ही खूप मजबूत असतात. आठव्या आठवड्यापर्यंत गर्भाशयाचा आकार वाढून क्रिकेटच्या चेंडू इतका होतो आणि बाराव्या आठवड्यात गर्भाच्या डोक्याइतके होते. (जन्मत: गर्भाचे शीर जितके असेल तितके होते) गर्भाशयाचा केवळ आकार वाढत नाही, तर त्याचबरोबर आकृतीही बदलते. (Shape and Size Increases) गर्भाशयाचा आकार आधी वर गोलाकार आणि खाली निमुळता असतो. (pyriform shape) तो पुढे पुढे संपूर्ण गोलाकार (globular) होतो. त्याच्या भित्तीही ताणल्यासारख्या होतात. गर्भाशयाचा जसा आकार वाढतो, तसा त्याचा दाब अन्य अवयवांवर पडतो. गर्भाशयाच्या पुढील बाजूस मूत्राशय आणि मागील बाजूस मलाशय असते. गर्भाशयाचा आकार वाढल्यावर या इतर दोन्ही आशयांवर, अवयवांवर दाब पडतो. सहाव्या ते आठव्या आठवड्यात मूत्रप्रवृत्तीचे प्रमाण वाढते. यात थोडी थोडी मूत्रप्रवृत्ती थोड्या थोड्या कालावधीने होते. गर्भाशयावरील गोलाकार भाग वाढून मूत्राशय (urinary bladder)च्या वरील भागावर (Fundal Part) दाब पडतो. यासाठी काहीही औषधी चिकित्सा लागत नाही. पण, याच लक्षणांबरोबर योनी भागात खाज, जळजळ किंवा बारीक ताप ही लक्षणे असली, तर मात्र वैद्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. याच कालावधीमध्ये थोडा चिकट स्राव योनीमार्गातून होऊ शकतो. पण, तो एखादाच आठवडा होतो आणि नंतर थांबतो. हे स्वाभाविक आहे. सहाव्या ते आठव्या महिन्यात स्तनांमध्ये जडत्व येते. स्तनं भरल्यासारखी वाटतात. त्यात थोडे स्फुरणही होते. ही सर्व लक्षणे गर्भाच्या वाढीसाठी स्त्रीशरीरात होत असतात. काही बदल पहिल्या तीन महिन्यांपुरतेच असतात, तर काही नऊ महिने. काही शारीरिक-मानसिक-भावनिक बदल हे कायमस्वरूपी असतात.

 

मळमळ-उलटी, भूक मंदावणे इ. लक्षणामुळे गर्भिणीला थकवा जाणवतो. मरगळ जाणवते. काही वेळेस वजनही कमी होते. गर्भिणीतले हे सर्वसाधारण शारीरिक बदल आहेत, जे पहिल्या तीन महिन्यांमध्ये (first trimester) घडतात. याचबरोबर मानसिक व भावनिक बदलही होतात. बऱ्याचदा मूल होणं, गर्भ राहणं ही आनंदाची बाब असते. ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात, तो मातृत्वाचा क्षण (जरी ९ महिन्यांवर असला तरी) दारात येऊन थोपलेला असतो. याचा आनंद होतोच, पण शारीरिक बदलांमुळे गळून गेेलेल्या स्त्रीला कुठेतरी थोडी भीतीही वाटू लागते. सगळं नीट होईल ना? हा त्रास नऊ महिने असाच राहील का? शारीरिक बदल, आकारातील वाढ परत पहिल्यासारखी होईल का? इत्यादी इत्यादी. याच्याच जोडीला आर्थिक बाजूचाही विचार घोळू लागतो. विविध तपासण्या, डॉक्टर, औषधोपचार यात होणारा पैशाचा आणि वेळेचा खर्च या सगळ्या गोष्टींमुळे गर्भिणीला थोडा मानसिक ताण येतो आणि हा स्वाभाविक आहे. काही वेळेस पहिले मूल जर मुलगी असेल, तर दुसरे मूल मुलगाच असावा, असा अट्टाहास घरातून होतो. याचाही ताण गर्भिर्णीला येतो. पहिल्या तीन महिन्यात (First trimester) मध्ये hormonal बदलांमुळे, शारीरिक बदलांमुळे स्त्रीचे मन अधिक नाजूक झालेले असते. या हळव्या मनाला कुठलीही गोष्ट लगेच लागते. घाबरणे, चिडचिड, रडणे इ. भावना उफाळून येतात. अशा वेळेस गर्भिणीच्या मनोस्वास्थ्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाळापुरती आईची काळजी घेऊ नये. स्त्रीला स्वत:मध्ये बदल घडवून गर्भाला जन्म द्यायचा असतो. यासाठी तिला कौटुंबिक आधाराची अत्यंत गरज असते.

 

गर्भिणी अवस्था ही रोगावस्था नाही. गर्भ हा रोग नाही. पण, गर्भ म्हणजे प्रत्यक्ष एक नवीन जीव. हीं नवनिर्मितीची क्षमता निसर्गाने केवळ स्त्रीलाच बहाल केली आहे. आपल्या शरीरात हे छोटेसे रोप अंकुरित करून, त्याचे भरणपोषण करून व्यवस्थित बाळ झाल्यावर त्याला जन्माला घालणे हा एक चमत्कारच म्हणावा. शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखेच आहे. सुरक्षित वातावरणामध्ये संपूर्ण गरजा पूर्ण करून गर्भाची वाढ स्त्रीशरीरात होत असते. यासाठी त्या स्त्रीचे आरोग्य उत्तम असणे महत्त्वाचे. तिचे शारीरिक स्वास्थ तर उत्तम असायलाच हवे, पण त्याचबरोबर वरील कारणांमुळे होणारे मूडमधील बदल लक्षात घेऊन तिच्यावर माया-प्रेम करणे अधिक असावे. कुठल्याही बदलांना सामोरे जाताना मन घाबरतं. परीक्षेपूर्वी कशी स्थिती होते, हे सर्वांनी आठवून पाहावे. त्या परीक्षेपेक्षा ही परीक्षा आणि जबाबदारी मोठी आहे. जरी परीक्षा लिहिणारा विद्यार्थी एक असला तरी, त्याच्या आजूबाजूला पूर्ण फौज (शाळा/कॉलेज-क्लास-परिवार-मित्र इ.) सुसज्ज असते. तसचे, गर्भिणीलाही संपूर्ण परिवाराची, सकारात्मक वातावरणाची उत्तम, पौष्टिक आहाराची आणि विश्रांतीची गरज असते. पुढील लेखांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (Second & Third Trimester) मध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेऊया.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@