आपण सारेच खरं म्हणजे रंगभरल्या रंगीत जगात वावरत असतो. रंगांच्या संदर्भातल्या पारंपरिक लोकश्रुती-लोकोक्ती, विशिष्ट रंगांच्या वापराचे हेतू, उद्देश, जगभरातील लोकजीवनातील रंगांचे विविध अर्थ, निसर्गनिर्मित रंग आणि आधुनिक विज्ञानाने झालेले रंगांविषयीचे संशोधन अशा बरसणाऱ्या रंगांच्या असंख्य शाखा व उपशाखा आपल्या समोर उलगडत जातात. यांचा चिह्नसंकेतांच्या माध्यमातून केला जाणारा अभ्यास तर फारच मनोरंजक आहे.
अगदी सहज स्पष्ट होणाऱ्या किंवा कधी जाणीव होऊनसुद्धा अस्पष्ट राहणाऱ्या अशा अनेक मनोभावना, रंगांच्या सान्निध्यात अनुभवाला येतात. एखादा रंग किंवा अनेक रंग एकत्र पाहिल्यानंतर, प्रत्येकाला येणारे असे अनुभव अगदी नैसर्गिक असतात. मात्र, एखादा रंग पाहिल्यानंतर माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या अशा भावना, दोन प्राथमिक कारणांमुळे होत असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या काही अनुवांशिक नैसर्गिक प्रवृत्तींमुळे काही रंग एकच अर्थ आणि मनोभावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करतात. या उलट, रंगांतून निर्माण होणाऱ्या भावना आणि अर्थ, एखाद्या प्रदेशातील प्रचलित संस्कृतीनुसार बदललेला दिसतो. अनेकदा रंगांचे संदर्भ आणि विशिष्ट वापर यामुळे एखादा रंग परस्पर विरोधी भावना आणि अर्थ निर्माण करतो. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या आणि आपल्यावर निश्चित प्रभाव पाडणाऱ्या प्रत्येक सजीव-निर्जीव, प्रत्येक फळ-भाजीपाला, प्रत्येक खनिज, माती आणि पाणी या सर्वांना प्राप्त झालेले रंग नैसर्गिक आहेत. मात्र, कपडे, वाहने, औषधांची वेष्टने अशा मानवनिर्मित रोजच्या वापरातील वस्तूंचे दर्शनी रंग, जाणीवपूर्वक अभ्यासाने निवडलेले आहेत. विविध रंगांच्या दर्शनाने किंवा वापराने निर्माण होणाऱ्या भावना, संवेदना आणि संकल्पना या दोन्हीचा अभ्यास म्हणजेच रंगांच्या चिह्नसंकेतांचा अभ्यास. मात्र, इथे एक भूमिका निश्चितपणे समजून घ्यायला हवी की, हा अभ्यास तात्त्विक स्वरूपाचा आहे. जगातील अनेक नामवंत अभ्यासकांनी रंगांच्या अर्थाच्या संदर्भात भिन्न विचार मांडलेले आहेत.
शरीर विज्ञानाचा विचार करताना, लाल रंग आपले लक्ष सर्वात प्रथम वेधून घेतो म्हणूनच भर रहदारीच्या चौकात धोका दर्शवणारे षट्कोनी फलक, रहदारी नियंत्रक खांबावरचे दिवे, अग्निशमन यंत्रणा आणि टपाल पेट्या नेहमी लाल रंगात रंगवलेल्या असतात. याच वैशिष्ट्यामुळे छापील जाहिरात, जाहिरात फलक आणि इंटरनेटवरील जाहिरातींमध्ये या रंगाचा वापर प्रभावीपणे केला जातो. एकाच वेळी प्रेमाची ऊब, उत्कट भावना, क्रोध, क्रौर्य, सत्ता आणि सामर्थ्य, आवेग, प्रेम, आग, रक्त आणि विद्ध्वांसक युद्ध अशा पराकोटीच्या विरोधी भावना आणि अर्थ सूचित करणारा हा लाल रंग. हाच लाल रंग वैभव, ऐश्वर्य, भव्यता, राजवंश, युद्धातील विजय, सफलता असे संदर्भ सूचित करतानाच हिंसक आणि रोमांचक अशा अन्योक्त तीव्र भावनांचे संकेत देत असतो. अशा लाल रंगामुळे निर्माण होणाऱ्या मनोभावना काही निश्चित असे शारीरिक बदल घडवून आणत असतात. विशिष्ट प्रसंगात, चिंता, काळजी, उत्सुकता वाढल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब वाढतो, कधी नाडीचे ठोकेही जलद होतात. प्रखर, तीव्र व तेजस्वी असा लाल रंग पूर्ण अपारदर्शक आहे. कारण, आपल्या डोळ्यांची संवेदना त्याला प्रथम पूर्ण शोषून घेते. माघ आणि फाल्गुन महिन्यात आपल्याला झाडांची पानगळ झालेली दिसते. अनेक झाडांची पाने गळून पडण्याच्या आधी लाल झालेली दिसतात. निसर्गातील हा रंग वृद्धत्व, शुष्कता आणि कोरडेपणाचे लक्षण आहे. आपल्या मानसिक आणि बौद्धिक संवेदनांमध्ये या लाल रंगामुळे उष्णता, हवेतील उष्मा, आग आणि रक्त याची आठवण होते. याच लाल रंगामुळे आपल्याला ख्रिसमस जवळ आल्याची सूचनाही मिळते आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ला, प्रेमाचे संदेश देण्यासाठी सर्वांची तारांबळसुद्धा हाच लाल रंग उडवतो. वस्तुनिष्ठ विचार करणाऱ्याला, लाल रंगाच्या दर्शनाने एखाद्या आवडत्या व्यक्तीची अथवा आवडीच्या विषयाची वा छंदाची तीव्र, उत्कट ओढ आणि उत्सुकता निर्माण होते. एखाद्या व्यक्तीच्या मनात आवेग, राग, लोभ, क्रोध वा क्रौर्य अशा संवेदना आणि भावना तीव्रतेने निर्माण होतात. या झाल्या व्यक्तीच्या मनातील भावना. संपूर्ण समाजमनाच्या भावनांचा विचार केला, तर एखाद्या पंथ, धर्म किंवा संघटनेच्या अनुयायांच्या समूहामध्ये, स्वत:चे संघटीत सामर्थ्य, लाल रंगाच्या झेंडा अथवा बावट्यामुळे प्रखरतेने जाणवते. याबरोबरच आरोग्य, उत्साह, लालसा आणि अन्य समूहापासून भीती अशा संवेदना, याच लाल रंगामुळे जागृत होतात.
खगोलशास्त्र आणि फलज्योतिष शास्त्र यांच्या संकेतानुसार, मंगळ या ग्रहाचा आणि राशिचक्रातील वृश्चिक राशीचा रंग लाल आहे. वेदकालिन सिंधू समाज आणि इजिप्शियन समाज अशा अनेक प्राचीन प्रगत संस्कृतींमध्ये अनेक रंगांचे तर्कसंगत भूमितीय आकार निश्चित केले गेले होते. द्विमितीय समभूज चौकोन आणि त्रिमितीय समभूज घन चौकोन ही लाल रंगाची प्रतीके आहेत. याबरोबरच लाल रंगाचे हे वैश्विक भूमितीय चिह्न,भूमीचे आणि जमिनीचेही प्रतीक आहे. तर्कसंगत भूमितीय संकल्पना अशासाठी म्हटले की, आधी उल्लेख केल्यानुसार अपारदर्शकता, उष्णता आणि शुष्कता ही लाल रंगाची वैशिष्ट्ये आहेत आणि भूमी अथवा जमिनीचीसुद्धा नेमकी हीच तीन वैशिष्ट्ये भूगर्भशास्त्रात सांगितली आहेत. काठिण्य आणि निर्मितीची प्रेरणा हे जमिनीचे गुणधर्म, लाल रंगाशी साधर्म्य दाखवतात. वेगवेगळ्या संस्कृतीत, वेगवेगळ्या धर्मात आणि पंथात, वेगवेगळ्या भाषांमध्ये, सर्वच रंग, विविध भिन्न अथवा समानार्थी भावना वा संदर्भ सूचित करतात. एकेकाळच्या कम्युनिस्ट रशियातील मॉस्को या शहरातील ‘लाल चौक’ हे नामाभिधान लाल या रंगावरून आलेले नाही, तर रशियन भाषेतील ‘क्रासनाया’ या ‘सुंदर’ या समानार्थी विशेषणावरून घेतले गेले आहे. रोमन साम्राज्याच्या उत्कर्ष काळात प्रत्येक भव्य राजवाड्यातील भिंती, राज्यकर्त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून लाल रंगाच्या शिल्पांनी सजवलेल्या असत. ख्रिस्ती धर्मबांधवांच्या चर्चमधील लाल रंग, येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताशी नाते सांगतो. कम्युनिस्ट चीनच्या ध्वजावरील लाल हा त्यांचा राष्ट्रीय रंग आहे, चिनी समाजात तो पवित्र मानला जातो. प्राचीन इजिप्तमध्ये लाल रंग, आनंदी जीवन, उत्तम आरोग्य, अदृश्य, अमानवी शक्तीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानला गेला होता.
ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकांत भारतात येऊन गेलेला चिनी तत्त्वज्ञ एका ठिकाणी म्हणतो, “आपण एकवेळ नियम आणि कायदे पाळणार नाही. मात्र, चिह्न आणि त्याचे संकेत मात्र आपण न चुकता पाळत असतो.” अर्थात, हे त्याचे वचन अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेले आहे. एकही शब्द न लिहिता अथवा न बोलता काही भावना आणि संदेश सूचित करण्याचे ‘रंगचिह्न’ हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. रंगांच्या दुनियेत लाल, पिवळा व निळा हे तीन मूलभूत आणि प्राथमिक रंग आहेत. या तीन रंगांच्या मिश्रणानेच दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारचे रंग बनवले जातात. लाल रंगाच्या, अन्य रंगात केलेल्या मिश्रणाने पिंक, स्कार्लेट रेड, रुबी, ब्लड रेड, चेरी रेड, डीप रेड, डार्क रेड, कॅडमिअम, क्रिमसन रेड आणि मरून असे उपरंग निर्माण केले जातात. अशा उपरंगांनासुद्धा वेगवेगळे संकेत आहेत. नवजात बाळाला गुलाबी रंगाच्या दुपट्यात गुंडाळले जाते. ते बाळ म्हणजे छोटी मुलगी आहे असा संकेत लांबून पाहणाऱ्याला निश्चितपणे मिळतो. दुमडलेली गुलाबी रिबन हा स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगाचा लोगो हा जागतिक पातळीवर याविषयात जनजागृती करतो आहे. दोन भिन्न देशात अथवा प्रदेशात एकाच रंगाचे भिन्न अर्थ आणि संदर्भ, काही शतकांपासून लोकश्रुती बनले आहेत. भारत, चीन अशा पौर्वात्य देशात वधू, लग्नाच्या समारंभात लाल रंगाचे वस्त्र परिधान करते. वधूवस्त्राचा हा लाल रंग पवित्र आणि भाग्यदाता आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांत हाच लाल रंग, रक्तवर्णी आहे म्हणून लग्न समारंभात त्याज्य मानला गेला आहे. आजच्या लेखांत या आकर्षक लाल रंगाच्या संकेतांचा परिचय आपण करून घेतला. फाल्गुन महिन्यातील हिंदू वर्षाच्या अखेरचा होलिकोत्सव आणि रंगपंचमीचा सण आपण नुकताच साजरा केला. याच रंगांमुळे आपले जीवन आनंदमय होत असते. हीच रंगगाथा, वाचकांच्या भेटीसाठी आणली आहे...!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat