मनोहरच्या मृत्यूने देशभरातील सुशिक्षित, प्रगल्भ, सामाजिक मूल्यभान असलेल्या लोकांना भारताचे राजकारण बदलण्याची क्षमता असलेल्या एका नेत्याचे अकाली जाणे, हे आपल्या भावविश्वाला पडलेल्या एका ‘मनोहर‘ स्वप्नाची अखेर झाल्यासारखे वाटले. असे निदान नजीकच्या काळात तरी घडलेले नाही. हे मनोहरच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखेपण होते. हे राजकारण बदलू शकते, असा विश्वास त्याने जनमनात निर्माण केला.
मनोहर पर्रिकर यांचा अकाली झालेला मृत्यू हा उभ्या देशाला चटका लावून गेला. वास्तविक पाहाता गोवा हे भारतातलं एक छोटं राज्य. तिथून लोकसभेत दोन खासदार निवडून जात असले, तरी अन्य राज्यांच्या मतदारसंख्येची तुलना केली तर एकही मतदारसंघ गोव्याला मिळाला नसता. केवळ मतदारसंख्येचा विचार केला तर मुंबईचा नगरसेवकही गोव्याच्या आमदारांपेक्षा कितीतरी अधिक मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. मनोहरच्या मागे राजकीय घराणे नव्हते की, त्याला कोणी ‘गॉडफादर‘ नव्हता, हेही काही भारताच्या राजकारणातले अपूर्वाईचे लक्षण नाही. भारतीय लोकशाहीची पाळेमुळे रूजलेली असल्याने देशभरात हाताच्या बोटावर मोजता येतील, अशी काही आणखी उदाहरणे सांगता येतील. एका राजकीय नेत्याचे आयआयटीपद हीही आता अपूर्वाईची बाब राहिलेली नाही. त्याच्यासारख्या साधेपणाने राहणार्या राजकीय नेत्यांचीही अनेक उदाहरणे दाखविता येतील. डाव्या पक्षात तर ती ढिगाने सापडतील. त्याची अखिल भारतीय पातळीवर संरक्षणमंत्री म्हणून काम करण्याची कारकीर्दही अवघ्या सव्वादोन वर्षांची. असे असतानाही मनोहरच्या मृत्यूने देशभरातील सुशिक्षित, प्रगल्भ, सामाजिक मूल्यभान असलेल्या लोकांना भारताचे राजकारण बदलण्याची क्षमता असलेल्या एका नेत्याचे अकाली जाणे, हे आपल्या भावविश्वाला पडलेल्या एका ‘मनोहर‘ स्वप्नाची अखेर झाल्यासारखे वाटले. असे निदान नजीकच्या काळात तरी घडलेले नाही. हे मनोहरच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखेपण होते. हे राजकारण बदलू शकते, असा विश्वास त्याने जनमनात निर्माण केला. आजच्या भाषेत बोलायचे तर संपूर्ण भारतात त्याच्याशी ‘कनेक्ट‘ झालेला प्रचंड लोकसमूह होता.
वास्तविक, रूढार्थाने राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे काही लागते, त्याचा पूर्ण अभाव मनोहरकडे होता. त्याच्यापाशी चांगले वक्तृत्व नव्हते. त्याची आयुष्यभरातील भाषणे काढली तर त्यात मांडलेल्या विचारांना संकलित केले तर त्याचा एखादा मोठा ग्रंथ बनवायलाही कष्ट पडतील. त्याच्याजवळ राहणार्यांना कोणताच ऐहिक लाभ नसे. किंबहुना, त्याचं वागणं धारवाडी काट्यावर तोलले जाई व जे त्यात टिकणार नाहीत, त्यांच्याशी तो कामापुरतेच संबंध ठेवी. राजकारणी व प्रसिद्धी यांचे नाते वस्तू आणि सावलीसारखे. एखादी व्यक्ती राजकारणाच्या प्रकाशात आली की, तिच्यासोबत प्रसिद्धीही आपोआप येते. पण, आपल्याला अधिकाधिक प्रसिद्धी कशी मिळविता येईल, याचा प्रत्येक राजकारणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. पण, त्याला मनोहर अपवाद होता. अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा त्यांच्या साधेपणाचं मार्केटिंग सुरू केलं, तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी देशभरातील काही निवडक वार्ताहरांना बोलावून मनोहरच्या साधेपणाच्या प्रचारासाठी ‘त्याच्यासोबत एक दिवस‘ असा आखलेला कार्यक्रम त्याने रद्द करायला लावला. याची दोन कारणे होती. आपला साधेपणा हा आपल्या स्वभावाचा भाग आहे, प्रचाराचा नाही हे पहिले कारण. त्याचबरोबर ‘साधेपणा’ हा कार्यक्षमतेला पर्याय नाही व आपण आपल्या कार्यक्षमतेमुळे राजकारणात टिकून आहोत, हे त्याला पूर्ण माहिती होते. त्यामुळे प्रसिद्धीसाठी कोणतीही नाटके त्याने केली नाहीत. असे असूनही किंवा असा नसल्यामुळेच मनोहर जाणत्या लोकांना भावला. त्याच्या पारदर्शी बोलण्यातून, कृतीतून, सहज व अकृत्रिम वागण्यातून, देहबोलीतून तो लोकांना भावत गेला. मनाला भावणारी एक नि:शब्द भाषा असते. मनोहरचे अवघे व्यक्तिमत्त्व ती भाषा बोलत असे. त्या भाषेचे गारूड लोकांवर होते.
राजकारण्याचे व लोकमनाचे वेगळे नाते निर्माण होत असते. वास्तविक उपयुक्ततावादाच्या दृष्टीने विचार केला तर हजारो लोकांना रोजगार देणारा उद्योगपती असो की, लक्षावधी लोकांचे जीवन बदलून टाकणारा शोध लावणारा एखादा शास्त्रज्ञ असो, लोकांना त्यांचे महत्त्व अधिक वाटायला हवे. एखादा खेळाडू किंवा अभिनेता कर्तृत्वाच्या सर्वोच्च पातळीवर असताना लोकप्रियतेच्या शिखरावर असतो, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी लोक स्वत:चे भवितव्य निगडित करीत नाहीत. रोज राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वहाणार्यांनाही राजकारण्यांचे हे आकर्षण सुटलेले नसते. याचे कारण लोकशाहीतील राजकारण हे लोकभावनांचे कुरूक्षेत्र बनलेले असते. त्यात लढणार्या सेनानींच्या भोवती लोकमानस रूंजी घालत असते. राजकीय लोकांना एवढे महत्त्व का? हा प्रश्न सनातन आहे. महाभारताच्या युद्धानंतर युद्धातील हिंसेने व्यथित झालेल्या युधिष्ठिराने भीष्मांना राजाच्या कर्तव्याविषयी जे प्रश्न विचारले, त्याची चर्चा शांतीपर्वात आहे. ही चर्चा सुरू करताना युधिष्ठिर विचारतो की, “राजा हा सर्वसामान्य लोकांसारखाच असताना त्याला लोक देवासमान का मानतात?” तेव्हा भीष्माचार्यांनी जे सांगितले, त्याचा थोडक्यात अर्थ असा की, “कृतयुगामध्ये जेव्हा सर्व लोक एकमेकांचे रक्षण करून राहात होते, तेव्हा राजा नव्हता व राज्यही नव्हते. परंतु, जेव्हा माणसातील लोभ जागा झाला तेव्हा वेद आणि धर्म हे धोक्यात आले. त्यातून मार्ग काढण्याकरिता ब्रह्माने नियम बनविले. त्या नियमांचे पालन करवून घेण्याकरिता त्यातूनच एका माणसाची निवड करायला विष्णूला सांगितले व तशी निवड करून त्याच्यात विष्णूने प्रवेश केला. त्यामुळे आपल्या परंपरेत राजाला विष्णूचा अंश मानला जातो.” भीष्माचार्य नि:संदिग्धपणे सांगतात की, “राज्यकर्त्याच्या आश्रयानेच समाजाचे सर्व घटक टिकतात. त्यांच्या संरक्षणात जी प्रजा राहते, त्या प्रजेच्या पुण्यकर्मात राजाचाही वाटा असतो.”
लोकशाहीत तर राज्यकर्ता हा समाजाच्या समूहमनाचे प्रतिनिधीत्व करीत असतो. मनोहरबद्दल लोकमनात असलेल्या आकर्षणाचे कारण म्हणजे सामाजिक व व्यक्तिगत मूल्यांचे भान ठेवून आपल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण करू पाहाणार्या सामाजिक समूहमनाचे तो प्रतिनिधीत्व करीत होता. या समूहमनाने मनोहरच्या यशापयशाशी स्वत:ला बांधून घेतले होते. आपल्या भावविश्वात मनोहरला जागा करून दिली होती. तो दिल्लीहून गोव्याला परतला, तेव्हा त्याला त्याची हळहळ वाटली होती. मनोहरचे जीवन हा आजच्या भ्रष्ट राजकीय जीवनाशी विवेकबुद्धीने दिलेला लढा होता. आपण कोणता लढा देत आहोत, याची त्याला कल्पना होती. गोव्यासारख्या एका छोट्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या अंत्ययात्रेला पंतप्रधानांसकट अनेक मंत्री आले व किती हजारांचा जनसमुदाय त्यासाठी जमला, हे त्याच्या राजकीय जीवनाच्या यशस्वितेचा निकष नव्हता. देश-विदेशातील भारतीयांच्या मनांत लोकशाहीच्या यशस्वितेबद्दलचा विश्वास निर्माण करणारी तो दंतकथा बनला हे महत्त्वाचे. विवेकनिष्ठा, नैतिकता व स्वातंत्र्याची ईर्ष्या यांना जर्मन तत्त्वज्ञ हेगेल हा आधुनिक राजकारणाची मूल्यत्रयी आहे, असे मानतो. मनोहर हा भारतीय राजकारणातील या मूल्यत्रयीचे उदाहरण होता. अनेकवेळा ‘राजकारण हा बदमाषांचा अखेरचा अड्डा,’ असे त्याचे वर्णन केले जाते. परंतु, हेगेलच्या मते आधुनिक राज्यकल्पना ही बुद्धीगम्य स्वातंत्र्याचे परिपूर्ण स्वरूप आहे. कुटुंब आणि नागरी समाजाला संयमित करणार्या तत्त्वांच्या स्वरूपात ते अवतरते. व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा व स्वतंत्र प्रज्ञा यांच्या रूपात ते अवतीर्ण होते व तीच समाजाची सामूहिक आध्यात्मिक चेतना असते. असे घडते तेव्हा राज्य हा परमेश्वराचा भूतलावर उमटलेला पदन्यास असतो. मनोहरचे जीवन हा तो पदन्यास होता. त्याच्या पक्षातील, वैचारिक परिवारातील, त्याच्या सहकार्यातील किती जणांना या पदन्यासातील दैवी आवाज ऐकू आला असेल याची कल्पना नाही. पण, कोट्यवधी भारतीयांच्या मनांत मात्र त्याचे पडसाद घुमत होते. मनोहरने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा आपल्या कार्यशक्ती त्याने अखिल भारतीय स्तरावर केंद्रित करायच्या की गोव्याच्या राजकारणात? असे दोन पर्याय त्याच्यापुढे होते. त्याच्या जाण्यानंतर देश-विदेशातील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्याने आपल्या परिक्षेसाठी सोपा पेपर निवडला, असे म्हणावे लागते. लोकांच्या त्याच्याकडून अधिक अपेक्षा होत्या व ती त्याची क्षमताही होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat